Fri, Jun 05, 2020 00:55होमपेज › Edudisha › व्हिडीओ एडिटर बनायचंय?

व्हिडीओ एडिटर बनायचंय?

Published On: May 14 2019 2:05AM | Last Updated: May 14 2019 2:05AM
करिअरसाठी आज भरपूर पर्याय युवकांसमोर आहेत. मनोरंजनाचा विचार करायचा झाल्यास आजकालच्या दूरचित्रवाहिन्यांमुळे मनोरंजन क्षेत्राचा कायापालट झाला आहे. चित्रपटाबरोबरच टेलिव्हिजन इंडस्ट्रीची अब्जावधीत उलाढाल होत आहे. अशा क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करायला हरकत नाही. मग जाहिरात असो किंवा व्हिडीओ एडिटिंग असो. जर आपली कल्पनाशक्‍ती दांडगी असेल आणि सॉफ्टवेअरमध्ये काम करण्याची आवड असेल तर व्हिडीओ एडिटिंगमध्ये यशस्वी करिअर करू शकता. 

आजकाल चित्रपट निर्मिती करणार्‍या प्रत्येक कंपनीत आणि स्टुडिओत एडिटरला मोठी मागणी आहे. फिल्म एडिटर हा व्हिडीओ एडिटिंगच्या माध्यमातून चित्रपटाला अंतिम आकार देत असतो. व्हिडीओ एडिटिंगअंतर्गत संपादनाची संकल्पना आणि त्याच्याशी निगडित असलेल्या गोेष्टी विस्ताराने सांगितल्या जातात. 

फुटेजचे कॅप्चरिंग, फुटेज एडिट करणे, कोणते द‍ृष्य कोठे योग्य लागू पडते, संगीत आणि आवाजाला कशाप्रकारे मिक्स करू शकतो, या सर्व गोष्टी व्हिडीओ संपादनात पारंगत असलेला संपादक करू शकतो. यासाठी थेअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही गोष्टीची गरज आहे. व्हिडीओ एडिटर्स अगोदर लिनियर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काम करत होते आता व्हिडीओ एडिटिंगच्या माध्यमातून काम करत आहेत. 

• अभ्यासक्रम आणि पात्रता : सर्टिफिकेट कोर्स इन व्हिडीओ एडिटिंग अँड साऊंड रेकॉडिंग तसेच डिप्लोमा इन पोस्ट प्रॉडक्शन अ‍ॅड व्हिडीओ एडिटिंग सारखे अभ्यासक्रम तीन महिन्यांपासून ते तीन वर्षांपर्यंत आहेत. 

दीड वर्षापासून ते तीन महिन्यांचे शॉर्ट कोर्स उपलब्ध आहेत. अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी किमान बारावी असणे गरजेचे आहे. मात्र, पदवी आणि पदविका घेण्यासाठी आपण एखाद्या विषयात पदवी घेतलेली असावी लागते. जर आपल्याला एखाद्या चॅनेलमध्ये नोकरी करायची असेल तर पदवी असणे आवश्यक आहे. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विषयाचे सर्वांगिण ज्ञान असणे गरजेचे आहे. 

• पात्रता : एक यशस्वी व्हिडीओ एडिटर होण्यासाठी विविध विषयांचे आकलन असणे गरजेचे आहे. जेणेकरून द‍ृष्याचे आकलन झाल्यानंतर योग्यरितीने साऊंडमिक्सिंग करता येईल. जी मंडळी सतत कल्पनेच्या विश्‍वात रमलेले असतात आणि द‍ृष्याच्या मदतीने विविध सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रभावीपणे एडिटिंग करू इच्छितात त्यांच्यासाठी व्हिडीओ एडिटिंग हा एक करिअरचा चांगला पर्याय ठरू शकतो. मनोरंजन आणि प्रसारमाध्यमाशी निगडित असलेल्या क्षेत्रात पैसा भरपूर आहे आणि संधीला वाव आहे. न्यूज, एंटरटेनमेंट चॅनेल, म्युझिक इंडस्ट्री, फिचर आणि जाहिरात संस्था, चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. याशिवाय पोस्ट प्रॉडक्शन स्टुडिओ, टेलिव्हिजन कंपन्या आदी ठिकाणीही शॉर्ट टर्म करारावरदेखील काम मिळू शकते. याशिवाय आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर सतत अपडेट राहणे गरजेचे असते. दुसर्‍यांचे काळजीपूर्वक ऐकणे आणि टीममध्ये काम करण्याचा गुण महत्त्वाचा मानला जातो.

• संधी : अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर न्यूज, एंटरटेनमेंट चॅनेल्स, प्रॉडक्शन हाऊस, वेब डिजायनिंग कंपनी, म्युझिक वर्ल्ड, फिचर आणि जाहिरात, फिल्म आणि बीपीओ आदी क्षेत्रात काम करता येते. या क्षेत्रात फ्रिलान्ससाठी देखील अधिक पर्याय आहेत. पोस्ट प्रॉडक्शन स्टुडिओ, टेलिव्हिजन कंपन्या आदी क्षेत्रात देखील शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅटवर काम करता येते.

•मागणीत वाढ : जर आपल्याला द‍ृष्य समजून घेण्याला आणि त्याचे तत्काळ मूल्यांकन करण्याची क्षमता असेल तर आपल्यासाठी व्हिडीओ एडिटिंगचा अभ्यासक्रम करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. अलीकडच्या काळात वाढत्या तंत्रज्ञानामुळे व्हिडीओ एडिटर्सला मागणी वाढली आहे. कारण टीव्हीवरचा कोणताही कार्यक्रम असो तो व्हिडीओ एडिटर्सशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. 
सध्या बाजाराची स्थिती पाहता भविष्यात सुमारे एक लाख प्रशिक्षण व्हिडीओ एडिटरची गरज भासणार आहे. 

• संस्था : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे • एनआरएआय स्कूल ऑफ मास कम्युनिकेशन, नवी दिल्ली• टीजीसी अ‍ॅनिमेशन आणि मल्टिमिडीया, जयपूर • एडिटवर्क्स स्कूल ऑफ मास कम्युनिकेशन, नोईडा.

जगदीश काळे