Wed, Oct 24, 2018 01:32होमपेज › Edudisha › फूड न्यूट्रिशनिस्ट - एक उत्तम संधी

फूड न्यूट्रिशनिस्ट - एक उत्तम संधी

Published On: Dec 04 2017 9:33PM | Last Updated: Dec 04 2017 9:35PM

बुकमार्क करा
व्यग्र दिनक्रमामुळे जी महत्त्वाची गोष्ट मागे पडते ती म्हणजे योग्य संतुलित आहार. वेळ नाही या कारणामुळे आहाराकडे नीट लक्ष दिले जात नाही, त्याचा परिणाम अर्थातच वाढत्या वयातील काही समस्यांमुळे जाणवतो. यावर उपाय म्हणून योग्य आहार घ्यायला हवा आणि त्यासाठी गरज भासते आहारतज्ज्ञाची किंवा फूड न्यूट्रिशनिस्टची.


आधुनिक जगात व्यक्‍तीच्या जीवनशैलीमध्ये काही आमूलाग्र बदल झाले आहेत. राहणीमान आणि आहारविहार यात खूप मोठा बदल झाला आहे. व्यग्र दिनक्रमामुळे जी महत्त्वाची गोष्ट मागे पडते ती म्हणजे योग्य संतुलित आहार. वेळ नाही या कारणामुळे आहाराकडे नीट लक्ष दिले जात नाही त्याचा परिणाम अर्थातच वाढत्या वयातील काही समस्यांमुळे जाणवतो. यावर उपाय म्हणून योग्य आहारा घ्यायला हवा आणि त्यासाठी गरज भासते आहारतज्ज्ञांची किंवा फूड न्युट्रिशनिस्टची. लोकांना योग्य आहारातून तंदुरुस्त कसे राहता येईल, यासाठी योग्य सल्ला हे तज्ज्ञ देतात. फूड न्युट्रिशनिस्ट हा एक चांगला करिअर पर्याय आहे. बारावीनंतर हा अभ्यासक्रम निवडता येतो.

• न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स : हा फूड सायन्स किंवा आहारशास्त्राशी निगडित एक अभ्यासक्रम आहे. त्यात अन्‍नातील पोषक घटकांविषयी अभ्यास केला जातो. याच आधारे मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये पोषणाच्या संबंधी असलेल्या विविध समस्यांचा अभ्यास केला जातो. या समस्या ओळखून त्या दूर करण्यासाठी सामाजिक आणि तांत्रिक दोन्ही पातळ्यांवर उपाय शोधले जातात. एवढेच नव्हे तर सरकारी संस्था आणि आरोग्याशी निगडित संस्थांमध्ये या अभ्यासानुसार आरोग्य नीतीमध्ये योग्य बदल करण्याच्या सूचना दिल्या जातात. 

• भविष्यातील संधी : फूड न्युट्रिशनिस्ट किंवा आहारतज्ज्ञ म्हणून सरकारी क्षेत्र आणि आरोग्य क्षेत्र या दोन्हीत करिअर करता येते. या क्षेत्रात चार प्रकारचे न्यूट्रिशनिस्ट काम करतात. 

• क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट : हॉस्पिटल्स, ओपीडी आणि नर्सिंग होम्स मध्ये काम करू शकतो. तेथील रुग्णांच्या आजारानुसार त्यांना आहाराचा तक्‍ता बनवून देणे किंवा तत्सम सूचना देणे असे काम करावे लागते. 

• मॅनेजमेंट न्यूट्रिशनिस्ट : न्युट्रिशनिस्ट क्लिनिकल आणि आहारशास्त्र यातील तज्ज्ञ असतात. मोठ्या संस्थांमध्ये काम करणारे तज्ज्ञांचे व्यवस्थापन करण्याचे काम करतात. त्याशिवाय यांना न्यूट्रिशनिस्ट किंवा आहारतज्ज्ञ म्हणून व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही सोपवली जाते. त्याशिवाय कोणत्याही संस्थेशी निगडित न राहता डॉक्टर सारखी स्वतंत्र प्रक्टिस करू शकतात. लोकांना आहार आणि पोषण यांच्याशी निगडित सल्ला व मार्गदर्शन देऊ शकतात. त्यामुळे स्वतंत्रपणे काम करण्याची मुभा यात मिळते. 

