Thu, Apr 25, 2019 11:47होमपेज › Edudisha › टेलिकम्युनिकेशन्स इंडस्ट्रीमधील करिअर्स

टेलिकम्युनिकेशन्स इंडस्ट्रीमधील करिअर्स

Published On: Aug 07 2018 1:04AM | Last Updated: Aug 06 2018 7:45PMप्रा. मनोहर हिरीकुडे

21 व्या शतकात माहिती तंत्रज्ञान आणि तत्सम इतर आवश्यक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने टेलिकम्युनिकेशन अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्री अतिशय गतीने विकसित होणारी इंडस्ट्री ठरली आहे. त्यामुळे या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात मनुष्य बळाची गरज भासते आहे.

सध्या आपल्या  डोळ्यासमोर टेलिकम्युनिकेशन क्रांती घडून येते आहे आणि आपल्या सर्वांच्या जीवनावर होणारा परिणाम जाणवतो आहे. जर एखादा लेख जर आपल्या मोबाईल फोनवरून तुम्हाला उपलब्ध  होत असेल तर त्याचे संपूर्ण श्रेय टेलिकम्युनिकेशन क्षेत्रामध्ये होत असणार्‍या प्रगतीला द्यावे लागेल. आजच्या 21 व्या शतकात माहिती तंत्रज्ञान आणि इतर आवश्यक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने टेलिकम्युनिकेशन अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. टेलिकम्युनिकेशनच्या सुरुवातीच्या काळात लँडलाईन फोन वापरासंदर्भात लोकसंख्येच्या प्रमाणात 10% टप्पा गाठणे देखील मुश्कील होत होते; पण आज रोजी 1150 दशलक्ष इतके वर्गणीदार देशामध्ये लँडलाईन फोनचा वापर करीत आहेत. 

अशारीतीने ‘टेलिकॉम कम्युनिकेशन्स इंडस्ट्रीअतिशय गतीने विकसित होणारी इंडस्ट्री ठरली असून गत वर्षीचा या क्षेत्राचा वृद्धी दर 19.16 टक्के इतका आहे. त्याचबरोबर या क्षेत्रात फार मोठी स्पर्धा अस्तित्वात आहे. बहुतेक टेलिफोन कंपन्या काळानुरूप आपल्या कार्यप्रणालीमध्ये आवश्यक तो बदल घडवून आणत आहेत. त्यामुळे या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात मनुष्य बळाची गरज भासत आहे. 
सद्यःस्थिती लक्षात घेता  टेलिकम्युनिकेशनच्या बाजारपेठेत भारत द्वितीय क्रमांकाचा देश म्हणून गणला जातो. मोबाईल क्षेत्रातील आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असून तिचा परिणाम भारताच्या एकूण जीडीपी (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) वृद्धीमध्ये होण्याची शक्यता संभवते आहे.

बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (बीसीजी) या संस्थेने सादर केलेल्या अहवालानुसार जगभरातील ‘अ‍ॅप’ आर्थिक उलाढालीमध्ये चौथ्या क्रमांकावर आपला देश विराजमान झाला असून ‘अ‍ॅप्स’ आपल्या कम्युनिकेटिंग, शॉपिंग इत्यादीमध्ये दररोज नवनवे बदल घडवून आणत आहेत. मायक्रोसॉफ्ट या संस्थेने जाहीर केलेल्या एका अहवालानुसार 2025 पर्यंत संपूर्ण जगातील 4.8 बिलियन यूजर्सपैकी 700 मिलियन (दशलक्ष) इंटरनेट यूजर्स निर्माण करून भारत या क्षेत्राचे नेतृत्व करण्याची क्षमता प्राप्त करेल. या क्षेत्राच्या या विकास गतीचे श्रेय या क्षेत्राला प्रोत्साहित करणार्‍या केंद्र सरकारच्या धोरणांना आहे. कारण त्यामुळे अधिक गुंतवणूकदार या क्षेत्राला पसंती देत आहेत. भूतकाळाशी तुलना करता टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेस आता परवडणार्‍या दरामध्ये सहजपणे उपलब्ध आहेत. त्यामुळे हे क्षेत्र दिवसेंदिवस व्यापक होत जाणार आहे. सध्या 3 डी आणि 4 डी (3G & 4G) नेटवर्कस उपलब्ध आहेत आणि 5G सुद्धा फार काळ दूर राहणार नाही. सातत्याने विकसित होत जाणारे असे हे क्षेत्र आहे. 

हा व्यवसाय दोन भागामध्ये विभागलेला आहे. पहिला भाग म्हणजे याकरिता लागणारी साधनसामग्री आणि दुसरा भाग म्हणजे नेटवर्कस् होय. पहिल्या भागामध्ये इक्युपमेंटस्, हँडसेटस् आणि ट्रान्समिशन टॉवर्स इत्यादींचा समावेश होतो. दुसर्‍या भागामध्ये एअरवेवज, स्पेक्ट्रम यांचा समावेश असतो. बिनतारी म्हणजेच वायरलेस नेटवर्कस्ना केबलिंगसह योग्य त्या उपकरणांची बांधणी (इन्फ्रास्ट्रक्‍चर) आवश्यक असते. त्यामुळे या क्षेत्रामध्ये टेक्निकल तसेच व्यवस्थापकीय नोकर्‍या उपलब्ध असतात.

