Thu, Nov 14, 2019 07:01होमपेज › Edudisha › खनिकर्म क्षेत्रातील आव्हानात्मक करिअर

खनिकर्म क्षेत्रातील आव्हानात्मक करिअर

Published On: Jul 09 2019 1:00AM | Last Updated: Jul 09 2019 1:00AM
विधिषा देशपांडे

मायनिंग म्हणजेच खनिकर्म विषयात ज्या युवकांना रस आहे, त्यांच्यासाठी एक उत्तम करिअरसंधी उपलब्ध आहे. आवड असेल तरच या क्षेत्रात पदार्पण करावे, कारण या क्षेत्रात आव्हाने मोठी असतात. अर्थातच त्यामुळेच प्रशिक्षित, हुशार आणि तज्ज्ञ अभियंत्यांची या क्षेत्राला कायम गरज लागते. या क्षेत्रात पदार्पण कसे करावे, याची माहिती...

जमिनीच्या पोटात दडलेली प्रचंड खनिज संपत्ती हाच आपल्या जगण्याचा मुलाधार असतो. परंतु, खनिजांचा बेसुमार आणि अशास्त्रीय उपसा पर्यावरणीय असंतुलन निर्माण करतो. त्यामुळे मानवी उपयोगासाठी ही नैसर्गिक संपदा पृथ्वीच्या पोटातून बाहेर काढताना प्रशिक्षित आणि दक्ष अभियंत्यांची गरज असते. खनन अभियंता म्हणून या क्षेत्रात पदार्पण करणार्‍यांना अनेकांचे नेतृत्व करावे लागते. खनन अभियांत्रिकीच्या क्षेत्रात करिअर बनविण्यासाठी विशेष प्रशिक्षण आणि कौशल्याची गरज असते. आपल्या देशात खनिजांचे विपुल भांडार आहे. मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड आणि पश्‍चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर खनिजांचे साठे आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत खनिजांना मोठे महत्त्व असते. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी प्रशिक्षित खनन अभियंत्यांना असलेली मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. 

कामाचे स्वरूप

खनन अभियांत्रिकी विषयांतर्गत जमिनीच्या पोटात असलेल्या खनिजांच्या साठ्याचा शोध लावणे आणि सुरक्षित पद्धतीने ती बाहेर काढण्याच्या प्रक्रियेचा समावेश होतो. खनन अभियांत्रिकीच्या कार्यक्षेत्रात प्रामुख्याने उत्खनन, कच्चे खनिज पदार्थ काढणे आणि त्यांचे शुद्धीकरण हे विषय येतात. खनिजांपासून धातू आणि मिश्रधातूंचेच केवळ उत्पादन या क्षेत्रात होते असे नाही, तर या प्रक्रियेमुळे पर्यावरणावर होणार्‍या प्रतिकूल परिणामांचा अभ्यास करून ते कमी करण्याचा प्रयत्नही केला जातो. सुनियोजित अशा भू-प्रायोगिक सर्वेक्षणानंतरच खनिकर्म सुरू केले जाते. पृथ्वीच्या पोटात ठराविक क्षेत्रात किती खनिजपदार्थ आहेत हे या सर्वेक्षणातूनच निष्पन्‍न होते.

अभ्यासक्रम आणि पात्रता

खनन अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराला बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह उत्तीर्ण होणे आवश्यक असते. प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराला बी. टेक., बी. ई. (मायनिंग), बी. एससी. (मायनिंग इंजिनिअरिंग) या अभ्यासक्रमांत प्रवेश दिला जातो. खनन अभियांत्रिकीच्या विविध अभ्यासक्रमांचा निर्धारित कालावधी तीन ते पाच वर्षांचा असतो.  यानंतर उमेदवाराला एम. टेक. किंवा एम. ई. असे पदव्युत्तर अभ्यासक्रमही करता येतात. हे अभ्यासक्रम दोन वर्षांचे असतात. खनन अभियांत्रिकीच्या कोणत्याही अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना उमेदवाराचे वय 16 ते 21 वर्षांदरम्यान असणे आवश्यक असते. 

प्रवेशप्रक्रिया : खनन अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देणार्‍या संस्थांमध्ये प्रवेश परीक्षेच्या आधारावरच प्रवेश दिला जातो. यासाठी विविध संस्था अखिल भारतीय स्तरावर प्रवेश परीक्षेचे आयोजन करतात. प्रवेशासाठीची लेखी परीक्षेत मुख्यत्वे बारावीच्या स्तरावरील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी विषयांचे प्रश्‍न विचारले जातात. भारतातील अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त करणार्‍या इंडियन स्कूल ऑफ माइन्समध्येही अनेक अभ्यासक्रम उपलब्ध असून, त्यात मायनिंग इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग, मिनरल इंजिनिअरिंग आणि मशिनरी मायनिंग या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या संस्थेतील प्रवेशासाठी दरवर्षी साधारणतः जानेवारी-फेब्रुवारीत प्रवेशपत्र भरून घेतले जाते. 

नोकरीच्या संधी : रोजगाराच्या द‍ृष्टीने खनन अभियांत्रिकी क्षेत्रातील अनुभवी व्यक्‍तींची मागणी सतत वाढतच जाते. सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रांत खनन अभियंत्याला करिअर घडविण्याचे मुबलक पर्याय उपलब्ध आहेत. या क्षेत्रात अध्यापन आणि संशोधनही करता येणे शक्य आहे. टाटा आयर्न अँड स्टील, रिलायन्स पेट्रोलियम, इंडियन ऑईल, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, सरकारी खनन महामंडळ यांसारख्या अनेक संस्थांमध्ये नोकरीच्या नामी संधी या क्षेत्रातील अभियंत्यांना उपलब्ध आहेत. हिंदुस्थान झिंक लिमिटेड, नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, इंडियन ब्यूरो ऑफ माईन्स लिमिटेड अशा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्येही खनन अभियंत्यांना मोठी मागणी आहे. याखेरीज मायनिंग रिसर्च सेंटर धनबाद, इंडियन एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड, इंडियन डिटोनेटर्स लिमिटेड या उपक्रमांतही रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. अभियंत्यांना परदेशात जाऊनही करिअर घडविता येईल.

अर्थप्राप्ती : खनन अभियंत्याला अत्यंत आकर्षक वेतन मिळते. काम जोखमीचे असल्याने जमिनीखाली खाणीत काम करणार्‍या अभियंत्यांना जमिनीच्या पृष्ठभागावर काम करणार्‍या अभियंत्यांपेक्षा अधिक वेतन दिले जाते. खनन अभियंत्याला सुरुवातीला 25 ते 30 हजारांच्या दरम्यान मासिक प्राप्ती होऊ शकते. खाणीत काम करणार्‍या अभियंत्याला मासिक 40 ते 50 हजार सुरुवातीचे वेतन मिळू शकते. अनुभव वाढेल, तसे वेतनही वाढत जाते.