होमपेज › Edudisha › लोकलायजेशनमध्ये करिअर करताना...

लोकलायजेशनमध्ये करिअर करताना...

Published On: Jun 11 2019 1:11AM | Last Updated: Jun 18 2019 2:07AM
सतीश जाधव

लोकलायजेशन हे असेे क्षेत्र आहे, की त्यात कंपन्या स्थानिक भाषेत नागरिकांना कंटेट (मजकूर) उपलब्ध करून देतात. आपणही या क्षेत्रात करिअर करून महिन्याकाठी चांगली कमाई करू शकता. यासाठी आपल्याला पूर्णवेळ आणि अर्धवेळ काम करण्याचा पर्याय देखील असेल. जी मंडळी या क्षेत्रात घरबसल्या काम करू इच्छीत असेल त्यांच्यासाठी फ्रीलान्सिंग अनुवादक हा चांगला पर्याय आहे.  
इंटरनेटच्या प्रसारामुळे आज गूगल, अ‍ॅमेझॉन आणि नेटफ्लिक्ससह सर्व मोठमोठ्या कंपन्यांचा जागतिक स्तरावर वेगाने विस्तार होत चालला आहे. अशा स्थितीत रोजगाराच्या द‍ृष्टीने युवकांसाठी लोकलायजेशनच्या रुपातून नवे क्षेत्र उदयास येत आहे. हे क्षेत्र परदेशातील बाजाराशी संपर्क प्रस्थापित करण्याबरोबरच मोठमोठ्या कंपन्यांना स्थानिक भाषेत कंटेट उपलब्ध करून देत आहेत. म्हणूनच या कंपन्यांना भाषातज्ज्ञांची गरज भासते. एवढेच नाही तर जागतिकीकरणाच्या काळात आपण दुसर्‍या देशातील भाषा शिकून अन्य देशांत जाऊनही नोकरी करू शकता. किंवा भारतीय भाषात प्रावीण्य मिळवून परदेशातही जाऊ शकता. अर्थात बहुतांश कंपन्या हे काम अन्य एजन्सीच्या माध्यमातून करत आहेत आणि एजन्सी  या कामासाठी अनुवादक, प्रूफरीडिंग करणारे आणि तपासणीसांची भरती करत आहेत. 

लोकलायजेशन क्षेत्रात करिअर करण्यासाठी किमान दोन भाषांवर कमांड असणे गरजेचे आहे. (सोर्स लँग्वेज अँड टार्गेट लँग्वेज) ज्या भाषेचा आपल्याला अनुवाद करायचा आहे, त्यास सोर्स लॅग्वेज म्हणतात. त्याचवेळी ज्या भाषेत आपल्याला अनुवाद करायचा आहे, त्याला टार्गेट लॅग्वेज असे म्हणतात. त्याचवेळी कोणत्याही विषयाचे अनुवाद करताना वेग, अचूकता, दर्जा याबरोबर टार्गेट ऑडियन्सदेखील लक्षात घ्यावा लागतो. लोकलायजेशनसाठी इंग्रजी-हिंदीचेच ज्ञान नाही तर देशी भाषेतील ज्ञानही महत्त्वाचे आहे. मराठी, बांगला, पंजाबी, मल्याळम, तमिळसारख्या अनेक भाषेचे ज्ञानही आपल्या करिअरला दिशा देऊ शकते. 

अनुवाद करताना शब्दांचे अनेक पर्याय आपल्यासमोर असतात. त्यापैकी अचूक शब्दांची निवड करावी लागते. त्याचवेळी विषयाचा आशय बदलणार नाही, अशा रितीने अनुवाद करावा लागतो. यासाठी भाषा आणि विषयावर कमांड असणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे व्याकरण आणि शब्दसंग्रह वाढवणे गरजेचे आहे. आयटी आणि मार्केटिंगच्या टर्मिनॉलॉजीवर अधिक फोकस करणे गरजेचे आहे. एखाद्या कंपनीसाठी आपण लोकलायजेशन करत असताना काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे. संबंधित कंपनीच्या उत्पादनाचा अभ्यास केल्यास किंवा संशोधन केल्यास लोकलायजेशन अधिक सुलभ होते.  

अनुवाद करणे ही एक रचनात्मक प्रक्रिया आहे आणि त्यात कौशल्य मिळवण्यासाठी सरावाची अत्यंत गरज आहे. यानुसार आपण केवळ शब्दच नाही तर भावानुवाद करत असतात. जेव्हा एखाद्या भाषेतील म्हणी किंवा कन्टेटचा कल लक्षात येत नाही, तेव्हा आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो. जर आपल्याला लोकलायलेशनमध्ये करिअर करायचे असेल तर शब्दसंग्रह वाढवणे गरजेचे आहे. अर्थात भाषेवर हुकुमत असणे क्रमप्राप्त आहे. उदा. एखादा राजकीय लेख अनुवाद करायचा असेल तर राजकारणाची पार्श्‍वभूमी ठाऊक असल्यास लेखाचा लवकर संदर्भ लागतो. त्याचवेळी ब्लँक माइंडने अनुवाद हाती घेतल्यास ते काम पूणर्र् होण्यास बराच वेळ लागतो. एकूणच घरबसल्या अर्धवेळ किंवा पूर्णवेळ काम करून चांगले उत्पन्‍न मिळवून देणारे लोकलायजेशन क्षेत्र आजच्या काळात उपयुक्‍त ठरत आहे.  

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex