Sun, Jun 07, 2020 00:49होमपेज › Edudisha › मॉडेलिंगच्या ग्लॅमरस विश्‍वात...

मॉडेलिंगच्या ग्लॅमरस विश्‍वात...

Published On: May 14 2019 2:05AM | Last Updated: May 14 2019 2:05AM
मॉडेलिंग शब्द ऐकताच रॅम्पवरील कॅटवॉकच आपल्या डोळ्यांसमोर येतो. परंतु, मॉडेलिंगचे क्षेत्र एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. हे क्षेत्र बरेच विस्तृत आहे. तुमची फिगर चांगली आहे, तुम्ही सुंदर आहात, 
चेहरा फोटोजेनिक आहे आणि उंचीही चांगली आहे, तर मग तुम्ही मॉडेलिंगच्या क्षेत्रात उत्तम करिअर करू शकता. या क्षेत्रात नावलौकिक आणि ग्लॅमर मोठ्या प्रमाणावर मिळते. तुमच्याकडे आत्मविश्‍वास
असेल आणि ग्लॅमरच्या दुनियेचे पहिल्यापासूनच तुम्हाला आकर्षण असेल, तर तुम्ही मॉडेलिंगच्या क्षेत्राकडे वळू शकता आणि नावलौकिकासह भरपूर पैसाही कमावू शकता. दहा वर्षांपूर्वीची स्थिती आता बदलली असून, या क्षेत्राकडे युवकांचा ओढा आता वाढल्याचे दिसून येत आहे. मॉडेलिंग करणार्‍या युवक-युवतींकडे बघण्याचा समाजाचा द‍ृष्टिकोनही आता बदलत आहे. त्यामुळे या क्षेत्राचा दर्जा उंचावण्यास मदत झाली आहे. त्यामुळेच रितसर प्रशिक्षण घेऊन मॉडेलिंगच्या क्षेत्रात उतरणार्‍या युवक-युवतींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. तुम्हाला जर हिंडण्या-फिरण्याची आवड असेल, वेगवेगळ्या लोकांना भेटण्याची आणि संपर्क प्रस्थापित करण्याची हातोटी तुमच्याकडे असेल, तर हे तुमचे कौशल्य या क्षेत्रात तुम्हाला अत्यंत साह्यभूत ठरू शकते. मॉडेलिंगचे क्षेत्र बरेच विस्तृत असल्यामुळे कोणत्या प्रकारातील मॉडेलिंगमध्ये तुम्हाला करिअर करायचे आहे, हे आधी निश्‍चित करणे आवश्यक आहे. प्रिन्ट मॉडेलिंगपासून, स्टिल मॉडेलिंग, रॅम्प, लाईव्ह, शोरूम मॉडेलिंग आणि अशाच विविध शाखा या क्षेत्रात आहेत. तुम्ही तुमची आवड आणि क्षमता यांचा विचार करून योग्य शाखा निवडू शकता. 

• अशी करा तयारी :
या क्षेत्रात उतरण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला पोर्टफोलियो तयार करणे. त्यासाठी कोणत्याही प्रोफेशनल फोटोग्राफरकडे जाऊन तुमचे काही उत्तम फोटो काढून घ्यायला हवेत. या फोटोंमुळे तुमचा एक सुंदर पोर्टफोलियो तयार होऊ शकेल. हा पोर्टफोलियो एखाद्या जाहिरात कंपनीकडे किंवा मॉडेल्स उपलब्ध करून देणार्‍या को-ऑर्डिनेटिंग एजन्सीकडे किंवा एखाद्या फॅशन डिझायनरला दाखविल्यास मॉडेलिंगच्या क्षेत्रात प्रवास सुरू करण्यासाठी दरवाजा उघडू शकतो.

• मॉडेलिंगचे प्रकार :
मॉडेलिंगमध्ये अनेक पर्याय उपलब्ध असतात. यामध्ये रॅम्प मॉडेलिंग, टेलिव्हिजन मॉडेलिंग आणि प्रिन्ट मॉडेलिंग असे ढोबळपणे तीन प्रकार करण्यात येतात. टेलिव्हिजन मॉडेलिंगमध्ये कॅमेर्‍यासमोर मॉडेलिंग करावे लागते. याचा वापर टीव्हीवरील जाहिराती, सिनेमा, व्हिडीओ, इंटरनेट आदी माध्यमांमध्ये करण्यात येतो. स्टिल मॉडेलिंगमध्ये प्रोफेशनल फोटोग्राफर्स मॉडेल्सचे फोटो काढतात. याचा वापर वृत्तपत्रे, ब्रोशर्स, पत्रिका, कॅटलॉग आणि कॅलेंडरसाठी करण्यात येतो. शोरूम मॉडेलिंगमधील मॉडेल्स विशेषत्त्वाने कपड्यांचे निर्यातदार, कपड्यांचे उत्पादक, मोठे रिटेलर्स यांच्यासाठी काम करतात. खरेदीदारांसमोर फॅशनमधील नवनवीन प्रकारांचे प्रदर्शन करणे हे या मॉडेल्सचे काम असते. रॅम्प मॉडेलिंगमध्ये काम करणारे मॉडेल्स प्रेक्षकांसमोर गारमेन्टस आणि नवनवीन फॅशन्सचे प्रदर्शन करतात. रॅम्प मॉडेल बनण्यासाठी उभे राहण्याची शैली, चालण्याची शैली आणि देहबोली मुद्दाम शिकावी लागते. 

