Thu, Apr 25, 2019 11:48होमपेज › Edudisha › डॉग ट्रेनर बनायचंय?

डॉग ट्रेनर बनायचंय?

Published On: Aug 07 2018 1:04AM | Last Updated: Aug 06 2018 7:39PMमेघना ठक्‍कर

प्राणी पाळणे ही बाब सोपी नाही. मग कुत्रा असो किंवा मांजर असो. घरात त्यांचा नित्याने वावर असल्याने त्यांची स्वच्छता, लसीकरण, राहण्याची जागा, आहार याबाबत कटाक्ष ठेवावा लागतो. केवळ प्राण्यांबाबत प्रेम असून चालत नाही तर त्याची देखभाल करणेही तितकेच महत्त्वाचे असते. जर्मन शेफर्डसारखा कुत्रा जर पाळायचा झाल्यास पाच ते सात हजार रुपये महिन्याकाठी खर्च येतो. काही मंडळी आपल्या कुत्र्यावर एवढे जीवापाड प्रेम करतात की त्याची खोली वातानुकूलित केली जाते. घराचे संरक्षण, प्राण्यांची आवड, घरात एकटे असल्यास आदी कारणांमुळे कुत्रा पाळण्याचा छंद मंडळी जोपासतात.

आजकाल बहुतांश शहरात सकाळ-सायंकाळी कुत्र्यांना फिरावयास नेणारी मंडळी आपण पाहत असतो. सर्वांनाच प्राणी सांभाळणे शक्य नसते. कारण अपुरी जागा, देखभालीचा खर्च हा आवाक्याबाहेर असतो. जर वन बीएचके फ्लॅट असेल तर आपण राहणार कोठे आणि प्राण्यांना ठेवायचे कोठे. अशा स्थितीत पेट डॉग हॉस्टेलची संकल्पनाही रूढ झाली आहे. घरात एखादा कार्यक्रम असल्यास किंवा गावाला जायचे असल्यास आपल्या लाडक्या कुत्र्याला काही दिवसांसाठी तेथे ठेवण्यात येते. थोडक्यात काय तर ज्यांना प्राण्यांविषयी लळा आहे, त्यांना हा छंद जोपासण्याबरोबरच कुत्र्याला प्रशिक्षण देण्याचे शिक्षणही घेऊ शकतात.

डॉग ट्रेनर म्हणून आपण प्रसिद्ध होऊ शकतो आणि हा जॉब आपण आपल्या सोयीनुसार करू शकतो. पार्टटाईम किंवा फुलटाईम असो. यातून बर्‍यापैकी कमाई होतेच, त्याचबरोबर कुत्रा पाळण्याची हौसही भागते. कुत्र्याला प्रशिक्षण देण्यासाठी आपल्या अंगी कमालीचा संयम असायला हवा. त्याच्या तब्येतीची, आहाराची, लसीकरणाबाबत आपल्यााला काळजी घ्यावी लागते. यासंदर्भातील माहिती वेळोवेळी मालकाला द्यावी लागते. शाळेत शिकणारा मुलगा असो किंवा कॉलेजमध्ये जाणारा विद्यार्थी असो कोणीही डॉग ट्रेनिंग सर्टिफिकेट पूर्ण करू शकतो. साधारणत: हा कोर्स 100 तासांचा असतो. त्यात कुत्र्याच्या जाती, प्रत्येकाच्या सवयी, सांभाळण्याचे कौशल्य, आहार-विहाराच्या सवयी, स्वच्छता याबाबतचे शिक्षण दिले जाते. नियमित वर्ग आणि चर्चासत्रातून पाळीव प्राण्यांची इत्यंभूत माहिती मिळते. अशा प्रकारचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास आपण डॉग ट्रेनर किंवा पाळीव प्राणी सांभाळण्याची कला अवगत करू शकतो. जर आपल्याला व्यवसाय करायचा नसेल तर स्वत:च्या कुत्र्याची निगा कशी राखावी, यासाठी देखील हा अभ्यासक्रम पूरक ठरतो. अभ्यासक्रमाविषयी ऑनलाईन माहिती मिळतेच त्याचबरोबर शहरातील अन्य डॉग ट्रेनरकडूनदेखील त्यासंदर्भातील माहिती मिळते.