होमपेज › Edudisha › ओळख रसायनशास्त्र अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाची

ओळख रसायनशास्त्र अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाची

Published On: Jun 12 2018 12:56AM | Last Updated: Jun 11 2018 10:10PMआपण जेव्हा दहावी अथवा बारावी नंतरच्या शिक्षणाचा विचार करतो त्यावेळी निश्‍चितच निवडलेल्या विद्याशाखेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतरच्या संधीचा प्रामुख्याने विचार करतो. अशा संधी म्हणजे चांगली नोकरी, उच्च शिक्षण, संशोधन अथवा स्वयंरोजगार निर्मिती होय. या संधीबद्दलचा विचार करणे हे अगदीच योग्य आहे. त्यामुळे शिक्षण प्रवेश निश्‍चितीच्या काळामध्ये विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये प्रचंड अशी संभ्रमावस्था निर्माण झालेली असते.

शिक्षणाच्या सर्व विद्या शाखांना भविष्यात जाऊन वाव हा असतोच, परंतु त्या त्या शाखांमध्ये चांगले ज्ञान व प्रावीण्य मिळविलेले सर्व गुण कौशल्य संपन्‍न व सकारात्मक वृत्तीचे विद्यार्थीच आपले भवितव्य चांगल्या प्रकारे घडवू शकतात. ज्यावेळी आपण आपले पुढील शिक्षण क्षेत्र निवडत असतो, त्यावेळी निश्‍चितच आपल्या आवडीला अग्रक्रम द्यावा.  परंतु यदाकदाचित ते क्षेत्र आपणास मिळू शकले नाही तर ज्या क्षेत्रात आपण प्रवेश करू त्या क्षेत्रामध्ये रस घेऊन, श्रद्धा ठेवून, गोडी निर्माण करणार्‍यांचे योग्य ते मार्गदर्शन घेऊन मिळालेल्या क्षेत्रामध्ये आपणास उत्तामोत्तम काम कसे करता येईल हे पाहणे योग्य ठरेल. 

शिक्षणाचा विचार करत असताना एक पर्याय आपल्यापुढे येतो तो म्हणजे विज्ञान व तंत्रशिक्षण की ज्याच्या माध्यमातून आपणास भविष्यातील संधी या संख्येने इतर क्षेत्रांच्या तुलनेत जास्त आढळतात. भारतासारख्या प्रगतीपथावरील देशात अजूनही अभियांत्रिकी क्षेत्रातील मूलभूत शाखा या तीनच मानल्या जातात त्या म्हणजे स्थापत्य, यंत्र व विद्युत अभियांत्रिकी होय. परंतु, नव्या काळानुसार व परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल होऊ घातलेला आहे. इतर प्रगत राष्ट्राप्रमाणे आपल्याकडेही, रसायन अभियांत्रिकी व तंत्रज्ञान ही शिक्षणाची चौथी मूलभूत तंत्रशिक्षण शाखा म्हणून गणली जाऊ लागली आहे आणि खरोखरच ती काळाची गरज आहे. इथे आपण या चौथ्या मूलभूत अभियांत्रिकी विद्या शाखेविषयी तोंडओळख थोडक्यात करून घेऊ :

रसायन अभियांत्रिकी व तंत्रज्ञान (Chemical Engineering & Technology) ओळख मानवाच्या अनेकविध, सामान्य, अतिसामान्य व वैशिष्टपूर्ण गरजा भागविणार्‍या वस्तू तयार करणारे सर्व औद्योगिक कारखाने ज्या तांत्रिकी ज्ञानावरती आधारभूत आहेत ते ज्ञान देणारी विद्याशाखा म्हणजे रसायन अभियांत्रिकी व तंत्रज्ञान होय. अशा विद्याशाखेतून ज्ञान घेऊन बाहेर पडलेल्या मनुष्यबळाच्या जोरावर अनेक उद्योगधंद्यातून, मूलभूत कच्च्या मालापासून दर्जेदार, किफायतशीर, पर्यावरणपूर्वक अशी कित्येक गरजेची उत्पादने निर्माण करण्यासाठी मोलाची मदत करणारी ही विद्याशाखा होय.

