होमपेज › Edudisha › कला शाखा घ्या आणि कलेक्टर व्हा!

कला शाखा घ्या आणि कलेक्टर व्हा!

Published On: Jul 03 2018 1:55AM | Last Updated: Jul 03 2018 1:55AMकलेक्टर होण्यासाठी जी केंद्रीय लोकसेवा आयेागाची upscची परीक्षा द्यावी लागते तिला बसण्यासाठी फक्‍त 35टक्के गुण लागतात. शिवाय, यावर्षी तर ज्या मुलाला 25 टक्के गुण मिळतील तो देखील IASची पूर्व परीक्षा पास झालाच म्हणून समजा. मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, बी.सी.ए., बी.बी.ए.ला जाऊन लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा सरळ कला शाखेत प्रवेश घ्या व कलेक्टर म्हणजे IAS व्हा.
विश्‍वास नांगरे-पाटील या सुप्रसिद्ध IASअधिकार्‍यांचे नाव आपण ऐकलेच असेल. बारावीला 92 टक्के गुण मिळाल्यानंतरही (मेडिकल व इंजिनिअरिंगला प्रवेश मिळत असतानाही) त्यांनी कला शाखेत प्रवेश घेतला व IAS  म्हणजे कलेक्टरचा गड जिंकला. आज महाराष्ट्रातील कोणत्याही डॉक्टर आणि इंजिनिअरपेक्षा विश्‍वास नांगरे-पाटील यांचा नावलौकिक जास्त आहे.

कला शाखेचे फायदे- कला शाखा ही वैद्यकीय अभियांत्रिकी शाखेसारखी खर्चिक नाही. शिवाय अभ्यासाचे तास, शिकवण्या, प्रात्यक्षिके, इंग्रजी यासारखे तगादे कला शाखेत नाहीत. शिवाय, कला शाखेतील इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास केला तर तो IAS च्या कामात येतो. कारण हेच विषय खअड ला आहेत. अगदी अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी IAS करतात तर ते हेच विषय घेतात. कला शाखेत प्रवेश घेतल्याचा हा एक फायदा आहे.

वेळेची बचत - अभियांत्रिकी, वैद्यकीय, विज्ञान, कृषि व संगणकशास्त्र या विषयांत पदवी करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांची दिवसभर धावपळ सुरू असते. सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत प्रॅक्टिकल्स, थेअरी असतात. त्यामुळे त्यांना पदवी परीक्षा व IAS ही समीकरणं समांतर चालविता येत नाहीत. या पदवी परीक्षेच्या अभ्यासाबरोबर IAS चा अभ्यास करता येत नाही. याउलट कला शाखेचे कॉलेज हे 3-4 तासांत आटोपते. कला शाखेतील विद्यार्थी उर्वरित वेळ हा IAS साठी उपयोगात आणू शकतात. मुबलक वेळ असल्यामुळे ते इतर कार्यक्रमात (वादविवाद, व्याख्याने, चर्चासत्रे, वृत्तपत्र व नियतकालिकांचे वाचन) सहज भाग घेऊ शकतात. यामुळे या फावल्या वेळाचा उपयोग ते UPSCसाठी करू शकतात. शिवाय, त्यांना कला शाखेत जे विषय शिकविले जातात तेदेखील UPSC
च्या अभ्यासक्रमाशी निगडित असतात.

इंग्रजीची भीती- कला शाखा सोडली तर इतर सर्व शाखांसाठी माध्यम म्हणून इंग्रजी माध्यम घ्यावं लागतं. कला शाखेत मात्र मराठी, हिंदी माध्यम घेता येतं. ज्या मुलांनी मराठी किंवा हिंदी माध्यमातून IASची म्हणजे कलेक्टरची परीक्षा देण्याचे ठरविले आहे त्यांनी जर कला शाखेतून मराठी किंवा हिंदी माध्यमातून परीक्षा दिली तर ते त्यांच्या फायद्याचे आहे. साधारणपणे मुलाच्या मनात इंग्रजीविषयी भीती असते, पण कला शाखेत प्रवेश घेतल्यामुळे इंग्रजीची भीती राहत नाही व कला शाखेची पदवी घेताना आपली मराठी पक्‍की होती.

IAS  ची मुलाखत- कलेक्टर होण्यासाठी UPSCची जी परीक्षा होते त्यात शेवटचा टप्पा म्हणजे मुलाखत. ही मुलाखत मराठीत तसेच कोणत्याही भारतीय भाषांमध्ये देता येते. कला शाखेत प्रवेश घेतल्यामुळे व वेळ भरपूर प्राप्‍त होत असल्यामुळे मुलाखतीचा सराव हा चांगला रितीने करता येतो. शिक्षणही मराठी भाषेतून, परीक्षादेखील मराठी भाषेतून व मुलाखतदेखील मराठी भाषेतून असा त्रिवेणी संगम साधला गेला तर  IAS पास होणे कठीण नाही.

IAS ही व्यक्‍तिमत्त्वाची परीक्षा- कलेक्टरसाठी जी खअड ची परीक्षा आहे ती खरं तर व्यक्‍तिमत्त्वाची परीक्षा आहे. यात जास्त गुण मिळणार नाही. कारण या परीक्षेत तुमचं व्यक्‍तिमत्त्व तपासण्यात येतं. अनेकदा तर 50-51 टक्के गुण प्राप्‍त करणारा विद्यार्थी हा  IAS टॉपर येतो. कला शाखेत प्रवेश घेतल्यामुळे कला शाखेत वेळ मिळाल्यामुळे अवांतर वाचनाला, आपले छंद वृद्धिंगत करण्यासाठी आपणास वेळ देता येतो. इतर शाखांचा व्याप इतका प्रचंड असतो की त्यात छंदाला तर दूर अति महत्त्वाच्या कामालाही वेळ काढणे कठीण असते. कला शाखेत प्रवेश घेतल्यामुळे  IAS चा मार्ग सुकर होतो. कला शाखा विद्यार्थ्यांचे व्यक्‍तिमत्त्व, तत्पर, तेजस्वी व तपस्वी करण्यास मदतच करते.

ताणतणाव निर्मूलने- वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थी व पालक नेहमी ताणतणावात दिसून येतात. तो ताणतणाव अभ्यासाचा तर असतोच, पण आर्थिक बाबींचाही असतो, पण कला शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये असा ताणतणाव दिसत नाही. उलट या कला शाखेतील विद्यार्थी हास्यवदनाने अभ्यासाला व अभ्यासेतर कार्यक्रमाला सामोरे जातात.

 प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे