Mon, Jan 20, 2020 09:24होमपेज › Edudisha › डिजिटल इंडिया - करिअर संधी

डिजिटल इंडिया - करिअर संधी

Published On: Sep 10 2019 1:21AM | Last Updated: Sep 10 2019 1:21AM
दीपक शिकारपूर

आज डिजिटल युग घराघरात पोहोचलेले आढळते. प्रथमतः कॉम्प्युटरमुळे आणि गेल्या पाच-दहा वर्षांत स्मार्टफोनमुळे बहुतेकांची नव्या डिजिटल सुविधांशी तोंडओळख नक्कीच झाली आहे! नेटबँकिंग, डिजिटल वॉलेट ऊर्फ पैशाचे इलेक्ट्रॉनिक पाकीट यांसारख्या संकल्पनांचा वापर दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात दिसतो आहे. पण ही झाली खासगी आणि वैयक्तिक पातळीवरची परिस्थिती - खुद्द भारतीय सरकारी कामकाजाचा हत्ती आपली गजगती मागे टाकून डिजिटल बदलांबरोबर प्रवास करू लागेल ही बाब काही वर्षांपूर्वी कोणाला स्वप्नातही पटली नसती! आता मात्र सरकारी कामकाज डिजिटल म्हणजेच ‘नेट’ वरून होऊ लागले आहे आणि विविध सरकारी योजनांचा लाभ घेणेही नेटमुळे शक्य होणार आहे. सरकारी कारभाराचा ‘इन-लाईन’ पासून ‘ऑन-लाईन’पर्यंतचा हा प्रवास बर्‍यापैकी वेगाने होत आहे. नोटाबंदीनंतर कॅशलेस आणि लेस-कॅश हे रोजच्या वापरातले शब्द बनले आहेत, अगदी कोपर्‍यावरच्या पानवाल्यापासून उद्योजकांपर्यंत.

कोणी म्हणेल हे सगळे ठीक आहे; पण मुळात - इतके दिवस ज्याच्याशी काहीही संबंध आला नाही, अशा - नवतंत्रज्ञानाचा रोजच्या व्यवहारांत सफाईने वापर अचानक सुरू करणे याच सर्वसामान्य नागरिकांना सहजशक्य आहे का? याचे उत्तर होय आणि नाही अशा दोन्ही प्रकारे देता येईल. वापरकर्त्याची मानसिकता आणि कल पाहून, थोडेसे प्रशिक्षण दिले तर लहानमोठे डिजिटल व्यवहार करणे कोणालाही अशक्य नाही. यामुळे व्यवहार पारदर्शकतेने आणि लवकर होऊन नेटमार्फतच्या संभाव्य फसवणुकीचे प्रमाण कमी होईल आणि ‘डिजिटल नेशन’ चा व्यापक हेतू सफल होण्यासही मदत होईल.

पण हे जरी सहज साध्य वाटत असले तरी आपल्या देशात सर्वांना हे आपोआप जमेल ही अपेक्षाच अवास्तव आहे. जसे पूर्वी निरक्षरांना मदतीसाठी लेखनिक असत तसेच डिजिटल मदतनीस सर्वत्र (अगदी शहरी भागातही) हजारोंच्या संख्येत लागणार आहेत. हे एक अर्थार्जनाचे साधन तसेच सामाजिक कटिबद्धतेचे सामूहिक उदाहरण असू शकते.

कोणत्याही व्यवहारामध्ये देणारा आणि घेणारा यांच्या मध्ये सरळ व्यवहार होत नाही. हा व्यवहार दोघांच्याही मनाप्रमाणे व्हावा यासाठी मध्यस्थी करणारा एक मध्यस्थ हवा असतो. कोणीही आपल्या आयुष्यात असा व्यवहार प्रथमच करतो, त्यामुळे त्याला ते पायंडे नियम, माहीत नसतात. म्हणून अशा व्यवहारांमध्ये हे सारे नियम आणि पायंडे माहीत असणारा डिजिटल मध्यस्थ गरजेचा असतो. असा मध्यस्थ पैसे कमावतो. परंतु, त्याच्यामुळे व्यवहारातल्या दोन्ही बाजूंच्या व्यक्तींना समाधान प्राप्त होत असते. विशेष म्हणजे मध्यस्थी करण्याचा असा व्यवसाय हा बिनभांडवली व्यवसाय असतो. त्या व्यवहाराची त्या व्यक्तीला असलेली डिजिटल माहिती हेच त्याचे भांडवल असते.

डिजिटल मध्यस्थ ही एक संकल्पना  आहे की जिला स्मार्टफोन इंटरनेट या आयुधांचा वापर करणे जमले आहे. सुशिक्षित पदवीधरांबरोबरच घरकामात गढलेल्या  गृहिणीलाही हे शक्य आहे. गेल्या पिढीपर्यंत गृहिणीला दुसरे काही करणे शक्यच नसायचे कारण घरातली कामेच आवरताना तिचा दिवस (आणि उत्साह) संपत असे. परंतु, सध्या नवतंत्रज्ञान हाताशी असल्याने, विभक्त कुटुंबांमुळे आणि बर्‍याचश्या  सुशिक्षित घरांनी स्वीकारलेल्या सामाजिक बदलांमुळे स्त्रीच्या मागचा घरकामाचा एकंदर रगाडा कमी झाला आहे आणि नवा विचार स्वीकारून अमलात आणणे तिला शक्य झाले आहे, असे म्हणता येईल.  एकदा का आपण डिजिटल कौशल्यात पारंगत झालात की अनेक व्यवहारी, व्यक्ती संबंधांचे पैलू आपण हाताळू शकाल. खरंच ‘कर लो दुनिया मुट्टीमे’  हे स्वप्न आता करिअर म्हणून सहज शक्य आहे.

यासाठी ज्यांना हा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यांनी प्रथम या योजनांची माहिती करून घ्यायला हवी. https://lms.negd.in/ या संकेतस्थळावर डिजिटल साक्षर व्यावसायिक या संबंधी शिक्षणाच्या द़ृष्टीने इत्यंभूत माहिती आहे, एकदा हे ज्ञान मिळाले की  बॅँकेत खाते उघडणे, आधार किंवा पॅन कार्ड मिळवणे, डेबिट किंवा एटीएम कार्ड मिळवणे व ते वापरणे, गावाकडे पैसे ट्रान्स्फर करणे, कॅशलेस पद्धतीने विविध बिले भरणे, वस्तू मागवणे, महत्त्वाची कागदपत्रे ‘डिजिटल लॉकर’ मध्ये ठेवणे...अशी अनेक कामे आपण मध्यस्थ म्हणून करू शकाल. या व्यवसायासाठी लागणारे भांडवल म्हणजे स्मार्ट फोन, लॅपटॉप व बर्‍यापैकी वेगाचे इंटरनेट कनेक्शन ग्राहक वृद्धीसाठी सहकारी बँका, पतपेढ्या गाठा व त्यांची मदत मार्केटिंग (व्यवसाय मिळवणे) साठी घ्या. अशा प्रकारचे कौशल्य असणारे अनेक व्यावसायिक या क्षेत्राला गरजेचे आहेत. डिजिटल इंडिया व इ-अर्थकारणामार्फत अनेकांना एक शाश्वत कमी भांडवली लघु उद्योजकतेची संधी निर्माण झाली आहे.