Sun, Dec 08, 2019 06:16होमपेज › Edudisha › फूड प्रॉडक्शन मॅनेजर : एक चमचमीत संधी

फूड प्रॉडक्शन मॅनेजर : एक चमचमीत संधी

Published On: Aug 06 2019 1:50AM | Last Updated: Aug 06 2019 1:50AM
कीर्ती कदम

फूड प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून करिअर करायचे असल्यास विविध खाद्यपदार्थांची माहिती आणि ते तयार करण्याच्या कृतीत पारंगत असणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेशल डिशेस तयार करण्याची ज्यांना आवड आहे, अशा युवकांना करिअरसाठी हे अत्यंत फायदेशीर क्षेत्र आहे. हॉटेल अँड हॉस्पिटॅलिटी उद्योग दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे फूड प्रॉडक्शनच्या व्यवसायात चांगली कमाई करण्याची संधी अशा तरुणांना मिळू शकते.

हॉटेल अँड हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ दिसून आली आहे. त्यामुळे हॉटेल उद्योगात व्यावसायिक आणि प्रशिक्षित उमेदवारांची मागणीही वाढली आहे. ‘इंडिया ब्रँड इक्विटी फाऊंडेशन’च्या मते, 2014-2015 मध्ये भारतात येणार्‍या परदेशी पर्यटकांची संख्या सुमारे साडेसात टक्क्यांनी वाढली आहे. हीच वाढ 2017 मध्येही कायम राहील, अशी खात्री आतापर्यंत वाढलेल्या पर्यटकांच्या संख्येवरून पटली आहे. मोठ्या शहरांबरोबरच छोट्या शहरांमध्येही आता रेस्टॉरंट उभे राहत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, हॉटेल उद्योगात आता तज्ज्ञ, प्रशिक्षित व्यावसायिकांची गरज मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ‘फूड प्रॉडक्शन’ हा हॉटेल व्यवसायाशी संबंधित एक महत्त्वपूर्ण विषय ठरला आहे.

कामाचे स्वरूप :

कोणत्याही रेस्टॉरंट, हॉटेल किंवा फास्ट फूड जॉइंट, फूड स्टॉलवर खाण्याचे पदार्थ तयार करणे हे फूड प्रॉडक्शन क्षेत्रातील व्यक्‍तीचे काम असते. फूड प्रॉडक्शन मॅनेजरचे काम एवढ्यापुरतेच सीमित नसते, तर मेन्यू ठरविणे, आवश्यक साहित्य मागवून घेणे, तयारीचे अवलोकन करणे, किचन स्टाफला सूचना देणे या जबाबदार्‍याही फूड प्रॉडक्शन मॅनेजरला पार पाडाव्या लागतात. शेफ या नात्याने स्वादिष्ट भोजन तयार करणे ही त्याची जबाबदारी आहे; कारण भोजनाच्या दर्जानुसारच तेथे येणार्‍या ग्राहकांची संख्या कमी-अधिक होत असते. फूड प्रॉडक्शन मॅनेजरला वेगवेगळ्या प्रकारचे जिन्‍नस तयार करण्याची कृती माहीत असणे आवश्यक असते.

अभ्यासक्रम आणि पात्रता

या अभ्यासक्रमाशी संबंधित शिक्षणसंस्थांचे संचालक सांगतात की, या व्यवसायात सध्या मिळत असलेला मानमरातब आणि पैसा पाहून या क्षेत्राकडे आकृष्ट होणार्‍यांची संख्या वाढते आहे. रुचकर पदार्थांमधील अनेक जाणकार करिअर म्हणून या क्षेत्राकडे पाहू लागले आहेत. या क्षेत्रात येण्यापूर्वी उमेदवाराला दहावी किंवा बारावी उत्तीर्ण व्हावे लागते. दहावी पास उमेदवाराला पदविका अभ्यासक्रमासाठी तर बारावी पास उमेदवाराला पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. या आवश्यक पात्रतेव्यतिरिक्‍त स्वयंपाकात रस असावा लागतो. 

सतत नवनवीन डिशेस कशा बनविता येतील याचा शोध घेण्याची वृत्ती हवी आणि खाणार्‍यांना त्या डिशेस पसंत पडल्यास त्यातून आनंद मिळायला हवा. स्वादाबरोबरच स्वास्थ्य जपणारे पदार्थ कसे बनविता येतील, याचे उमेदवाराला ज्ञान हवे.

रोजगाराच्या संधी

फूड क्राफ्ट, फूड प्रॉडक्शन, फूड अँड बेवरेजेस सर्व्हिस, किंवा बेरी कन्फेक्शनरी विषयात पदवी, पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या संधींचे अनेक दरवाजे उघडतात. हॉटेल किंवा रेस्टॉरंट, एअर केटरिंग, रेल्वे केटरिंग, आर्मी केटरिंग, फूड प्रोसेसिंग कंपन्या, कन्फेक्शनरी, थीम रेस्टॉरंट, मॉल्स, बेस किचन, खासगी रुग्णालये, क्रूझ लाइनर, कॉर्पोरेट केटरिंग अशा अनेक ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध होते. उत्तम शेफना चांगला पगार मिळतो. याखेरीज खाण्याचे पदार्थ आणि त्यांच्या कृती याविषयी पुस्तके लिहिता येतात. स्वतःचे रेस्टॉरंटही सुरू करता येते.

कमाई किती?

शिकाऊ फूड प्रॉडक्शन मॅनेजरला 10 ते 15 हजार रुपये वेतन मिळू शकते. दहा वर्षांच्या अनुभवानंतर कमाई 50 हजार रुपयांपर्यंत वाढू शकते. हॉटेल मॅनेजमेंट विषयातील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित संस्थेत इंटर्नशिप आणि प्रशिक्षण घ्यावे लागते. फूड प्रॉडक्शन मॅनेजरचे प्रशिक्षण घेतल्यानंतर आणि थोडा अनुभव पदरी पडल्यानंतर वर्षाकाठी सहा ते बारा लाखांपर्यंत कमाई सहजपणे करता येते.