•  कम्युनिटी न्यूट्रिशनिस्ट : सरकारी आरोग्य संस्था, हेल्थ अँड फिटनेस क्लब आणि डे केअर सेंटर आदी ठिकाणी या व्यक्‍ती काम करू शकतात. या क्षेत्रात कोणत्याही एका व्यक्‍तीसाठी किंवा व्यक्‍तिगत पातळीवर काम न करता एखाद्या विशिष्ट समाजावर किंवा समुदायावर लक्ष केंद्रीत केले जाते. 

• न्युट्रिशन अ‍ॅडव्हायझर : हे तज्ज्ञ कोणत्याही संस्थेशी निगडित न राहतासुद्धा डॉक्टर स्वतंत्र प्रॅक्टिस करू शकतात. लोकांना पोषणाशी निगडित सल्ला व मार्गदर्शन करू शकतात. स्वतंत्रपणे प्रॅक्टिस करणेही शक्य होऊ शकते. 

• आवश्यक पात्रता : आहारातील घटकांमध्ये रस असेल आणि विविध पदार्थ, पक्वान्‍न यांच्या वापरल्या जाणार्‍या पदार्थातील पोषक घटकांबाबत वाचन करणे, ज्ञान मिळवणे, त्यानुसार आहारात योग्य तो बदल करणे आवडत असेल तर या क्षेत्रात जरूर काम करता येईल. यामध्ये योग्य पोषक घटकांसह नियंत्रित आहाराची योजना कशी करायची हे शिकवले जाते. बॉडी मास इंडेक्सनुसार आपणही स्वतःचा आहार तक्‍ता बनवू शकतो. 

•प्रशिक्षण अभ्यासक्रम कोणते? :

या क्षेत्रात करिअर करण्यासाठी बारावी मध्ये भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे विषय घेऊन शिकलेल्या विद्यार्थ्यांना होम सायन्स, फूड सायन्स आणि प्रोसेसिंग म्हणजे आहारशास्त्र आणि प्रक्रिया या विषयांसह शास्त्र शाखेची पदवी मिळवता येते. फूड सायन्स अँड मायक्रोबायोलॉजी, न्युट्रीशन, न्यूट्रीशन अँड फूड सायन्स आणि न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स  यामध्ये बीएससी ऑनर्स ही पदवी मिळवता येते. त्याशिवाय डायटेटिक्स अँड न्युट्रिशनमध्ये डिप्लोमा आणि फूड सायन्स अँड पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये डिप्लोमा करता येतो. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर याच विषयांमध्ये पदवुत्तर पदवी घेता येते, एमएस्सी करता येते. या क्षेत्रात संशोधन करण्यासही वाव आहे. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात खूप वाव मिळतो. 

• रोजगार संधी : न्यूट्रिशन हे एक नवे क्षेत्र खुले होत आहे. त्यात नोकरीच्या अनेक संधी आहेत. हॉस्पिटल, आरोग्यक्षेत्र, कँटिन, नर्सिंग याक्षेत्रात आहारतज्ज्ञ म्हणून तसेच कॉलेज आणि विद्यापीठात प्रोफेसर असेही काम करू शकता. त्याशिवाय केटरिंग, फाईव्ह स्टार हॉटेल, फूड मॅन्युफॅक्चरिंग लॅब, चाईल्ड हेल्थ केअर सेंटर, ब्युटी क्लिनिक, फिटनेस सेंटर आणि सरकारी आरोग्य संस्था इथेही नोकरीच्या सुवर्णसधी उपलब्ध होतात. त्याशिवाय वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र, मासिके आदी ठिकाणीही काम करू शकतो. 

या क्षेत्रात मिळणारे वेतनही खूप आकर्षक असते. प्रशिक्षणार्थी आहारतज्ज्ञ म्हणून करिअरची सुरुवात करत असताना सुरुवातीचे वेतन हे कमीत कमी दहा हजार प्रति महिना असे मिळू शकते. दोन तीन वर्ष चांगला अनुभव घेतल्यानंतर  25 हजार रुपये प्रति महिना वेतन मिळू शकते. एकदा कामाची प्रसिद्धी झाली की वेतनात अजून आकर्षक वाढ होऊ शकते. 

• मुख्य प्रशिक्षण संस्था-
मुंबई युनिव्हर्सिटी, मुंबई
नागपूर युनिव्हर्सिटी, नागपूर
दिल्ली विद्यापीठ, दिल्ली
इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी, दिल्ली.

वनिता कापसे