Sat, Sep 21, 2019 05:51होमपेज › Edudisha › रोबोटिक्स क्षेत्रात करिअर 

रोबोटिक्स क्षेत्रात करिअर 

Published On: Jun 11 2019 1:11AM | Last Updated: Jun 18 2019 2:07AM
 डॉ. दीपक शिकारपूर

रोबो ऊर्फ यंत्रमानव ही संकल्पना 1960 च्या दशकातील विज्ञान, विज्ञानकथा आणि हॉलिवूडच्या चित्रपटांत फारच लोकप्रिय झालेली आढळते. त्या काळातील जीवनाच्या एकंदर ‘गती’ मुळे 21 वे शतक म्हणजे 2000 साल फारच दूरचे वाटायचे! त्यामुळे मानवाची विलक्षण तांत्रिक प्रगती होऊन त्याच्या दैनंदिन जीवनातली बरीचशी किचकट आणि कंटाळवाणी कामे रोबोच करतील, असा तत्कालीन शास्त्रज्ञांचा अंदाज होता.

दरम्यान गेल्या 50 वर्षांत मानवाने तांत्रिक प्रगती भरपूर केली, परंतु त्या दिशेने नाही, असे दिसून येते. म्हणजे असे की औद्योगिक क्षेत्रात सूक्ष्म आणि किचकट कामे अत्यंत अचूकतेने आणि अफाट वेगाने करणारे ऑटोमेशन रोबो निर्माण केले गेले. आज दरदिवशी कोट्यवधींच्या संख्येने स्मार्टफोन्स, वाहने, त्यांमधील मायक्रोचिप्स आणि स्पेअर पार्टस् बनवणे त्यांच्यामुळेच शक्य होते. आता सूक्ष्मतंत्रज्ञान (नॅनोटेक्नॉलॉजी), बदलत्या उत्पादनपद्धती आणि नैसर्गिक जीवसृष्टीत आढळणार्‍या घटकांचे यांत्रिक रूप बनवणे शक्य झाल्याने रोबोंचेही स्वरूप बदलते आहे आणि त्यांच्या कामाचा आवाकाही वाढला आहे.

रोबोटिक्स (ठेलेींळली) हा शब्द आपल्याला 1990 पासून माहीत असला तरी त्याचा वापर व्यावहारीक पातळीवर मोठ्या प्रमाणात झालेला आढळू लागला आहे गेल्या दहावीस वर्षांत. रोबोटिक्स हे अभियांत्रिकी किंवा शास्त्र शाखेचेच एक अंग असले तरी त्यामध्ये मेकॅनिकल तसेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स आणि इतरही काही तंत्रशाखांचा सारखाच सहभाग असतो या तंत्रज्ञानांच्या संयोगातून बनवल्या जाणार्‍या रोबोंचा वापर सध्या प्रत्येकच क्षेत्रामध्ये केला जातो आहे. शस्त्रक्रियेपासून युद्धभूमीपर्यंत आणि स्वयंपाक करण्यापासून गटारे साफ करण्यापर्यंत. अनेक ठिकाणी रोबोंची भूमिका महत्त्वाची ठरते कारण ज्या ठिकाणी माणूस काम करू शकत नाही किंबहुन काही वेळा तर तो जिवंतही राहू शकणार नाही अशा जागी किंवा परिस्थितीत (उदा. खूप तापमान वा थंडी, विषारी वायू, बॉम्ब शोधणे इ.) हे रोबो तासन्तास काम करू शकतात. अनेक उत्पादन प्रक्रियेमध्ये एकच काम विलक्षण वेगाने आणि अचूकतेने अनेक वेळा करावे लागते. कधी-कधी असे कार्यस्थळ मानवाला धोकादायकही ठरू शकते. अशी फास्ट आणि बोअरिंग काम करण्यात तर रोबोंचा हातखंडा असतो. किंबहुना आज प्रत्येकाच्या हाती दिसणार्‍या स्मार्टफोनची जुळणी इतक्या वेगाने आणि कुशलतेने करणे अथवा दर मिनिटाला एक संपूर्ण कार जोडणे कोण्याही माणसाला शक्य नाही ही वस्तुस्थिती आहे.

रोबोंच्या प्रसाराची दुसरी बाजू अशी की तेही अखेर यंत्र आहे. ते बंद पडणार, त्याचीही देखभाल करावी लागणार, त्यांना नवनवीन कामे शिकवण्यासाठी तितकेच विविध प्रोग्रॅम लिहावे लागणार, रोबोचे अनेक पार्टस् असतात त्यांचे उत्पादन करावे लागणार आणि त्यासाठी लागणारी सप्लाय चेनही कोणालातरी सांभाळावीच लागणार...म्हणजेच यातूनही अनेक वेगवेगळे रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याद‍ृष्टीने शिक्षणक्षेत्रातही हालचाली सुरू आहेतच. येत्या काही वर्षांत त्यांना वेग येईल कारण तशी गरजही वाढेल. रोबो डिझाईन करणे, त्याची देखभाल, नवी ऍप्स लिहिणे आणि अधिकाधिक कामे त्यांच्याकडून करवून घेता यावी यासाठी संशोधन करणे या मुख्य बाबी रोबोटिक्स इंजिनिअर करतात. आता काही विद्यापीठांतून, सॉफ्टवेअर- आणि हार्डवेअर इंजिनिअरिंगवर आधारित अभ्यासक्रमांमध्येही, रोबो प्रोग्रॅमिंगचा समावेश होऊ लागला आहे. हे झाले पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर शिकू इच्छिणार्‍यांसाठीचे अभ्यासक्रम. रोबोटिक्समधले, दुसर्‍या म्हणजे मध्यम पातळीवरचे व्यावसायिक आणि कार्यानुभव प्रकारचे, व्होकेशनल शिक्षण अधिक प्रमाणात मिळाले तर त्याचा अधिक फायदा जास्त संख्येने उमेदवारांना होईल (आणि उद्योग विश्‍वालादेखील) रोबोटिक्स सर्टिफिकेशन स्टॅँडर्डस अलायन्स (ठउड-) या आंतरराष्ट्रीय संस्थेकडे रोबोटिक्सशी संबंधित अभ्यासक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम इ. बाबतची प्रमाणपत्रे (शैक्षणिक, औद्योगिक इ.) देण्याचा अधिकार आहे.

 स्वयंचलन आणि नव्या बुद्धिमान यंत्रणेशी संबंधित असा हा विषय असून यात स्पेशलायझेशन करू इच्छिणार्‍यांनी मशिनचा अभ्यास, कृत्रिम बुद्धिमत्ता, फीडबॅक नियंत्रण कार्यप्रणाली, मानवी आणि रोबो संपर्क नियंत्रण प्रणाली, अभियांत्रिकी, कॉम्प्युटर व्हिजन, सेन्सिग अँड सेन्सर, मोबाईल रोबोज, मेकॅट्रॉनिक्स डिझाईन, रोबो तंत्रज्ञानातील सांख्यिकी तंत्रे आदी विषयांचे ज्ञान प्राप्त करणे अपेक्षित आहे. या क्षेत्रातील तंत्रकौशल्य प्राप्त करणार्‍या उमेदवारांना केवळ नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, असे नव्हे तर ते उद्योजकही बनू शकतात.