Thu, May 28, 2020 19:39होमपेज › Goa › आम आदमी पक्षातर्फे प्रदीप पाडगावकर यांचा अर्ज दाखल 

आम आदमी पक्षातर्फे प्रदीप पाडगावकर यांचा अर्ज दाखल 

Published On: Apr 04 2019 1:52AM | Last Updated: Apr 03 2019 7:42PM
पणजी : प्रतिनिधी

आम आदमी पक्षातर्फे प्रदीप पाडगावकर यांनी  बुधवारी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून  उमेदवारी अर्ज दाखल केला. पाडगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज उत्तर गोवा जिल्हाधिकारी  आर मेनका यांच्याकडे सादर केला. आम आदमी पक्ष हा सध्या जनतेसमोर एकमेव  पर्याय म्हणून  पुढे येत असल्याचे  पाडगावकर यांनी यावेळी सांगितले.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाडगावकर म्हणाले,  ‘‘राज्यातील भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जनतेची फसवणूक केली आहे.  एका पक्षातून निवडून आल्यानंतर आमदार दुसर्‍या पक्षात उडया मारतात. जनतेने दिलेल्या मतांचा ते अवमान करतात असा आरोप त्यांनी  केला. 

उत्तर गोव्यातील भाजपचे  खासदार  श्रीपाद नाईक  हे मागील अनेक वर्षापासून   खासदार म्हणून काम करीत आहेत.  मात्र त्यांना  लोकसभेत    जनतेचे प्रश्‍न मांडता आले नाहीत.   आपण  लोकसभेत  निवडून आल्यास   जनतेचे प्रश्‍न संसदेत नियमितपणे मांडणार.  लोकसभेत जनतेचा आवाज बनणार असे त्यांनी  सांगितले.

त्याचप्रमाणे दर तीन महिन्यांनी  उत्तर गोव्यातील सर्व मतदारसंघांना भेट देऊन जनतेच्या समस्या समजून घेणार. याशिवाय   खासदार  निधीचा वापर केवळ जनतेसाठी कल्याणकारी प्रकल्प राबवण्यासाठी करणार असल्‍याचे पाडगावकर यांनी सांगितले.

यावेळी पाडगावकर यांच्यासोबत सोबत पक्षाचे नेते तथा दक्षिण गोवा  उमेदवार एल्वीस गोम्स, नेते वाल्मीकी नाईक व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.