Thu, May 28, 2020 06:54होमपेज › Goa › म्हादईप्रश्‍नी उद्या सुप्रीम कोर्टात विशेष याचिका

म्हादईप्रश्‍नी उद्या सुप्रीम कोर्टात विशेष याचिका

Published On: Jul 18 2019 1:57AM | Last Updated: Jul 18 2019 1:57AM
पणजी : प्रतिनिधी  

कर्नाटक सरकारकडून म्हादई चे पाणी वळविण्यांसंदर्भात राज्य सरकार शुक्रवारी (दि.19) सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका (एस.एल.पी) दाखल करणार आहे. म्हादई प्रश्‍नी सरकार गंभीर आहे. सरकार जल तंटा लवादाच्या निर्णयाला 19 जुलै रोजी एसएलपी दाखल करून आव्हान देणार, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

विधानसभा अधिवेशनात  राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री सावंत बोलत होते. मुख्यमंत्री  म्हणाले, म्हादईचे पाणी कर्नाटकला वळविण्यासंदर्भात जल तंटा लवादाने आपला निर्णय दिलेला आहे. त्यामुळे  राज्य सरकार या निर्णयाला एस.एल.पी. द्वारा आव्हान देणार आहे. 

म्हादई चे पाणी मलप्रभेत वळविण्याच्या निषेधार्थ या पूर्वी लवादाकडे कर्नाटक सरकारविरोधात अवज्ञा याचिका दाखल केली होती. कर्नाटक सरकारने म्हादई पाणी प्रश्‍नी केलेल्या उल्लंघना विरोधातही अवमान याचिका  सरकारडून दाखल केली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

 म्हादई हा राज्याचा त्याचबरोबर वैयक्तिकरीत्या आपल्यासाठी फार महत्त्वाचा विषय आहे.   त्यामुळे सरकार एसएलपी दाखल करणार आहे. म्हादई प्रश्‍नी सरकारची भूमिका निश्‍चित आहे. कुणाला, किती प्रमाणात पाणी वळविण्यात आले, याचे सर्व तपशील सरकारकडे आहेत.  त्यामुळे सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

दरम्यान, गोवा, कर्नाटक व महाराष्ट्राचा म्हादईच्या पाण्यावरील वादविवादावर  म्हादई तंटा लवाद निर्णय दिला आहे.  म्हादई तंटा लवादाने 14 ऑगस्ट 2018 रोजी म्हादई तून कर्नाटकला 13.42 टीएमसी इतके पाणी देण्याचा निर्णय दिला होता. यात मलप्रभेला वळविण्यात आलेल्या 3.9 टीएमसी पाण्याचाही समावेश होता. महाराष्ट्र राज्याला म्हादई चे 1.33 टीएमसी पाण्याचे लवादाने वाटप केले होते.

शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न : मुख्यमंत्री 

राज्यातील शेतकर्‍यांच्या समस्यांत सरकार निश्‍चितच लक्ष घालणार आहे. 2020 ते 22 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न केले जातील. राज्यात अधिक बंधारे वांधण्यावर भर दिला जाईल.  शेतीसाठी लागणारे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाणी सिंचन प्रक्रियेवर भर देण्यात येणार आहे. राज्यात पाणी सिंचन प्रक्रियेविषयी जागरूकता आवश्यक असून त्यासाठी सरकारकडुन मडगाव व साखळी रविंद्र भवनात जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.