Wed, Feb 20, 2019 15:41होमपेज › Edudisha › फार्मसी क्षेत्रातील करिअर वाटा

फार्मसी क्षेत्रातील करिअर वाटा

Published On: Jul 10 2018 1:05AM | Last Updated: Jul 10 2018 1:05AMफार्मसी म्हणजे फक्‍त औषधांचं दुकान नव्हे. संशोधन क्षेत्रातही फार्मसीचं खूप मोठं योगदान आहे. फक्‍त आयटी कंपनी म्हणून ओळख असणार्‍या कंपन्यासुद्धा औषधनिर्मितीकडे वळत आहेत. या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी निर्माण होतायेत. फार्मसी कोर्स केल्यावर मेडिकल शॉप उघडायचं असं नव्हे, या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी आहेत.फार्मसीमध्ये फार्म डी हा नवीन  कोर्सही येऊ घातला आहे. जगाच्या नकाशात औषधनिर्मित क्षेत्रात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. सर्वात स्वस्त औषध पुरवठादार म्हणून भारताची ओळख आहे. दुर्धर समजल्या जाणार्‍या विविध औषधांवर देखील भारतात यशस्वी संशोधन होत आहे. आरोग्यविषयक सॉफ्टवेअर विकसित होत आहे. त्यामुळे फार्मसी म्हणजे फक्‍त औषधाचे दुकान ही ओळख आता नाहीशी होत आहे. परदेशांत डॉक्टर पेशंटला औषधे लिहून देत नाहीत.

डॉक्टर आजाराचे निदान करतात आणि फार्मसिस्ट त्यावर औषध देतात. भारतात तशी परिस्थिती नाही. जगात अमेरिका औषधनिर्मितीमध्ये आघाडीवर आहे. इतर देशांमध्ये देखील फार्मसिस्ट आवश्यक असतात. जगात 80 टक्के देशांत भारत औषधपुरवठा करीत आहे. भारतात अनेक फार्मसीमध्ये कंपन्या संशोधन करीत आहेत. क्लिनिकल रिसर्च, आयटी कंपनी, क्लिनिकल ट्रायल ही नवीन क्षेत्रं खुली होत आहेत. फार्मसीसाठी डिप्लोमा इन फार्मसी आणि बिफार्म करणार्‍यांची संख्या जास्त होती. डीफार्म करून औषधांचे दुकान आणि बिफार्मनंतर दुकान किंवा नोकरीचाच विचार केला जात होता; परंतु गेल्या काही वर्षांत ही परस्थिती बदलली आहे. अशी समजूत होती; परंतु भारताचा बहुतेक राज्यांत औषध कंपन्या आहेत. केमिकल कंपन्यांमध्येसुद्धा फार्मसीचं शिक्षण घेतलेले उमेदवार मोठ्या प्रमाणात आवश्यक असतात. आधी फार्मसीमध्ये मास्टर्स डिग्री घेण्यार्‍यांची संख्या कमी होती; परंतु आजकाल मास्टर्स करणार्‍यांची संख्या वाढत आहे.
•
करिअर संधी : होलसेल व रिटेल (स्वतंत्र व्यवसाय), व्यवसायातील संधी- कमीत कमी पदविका शिक्षण घेतले आणि स्टेट फार्मसी कौन्सिलमध्ये नोंदणी झाली, तर औषध विक्रेता रिटेल व होलसेल म्हणून व्यवसाय सुरू करता येतो. परवानाधारक फार्मासिस्ट औषधविषयक चाचणी, प्रयोगशाळा, रिपॅकिंग युनिट औषधनिर्माण/ सौंदर्यप्रसाधन आयुर्वेदिक कंपनी संशोधन केंद्र आदी सुरू करू शकतो. तसेच स्वत:चा औषध उत्पादन व निर्मितीचा उद्योग उभारून उद्योजक होण्याचीही त्याला संधी असते.