•  विशेष गुण :
मॉडेलिंगच्या क्षेत्रात करिअर बनविण्यासाठी सर्वांत पहिली अट म्हणजे तुमचे तुमच्या शरीरावर निरतिशय प्रेम असायला हवे. फिगर नेहमी फिट ठेवण्याची आवड असायला हवी. चेहर्‍यावर सतत तजेला दिसायला हवा आणि त्यासाठी कायम प्रयत्नशील असायला हवे. तुमच्यामध्ये आत्मविश्‍वासही भरपूर असायला हवा. लोकांशी संपर्क प्रस्थापित करण्याची उपजत आवड असल्यास या क्षेत्रात करिअर चांगले होऊ शकते. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रचंड परिश्रमांची तयारी ठेवायला पाहिजे.

•  उत्पन्‍न किती :
या क्षेत्रात अत्यंत चांगले वेतन मिळू शकते. अगदी सुरुवातीला तुम्हाला दहा ते पंधरा हजारांपर्यंत मासिक कमाई होऊ शकते. परंतु, दोन-तीन वर्षांतच जेव्हा तुम्ही मॉडेलिंगमधील सर्व कौशल्ये आत्मसात कराल, तेव्हा उत्पन्‍न झपाट्याने वाढते. या क्षेत्रात तुमचे नाव सर्वतोमुखी झाले तर महिन्याकाठी लाखोंची कमाई करणे सहज शक्य आहे. 

•  आवश्यक पात्रता :
एक चांगले मॉडेल बनण्यासाठी तुमचा चेहरा आकर्षक असायला हवा. दुसर्‍यांसमोर स्वतःला उत्तम प्रकारे प्रोजेक्ट करण्याची हातोटी असायला हवी. मॉडेलची उंची चांगली असणे अत्यावश्यक आहे. फॅशन इंडस्ट्रीमध्ये महिलांची उंची पाच फूट सात इंचापेक्षा अधिक तर पुरुषांची उंची सहा फूट किंवा त्याहून अधिक असायला हवी. त्याचप्रमाणे घाटदार शरीर ही प्राथमिक गरज आहे. मॉडेल बनू पाहणार्‍यांचा चेहरा फोटोजेनिक असायला हवा. म्हणजे त्याचे किंवा तिचे फोटो चांगले यायला हवेत. याखेरीज रॅम्पवर कॅटवॉक करणे, अभिनयाची जाण असणे आणि कॅमेर्‍याचे भान असणेही गरजेचे आहे. याबाबतीत प्रशिक्षण घेतल्यास तुमची प्रतिभा आणखी आकार घेऊ शकते. 

•  मिळवा जागतिक ओळख :
फॅशन उद्योग आणि टेक्स्टाईल उद्योग सध्या प्रचंड विकसित झाले आहेत. त्यामुळे मॉडेलिंग क्षेत्रालाही नवे पंख लाभले आहेत. हे करिअर निवडणार्‍या अनेक मॉडेल्सना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली आहे. आपल्या गल्लीतून बाहेर पडून तुम्ही वैश्‍विक ओळख निर्माण करू शकता. तुम्ही या क्षेत्रात किती दूरवर विकास करू शकता, हे तुमच्यातील प्रतिभा, परिश्रम आणि क्षमतेवर अवलंबून आहे. जर तुमच्यात प्रतिभा असेल, क्षमता असेल, तर तुम्ही जागतिक स्तरावर कीर्ती प्राप्त करू शकता. एका शाळेपासून सुरू झालेला मॉडेलिंग क्षेत्राचा प्रवास आता आंतरराष्ट्रीय क्षितिजाला गवसणी घालतो आहे. तेव्हा, 
आत्मविश्‍वासाने या करिअरमध्ये पाऊल ठेवा आणि परिश्रमाने भरपूर पैसा, प्रसिद्धी मिळवा!

मानसी जोशी