वेगवेगळ्या उद्योगातून निर्माण होणारी उत्पादने खालीलप्रमाणे -

‘साखर, सिमेंट, पेपर, सौंदर्य प्रसाधने, रंग, इतर पूरक रसायने, इतर खनिजजन्य पदार्थ, पेट्रोलियम व त्यांचे उपपदार्थ, औषध, डेअरी, फूड प्रॉडक्ट, प्लास्टिक, फायबर, रबर इत्यादी.’ या क्षेत्रातील अद्यावत तांत्रिक ज्ञान घेतलेल्या अभियंत्यास रसायन अभियंता असे म्हणतात. हा अभियंता एक वैशिष्ट्यपूर्ण असा असतो की, जो इतर अभियंत्यांमधला रसायनशास्त्रज्ञ असतो तर रसायनशास्त्रज्ञासाठींचा तो अभियंता असतो. त्यामुळे रसायन अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखा ही एक वैविध्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण व उज्ज्वल भविष्यदायिनी अशी विद्याशाखा म्हणून नावारुपाला येत आहे.रासायनिक अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेमध्ये रसायनशास्त्राचे ज्ञान आणि अभियांत्रिकी/तंत्रज्ञानातील तत्त्वे यांचा संयुक्‍त वापर होतो. त्यामुळे रासायनिक अभियांत्रिकी /तंत्रज्ञान हा शास्त्र आणि उत्पादकता यामधील महत्वपूर्ण दुवा आहे. या शाखेमध्ये व्यापक स्वरुपाच्या विविधतेचा समावेश होतो. जसे की उपकरणांची सरंरचना मोठ्या प्रमाणावरील रासायनिक उत्पादनासाठी प्रक्रिया विविध उत्पादनांच्या प्रक्रियेचे नियोजन व चाचणीचे कामकाज याबरोबरच प्रक्रिया, गुणवत्तामापन व संशोधन यांच्या कामकाजाचा व पर्यवेक्षणाचा समावेश रासायनिक अभियंत्याच्या कामकाजामध्ये होतो. त्यामुळे रासायनिक अभियंत्यांना संशोधन, नोकरी व व्यवसाय या क्षेत्रामध्ये उज्वल भवितव्य असून व्यापक स्वरुपात संधी उपलब्ध होतात.

रासायनिक अभियंता बनण्याकरिता चार वर्षाची बी.ई. (B.E.Chemical) किंवा बी.टेक. (B.Tech.Chemical) ही पदवी प्राप्‍त करणे आवश्यक आहे. B.E./B.Tech.Chemical पदवी प्राप्‍त केल्यानंतर्रीन विविध उद्योगामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. त्याचा गोषवारा पुढे दिलेला आहे.रासायनिक अभियांत्रिकी/तंत्रज्ञान शाखेतील पदवीनंतर पदव्युत्तर पदवी  M.E./M.Tech.Chemical  करता येते. पदव्युत्तर पदवी (M.E./M.Tech.Chemical) प्राप्त केल्यानंतर विविध उद्योगामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्रथम वर्गामध्ये प्राप्त केलेले उमेदवार विविध अभियांत्रिकी/तंत्रज्ञान महाविद्यालयचे, विद्यापीठे (अभियांत्रिकी/तंत्रज्ञानाचे शिक्षण देणारी) यामध्ये सहाय्यक प्राध्यापकपदी निवड होण्यास पात्र ठरतात. अध्यापनामध्ये स्वारस्य असणार्‍यांकरिता करीअरचा हा उत्तम मार्ग आहे.

संशोधनामध्ये स्वारस्य असणार्‍या पदव्युत्तर पदवी (M.E./M.Tech.Chemical) धारकांना पीएच.डी. संशोधनाकरिता मोठ्याप्रमाणामध्ये संधीची उपलब्धता आहे. (पूर्वार्ध)

-डॉ. प्रवीणकुमार  पाटील