•
सरकारी नोकरी -  सरकारी उपक्रम, रेल्वे, संरक्षण, अथवा राज्य किंवा केंद्र सरकारचे शासकीय दवाखाने, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये रुग्णालय फार्मासिस्ट, डिस्पेन्सिंग फार्मासिस्ट, ड्रग्ज इन्फॉर्मेशन सेंटर, पॉयझन इन्फॉम्रेशन सेंटर तसेच हॉस्पिटल फार्मसी परचेसिंग विभागात काम करता येते. राज्य फूड अ‍ॅण्ड ड्रग्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेशनसाठी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यास ड्रग्ज इन्स्पेक्टर, फूड इन्स्पेक्टरपासून सहायक आयुक्‍त, सहआयुक्‍त पदापर्यंत पोहोचता येते. केंद्र सरकारच्या सिडॅस्को विभागामध्ये ड्रग्ज इन्स्पेक्टरपासून डेप्युटी डीसीजीआय ते डीसीजीआय जाता येते. यूपीएससीमार्फत नागरी सेवेत प्रवेश करून उच्च पदावर औषध व आरोग्य विभागाशी निगडित असलेल्या अनेक पदांपर्यंत पोहोचता येते व देशासाठी उत्तम काम करता येते.
•
संशोधन आणि विकास-  औषधी कंपन्यांमध्ये किंवा कंपनी संशोधन प्रयोगशाळांमध्ये नवीन औषधांवर संशोधन करणे, तत्संबंधी प्रक्रिया विकसित करणे, फॉम्युलेशन विकसित करणे, नैसर्गिक उत्पादने विकसित करणे, संशोधन विभागात खालीलप्रमाणे वेगवेगळ्या शाखेत काम करता येते. उदा- बायोटेक रिसर्च, मॉलिक्युलर रिसर्च व बायोफिजिक्स, क्लिनिकल फार्मसी, अपस्केलिंग पायलट प्लांट ते मॅन्युफॅक्चरिंगपर्यंत सर्व प्रकारांचे काम करता येते. गुणवत्ता, चिकित्सक बुद्धी, आव्हानांना सामोरे जाण्याची जिद्द हे गुण ज्यांच्या अंगी आहेत, अशांना संशोधन क्षेत्रात काम करून आपल्या कार्याचा ठसा उमटवता येणे शक्य आहे.

•पेटंट विभाग आणि बौद्धिक संपदा- बौद्धिक संपदा यांचे व्यावसाईक द‍ष्टिकोनातून फार महत्त्व आहे. कंपन्यांची नावे, ब्रान्ड, लोगो, संकल्पना, संशोधन, कलाकृती, डिझाईन, वैज्ञानिक शोध ई. अधिकार हे बौद्धिक संपदेमध्ये मोडतात. बौद्धिक संपदा ही मालमत्ता आपण स्पर्श करू शकत नाही. माणसाच्या बौद्धिक कल्पनांमधून त्या अविष्कारीत होतात. अशा मालमत्तांचे जागतिक व्यापाराच्या द‍ृष्टिकोनातून फार महत्त्व आहे. भारत देशात जागतिकीकरण व लिबरल पोलिसिज आल्यानंतर बौद्धिक संपदाना फार महत्त्व आले. फार्मसी क्षेत्रात नवीन विविध औषधाला आणि या  क्षेत्रातील विद्यार्थ्यांना व शास्त्रज्ञांना त्यांचे वैज्ञानिक शोधांचे विशेषाधिकार पेटंट रूपाने संरक्षित करून ठेवता येतात. यांसारख्या औषधी कंपन्यांच्या विभागात पेटंट सल्लागार म्हणून काम करता येईल.
•
रेग्युलेटरी अफेअर्स - (औषधी नियामकविषयक विभाग) - एफ.डी.ए. केंद्र किंवा राज्य सरकारच्या विभागामध्ये नव्या अथवा सध्या प्रचलित असलेल्या औषधांचे जागतिक मानदंडाप्रमाणे उदा. आय.पी., बी.पी., यू.एस.पी., युरोपियन फार्माकोपिया, जी.एल.पी., जी.एम.पी., करंट जी.एम.पी. यांच्या मानकाप्रमाणे कागदपत्रे संबंधित विभागाला वेळोवेळी सादर करणे आणि त्या संदर्भात काही शंका असल्यास त्यांचे निरसन करणे, नव्या औषधांचा शोध व इतर संबंधित कायद्याप्रमाणे लागणारे सर्व एफ.डी.ए., यू.एस.एफ.डी.ए.च्या डब्ल्यू.एच.ओ. व इतर देशांतर्गत नियंत्रण व प्रमाणित करून संस्थेकडून परवाने घेणे व संबंधित इतर नियमांची पूर्तता करणे अशाप्रकारची कामे करता येतील.