 टेक्निकल स्वरूपाच्या नोकर्‍या पुढील विभागात उपलब्ध असतात. 

नेटवर्क मॅनेजमेंट- यामध्ये बेस स्टेशन सर्व्हिस मुख्य/केंद्रीय नेटवर्क, फिल्ड मेन्टेनन्स,  ट्रान्समिशन ऑप्टिकल फायबर, ब्रॉडबँड इन्टालेशन, नेटवर्क सिक्युरिटी इत्यादी घटकांचा समावेश आहे. • अ‍ॅप्लिकेशन्स डेव्हलपमेंट - यामध्ये मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स/गेम्स/अ‍ॅप्स डेव्हलपर हँटसेट/सॉफ्टवेअर डेव्हलपर, एम्बेडेड हार्डवेअर डेव्हलपर, नेटवर्क सॉफ्टवेअर डेव्हलपर इत्यादी घटक अंतर्भूत असतात. 

बॅकग्राऊंड/पॅसिव्ह इन्फ्रास्ट्रक्‍चर - अशा प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्‍चरमध्ये यूजर्सचा (वापर करणारे) डायरेक्ट संबंध थेट नसला तरी हे घटक टेलिकॉम सेवा उपलब्ध करून देण्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडतात. अशा यंत्रणेमध्ये ट्रान्समिशन टॉवर, रेडिओन्फ्रिक्‍वेन्सी इत्यादींचा समावेश असतो.

टेक्निकल सर्व्हिस सपोर्ट - अशा प्रकारच्या सर्व्हिस सपोर्टमध्ये साईट वस्ती आणि साईट व्यतिरिक्‍त इतर भागामध्ये सपोर्ट सेवा तसेच समस्यांचे निराकरण करण्याची कार्यवाही केली जाते. 

वरील सर्व प्रकारच्या कार्यपूर्तीसाठी टेलिकॉम कंपन्यांना स्किल्ड टेक्निशियन्सची आवश्यकता भासते. पदवी किंवा इतर कोणत्याही पात्रतेपेक्षा कार्य कौशल्य असणार्‍यांना अधिक प्राधान्य दिले जाते. अर्थात अधिक जबाबदारीच्या पदावर काम करण्याकरिता कंपन्यांना पदवीधर इंजिनिअर्सची गरज असते. यामध्ये बी. ई., बी. टेक. किंवा बी.एस.सी. (इंजिनिअरिंग) पदवी पात्र उमेदवारांचा समावेश होतो. 

•शैक्षणिक संस्था- इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विषयात शिक्षण/प्रशिक्षण देणार्‍या नामांकित संस्थांमध्ये पुढील काही शिक्षण संस्थांचा समावेश केला जातो. अशा शिक्षण संस्थांमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर, दिल्‍ली, चेन्‍नई, खरगपूर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वारंगल, धिरूभाई अंबानी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फार्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, गांधीनगर, मोतीलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अलहाबाद, दिल्‍ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, दिल्‍ली, एम. एस. एम.च्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बेंगलोर मनिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मनिपाल, विश्‍वेशरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर, कोचिन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कोची इत्यादी ख्यातनाम संस्थांचा अंतर्भाव केला जातो. 

याशिवाय मार्केटिंग, मानवी श्रम व्यवस्था, फायनान्स अशा व्यवस्थापकिय स्वरुपाच्या कामाकरिता टेलिकॉम कंपन्यांना टेलिकॉम मॅनेजमेंट या विषयात कौशल्य प्राप्त केलेल्या उमेदवारांची आवश्यकता भासते. याकरिता आवश्यक असणार्‍या प्रशिक्षण देणार्‍या शैक्षणिक संस्थांमध्ये एम. आय. टी. स्कूल ऑफ टेलिकॉम मॅनेजमेंट, पुणे, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे, रिजनल कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, भुवनेश्‍वर, ओरिसा, इत्यादी संस्थांचा समावेश केला जातो. 

दिवसेंदिवस विस्तारत जाणार्‍या या टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. मुख्यत्वेकरून सॅमसंग, नोकिया, लिनोवो, डेल, रिलायन्स, कारबोन, लावा, मायक्रोमॅक्स अशा हार्डवेअर पार्ट निर्मिती कंपन्यांमध्येे तसेच भारती एअरटेल, वोडाफोन, आयडिया सेलूलर, भारत संचार निगम लिमिटेड, महानगर टेलिफोन निगर लिमिटेड या टेलिकॉम कंपन्या देखील सातत्याने कर्मचारी भरती करीत असतात. या व्यतिरिक्‍त वैयक्‍तिक स्तरावर कार्यरत असणार्‍या अ‍ॅपल, फेसबुक, लिंकेडिन अशा कंपन्यांना देखील टेलिकॉम प्रोफेशन कर्मचार्‍यांची आवशक्यता असते.