होमपेज › Edudisha › बुद्धिमत्ता चाचणीच्या माध्यमातून करिअर निवडा

बुद्धिमत्ता चाचणीच्या माध्यमातून करिअर निवडा

Published On: Oct 09 2018 12:30AM | Last Updated: Oct 08 2018 7:48PMमेघना ठक्‍कर

केवळ कर्तव्यापोटी निवडलेले करिअर उज्ज्वल भवितव्याकडे नेईलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे करिअरची निवड करताना बहुतांशी मुले दबावाचा सामना करतात.

करिअर निवडणे हे आजच्या युवकांसमोर मोठे आव्हान मानले जाते. सर्वच क्षेत्रात स्पर्धा असून, त्यात सरस करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेची कस लागते. कधी-कधी काही पालकांच्या दबावापोटी किंवा समाजाच्या दबावापोटी काही विद्यार्थ्यांना इच्छा नसताना अन्य करिअरकडे वळावे लागते. तेथे त्यांची कामगिरी बेस्ट होतेच, परंतु आत्मिक समाधान लाभत नाही. कारण शाळा किंवा कॉलेजमध्ये असताना स्वत:ची क्षमता, रुची किंवा अ‍ॅप्टिट्यूड ओळखण्यासाठी फार कमी संधी मिळते. विद्यार्थ्यांच्या मनावर आलेला दबाव दूर करण्यासाठी इंटिलिजिन्स टेस्टस (बुद्धिमत्ता चाचणी) मदतगार ठरू शकते. शिक्षणतज्ज्ञ हे बुद्धिमत्ता चाचणीला व्यक्‍तिमत्त्व आकलन करण्यासाठी सर्वात योग्य आणि प्रभावी माध्यम मानतात. शालेय आणि व्यवसायिक पातळीवर बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन केले जाते आणि त्या माध्यमातून युवकाला-युवतीला कोणते करिअर सुटेबल आहे, याची दिशा मिळते. त्यामुळे या चाचणीचे विविध पैलू जाणून घेतल्याशिवाय त्याचे महत्त्व आपल्या लक्षात येणार नाही. 

सर्वसाधारणपणे शिक्षक किंवा पालक बौद्धिक पातळीचा विचार करताना विद्यार्थ्यांना हुषार, बुद्धिमान, मंद किंवा मठ्ठ या श्रेणीत विभागणी करतात. ही विभागणी आपण कशाच्या आधारे करतो, तर आपण हुशार किंवा मठ्ठ ठरवणारी काही पारंपरिक मापक डोळ्यासमोर आणतो आणि त्यातून आपण कोणता मुलगा हुशार आहे किंवा नाही, हे ठरवतो. त्यानुसार कोणत्या विद्यार्थ्याला कोणते करिअर पूरक ठरेल याचा सल्ला दिला जातो. परंतु, करिअर निश्‍चितीचा हा मार्ग योग्य नाही. प्रत्यक्षात बुद्धिमत्ता ही अनेक मार्गांची असते आणि कोणत्या विद्यार्थ्यात कशी आणि कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे, हे वरवर विचार करून ठरवू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांत कोणती बुद्धिमत्ता हे आपल्याला बुद्धिमत्ता चाचणीच्या माध्यमातून समजू शकते. 

बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे काय? बुद्धिमत्ता चाचणी ही अशी मनोवैज्ञानिक चाचणी आहे, की त्या माध्यमातून वेगवेगळ्या मेंटल फक्शन्स जसे के रिजनिंग, कॉम्प्रिहेन्शन, जजमेंट आदींचे आकलन केले जाते. अशा चाचणीचा उद्देश हा व्यक्‍तीच्या बुद्धिमत्तेचे आकलन करणे होय. या चाचणीत विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे त्याचे विश्‍लेषण केले जाते. सर्वसाधारणपणे बुद्धिमत्ता चाचणी हे अनेक चाचणीचे एकत्रीकरण करून केले जाते. 

चाचणीचे किती प्रकार :

सर्वात प्रथम फ्रेंच मनोवैज्ञानिक एल्फ्रेड विनेट यांनी चाचणी परीक्षेचे नियोजन केले होते. त्याच्या मते, जर एखाद्या विद्यार्थ्याचे नियमित अभ्यासात मन रमत नसेल तर त्या विद्यार्थ्यावर लक्ष कसे केंद्रीत करता येईल, यासाठी ही चाचणी शिक्षकांना फायदेशीर ठरणारी होती. कोणत्याही विद्यार्थ्याला शिकवण्याअगोदर या चाचणीच्या माध्यमातूनच तो पुढे अभ्यास करणार आहे की नाही, याचे आकलन शिक्षकाला होते. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्याला विश्‍वासात घेऊन त्याला अभ्यासाकडे कसे नेता येईल, त्यानुसार अभ्यासक्रमाची रचना केली गेली. त्यानंतर स्टॅनफोर्डचे मनोवैज्ञानिक लुईस टर्मन यांनी या चाचणीच्या आधारावर स्टॅनफोर्ड विनेट चाचणी विकसित केली. यादरम्यान बुद्धिमत्तेचा कस लावणार्‍या अनेक चाचण्या विकसित झाल्या. या माध्यमातून गणितीय आणि तार्किक क्षमतेचे आकलन केले जाऊ लागले. भारतात या चाचणीला विनेट-कामथ टेस्टच्या नावानेे स्वीकारण्यात आले. 

मल्टिपल इंटिलिजन्स टेस्ट : 

हॉवर्ड गार्डनरच्या मल्टिपल इंटिलिजन्स थेरी ही व्यापकपणे मानवीय क्षमतेबद्दल सांगते. त्यांच्या मते, जो विद्यार्थी अ‍ॅकाडॅमिक्सशिवाय संगीत किंवा खेळात चांगले प्रदर्शन करतो, त्यांनाही इंटिलिजन्ट मानले पाहिजे. त्यांच्या मतानुसार सर्व विद्यार्थ्यांत वेगवेगळ्या क्षेत्रासाठी कम्प‘टिबल कॅरेक्ट्रिस्टिक्स असतात. अशा स्थितीत सर्व विद्यार्थ्यांना एकाच मापाने मोजता येणार नाही. 

चाचणीचे फायदे कोणते ?: 

इंटलिजन्स टेस्टमध्ये सहभागी झाल्याने विद्यार्थ्यांना आपली क्षमता समजते. ज्याकडे विद्यार्थी कधीही लक्ष देत नाहीत अशा गोष्टी या चाचणीतून समजतात. आपली आवड, उणिवा, दोष या गोष्टीचे आकलन बुद्धिमत्ता चाचणीतून होते. या गोष्टींची माहिती झाल्यास विद्यार्थ्याला करिअर करणे सोपे जाते. त्याचबरोबर आपल्या व्यक्‍तिमत्त्वाला साजेशे असणारे करिअर निवडल्याने भविष्य अधिक स्थिर आणि सुरक्षित राहते.