Sun, Apr 21, 2019 05:48होमपेज › Edudisha › मनाचा वेध घेणारं करिअर

मनाचा वेध घेणारं करिअर

Published On: Oct 22 2018 10:03PM | Last Updated: Oct 22 2018 10:03PM
 स्वाती देसाई
 

गेल्या काही दशकांत आपली समाजव्यवस्था आणि जीवनशैली या दोन्हीत प्रचंड बदल झाला आहे. त्याचा परिणाम लोकांच्या मानसिकतेवर होत आहे. यातून नागरिकांना मानसिक ताणतणावांना सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच आजच्या काळात सायकोलॉजिस्टची मागणी वाढत चालली आहे. जर आपल्याला लोकांच्या भावना जाणून घेण्याबाबत आणि नैराश्य दूर करण्यासाठी प्रयत्न करू इच्छित असाल तर आपण सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करण्याच्या दिशेने करिअर करू शकतात. 

सायकॉलॉजी म्हणजेच मानसशास्त्र हा मानवाच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करणारा विषय मानला जातो. यात मानवी मेंदूचे आकलन केले जाते. लोक काय, कसा विचार करतात, कसे वागतात याचे अध्ययन केले जाते. भावनात्मक आणि सामाजिक रूपाने त्यांचा कशारितीने विकास होतो, निष्कर्ष कसे काढले जातात आणि नागरिकांच्या विचारांना सकारात्मक दिशा कशी देता येईल, याचे संशोधन या विषयात होते. आजच्या घडीला आधुनिक जीवनशैली, वाढती स्पर्धा आणि पुढे जाण्यासाठी सर्वांवर असलेला मानसिक दबाव, निद्रानाश यातून अनेक मानसिक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्येवर समाधान शोधण्याचे काम मानसशास्त्रातून होते.

मानसशास्त्राच्या अनेक शाखा

मानसशास्त्र क्षेत्र व्यापक आहे. हा एक विषय असून त्याविषयांतर्गत अनेक शाखा आहेत. आपण आवडीच्या कोणत्याही शाखेत प्रावीण्य मिळवू शकतो. या शाखेतील उपशाखा जाणून घेता येईल.

डेव्हलपमेंट सायकॉलॉजी : वयाबरोबर आपल्या विचारांच्या प्रक्रियेत आणि अनेक घटकांकडे पाहण्याचा द‍ृष्टीकोनही बदलतो. आता डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी हे शीशूवयोगटापासून किशोर अवस्था आणि वृद्धावस्था या स्थितीत होणार्‍या वैचारिक बदलाचा अभ्यास करते. अशा बदलामुळे वागण्यात, बोलण्यात, राहणीमानात होणार्‍या परिणामाचे अध्ययन केले जाते. 

क्लिनिकल सायकॉलॉजी : मानसशास्त्राची ही महत्त्वाच्या शाखेपैकी ही एक शाखा आहे. फिजिओथेरेपीची या क्लिनिकल सायकॉलॉजीत महत्त्वाची भूमिका आहे. मानसिक बदलाच्या स्थितीपासून निर्माण होणार्‍या प्रश्‍नांचा सामना करणार्‍या मंडळींचे आकलन योग्य रितीने करणे आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी उपाय योजन्याचे काम क्लिनिकल सायकॉलॉजीत केले जाते. 

एज्युकेशनल सायकॉलॉजी : मानव शैक्षणिक वातावरणात कसा राहतो, कसा विचार करतो याचे अध्ययन एज्युकेशनल सायकॉलॉजीत केले जाते. अभ्यास करताना येणार्‍या अडचणींचे अध्ययन या शाखेत केले जाते. मुलांची अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी असलेल्या तंत्राचे आकलन या अभ्यासक्रमाच्या मदतीने केले जाते. 

कॉग्‍निटिव्ह सायकॉलॉजी :  ही शाखा व्यक्‍तीच्या मेंदूची क्षमता आणि प्रश्‍न सोडवण्याची क्षमता याचे आकलन करते. यात विचार करण्याची प्रक्रिया, विचारांचा विकास आणि लक्षात ठेवण्याच्या सवयी समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. ही शाखा शैक्षणिक, सामाजिक आणि औद्योगिक मानसशास्त्रसारख्या अन्य शाखेशी जोडली गेली आहे. 

ऑर्गनायजेशनल/ इंडस्ट्रियल सायकॉलॉजी : 

या शाखेत कामाच्या ठिकाणी काम करण्यायोग्य वातावरण तयार करणे, कर्मचार्‍यांना काम करण्याबाबत प्रेरणा देणे, नोकरीतून समाधान मिळेल, असा तोडगा काढणे यासारख्या गोष्टींचे अध्ययन केले जाते. 

सोशल सायकॉलॉजी : 
सोशल सायकॉलॉजीत सामाजिक वातावरण आणि नागरिकांच्या वर्तनाचे अध्ययन केले जाते. विशिष्ट प्रकारचे विचार, भावना आणि व्यवहार निर्माण करणार्‍या वातावरणाचा देखील अभ्यास केला जातो. यात सामाजिक प्रभाव, समूह गट, परस्पर अवलबूंन असणार्‍या प्रक्रिया यासंबंधी गोष्टींचा समावेश आहे. 

स्पोर्टस् सायकॉलॉजी
मानसशास्त्राच्या या शाखेत अनेक विषयांचा समावेश होतो. जसे की फिजिओलॉजी, बायोमॅकेनिक्स आणि मानसशास्त्राचा समावेश होतो. ही शाखा काही वर्षांपूर्वीच विकसित झाली आहे. कोणत्याही खेळाचे चांगले प्रदर्शन करण्यासाठी शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिकद‍ृष्ट्या सक्षम असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच आजकाल बहुतांश संघाबरोबर क्रीडा मानसशास्त्रीय तज्ज्ञ देखील असतो. अनेक क्रीडा संघटनेत स्पोर्टस् सायकॉलॉजिस्टची सेवा घेतली जाते. 

करिअरची संधी कोठे

मानसशास्त्र किंवा या विषयातील कोणत्याही उपशाखेत मास्टर डिग्री मिळवल्यानंतर सायकॉलॉजिस्ट किंवा कौन्सुलर किंवा शिक्षक म्हणून करिअर सुरू करू शकतो. सायकॉलॉजिस्ट किंवा कौन्सुलर म्हणून स्वतंत्र रूपाने व्यवसाय देखील करता येऊ शकतो. सरकारी किंवा खासगी रुग्णालय, कॉलेज किंवा शाळेतही कौन्सुलर म्हणून जॉब करू शकतो. नेट परीक्षा पास करून आपण महाविद्यालयात अध्यापनाचे काम करू शकता. त्याचबरोबर सामाजिक कल्याण संघटना, संदर्भ संस्था, पुनर्वसन केंद्र, तुरुंग, मुले आणि युवकांसाठीचे समुपदेशन केंद्र, जागतिक आरोग्य संघटना आदी ठिकाणी देखील मानसशास्त्राची पदवी घेऊन करिअर करता येऊ शकते. 

प्रमुख संस्था

दिल्‍ली विद्यापीठ, नवी दिल्‍ली  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजी अँड रिसर्च (आयआयपीआर) बंगळूर  जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, नवी दिल्‍ली  कोलकता विद्यापीठ  मुंबई विद्यापीठ  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स, बंगळूर   टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई  अलाहाबाद विद्यापीठ