•
निर्मिती आणि उत्पादने- नवीन फॉर्म्युलेशन वेगवेगळ्या डोसेज स्वरूपामध्ये विकसित करणे, तसेच औषधे- सौंदर्यप्रसाधने- साबण विकसित करणे रक्‍तापासून प्लाझ्मा, लसी तसेच जैविक उत्पादने बनवणे, आयुर्वेदिक तसेच होमियोपॅथिक औषधांची निर्मिती, प्राण्यांसाठीची औषधे, सुगंधी द्रव्ये, फूड सप्लिमेंटस्, पोषक अन्‍न निर्मिती यांची औषधी कारखान्यात निर्मिती करणे, सध्या भारतात आधुनिक मशिन व कॉम्प्युटराईज्ड कंट्रोल सिस्टिमद्वारे हे काम उत्तमरीत्या करता येते.
•
तांत्रिक व्यवस्थापन- बी.फॉर्म/ एम.फॉर्म/ पीएच.डी. अथवा औषधी कारखान्यातला 10 वर्षांचा अनुभव असल्यास संशोधन आणि विकास, उत्पादन, क्लिनिकल रिसर्च, नियमनासंबंधित गोष्टी, दर्जा नियंत्रण, दर्जाविषयक हमी, यांसारख्या औषधी कंपन्यांच्या विभागात टेक्निकल मॅनेजर म्हणून काम करता येईल अथवा सल्लागार म्हणूनही काम करता येईल.
•
दर्जा नियंत्रण- औषधे अथवा सौंदर्य प्रसाधने कारखान्यात तयार करत असताना त्या संदर्भातील दर्जा नियंत्रणविषयक भारतीय ‘ड्रग्ज अ‍ॅण्ड कॉस्मेटिक अ‍ॅक्ट 1940’ व नियम 1945 तसेच इतर नवे नियम अथवा मानकांचे पालन करणे तसेच त्या मानकांप्रमाणे उत्पादन निर्मिती झाली आहे का याची खातरजमा करणे, फार्मसिस्ट हे औषध निर्मितीच्या आधी व नंतरच्या स्तरावर दर्जा तपासणीसाठी जबाबदार असतात. उत्पादन प्रक्रियेच्या वेळी रसायनांच्या वजनाची टक्केवारी ठरवणे हेही त्यांचे काम आहे. हल्ली हे काम संगणकाद्वारे करण्यात येत असल्याने फार्मसिस्टची भूमिका पर्यवेक्षकाची असते. संशोधन आणि विकास भागात नव्या औषधांची निर्मिती तसेच औषधात फेरफार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. त्या संबंधीचा अहवाल तयार करणे व संबंधित सरकारी यंत्रणांना योग्य वेळेत तो सादर करणे व प्रमाणित दाखला संबंधित यंत्रणेकडून घेणे, ही कामे करता येतील.
•
दस्तावेज - प्रत्येक औषधी कंपन्यांचे तपासणी अधिकारी, राज्य अथवा केंद्र सरकारच्या फूड अ‍ॅण्ड ड्रग्ज (सिडॅस्को) अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अथवा त्यांचे अधिकारी येऊन प्रत्यक्षात औषधी कारखान्यांची निर्मिती कशी चालली आहे याची त्यांच्या मानकाप्रमाणे तपासणी करतात व संबंधित अहवालांचे परीक्षण केले जाते. यासाठीचे अहवाल तयार करणे व संबंधित संस्थांना ते सादर करणे हाही करिअरचा एक उत्तम पर्याय होऊ शकतो.
•
दर्जाची हमी : औषधी कंपन्यांच्या वेगवेगळ्या उत्पादनांच्या निर्मितीचे, दर्जा तपासणीचे ऑडिट करणे व औषधे तयार करण्याच्या सर्व प्रक्रियेद्वारे योग्य ती गुणवत्ता उत्पादनात आहे ना याचे परीक्षण करणे, अहवाल तयार करणे व संबंधित सरकारी यंत्रणांना तो सादर करणे या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.
•
पॅकेजिंग टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड मॅनेजमेंट - सध्या जगभरात सर्वच क्षेत्रांत पॅकेजिंग टेक्नालॉजीला चांगली मागणी आहे. पावडर, मलम, गोळ्या, कॅप्सूल अशा घन, द्रव्य व इतर स्वरूपातील औषधांसाठी योग्य ते पॅकिंग साहित्य निवडणे, पॅकेजिंग मटेरिअलच्या तांत्रिक बाजू समजून घेणे, औषधे किफायतशीर आणि टिकाऊ असावीत यावर भर देणे, तसेच त्याच्या डिझाईनकडे आणि औषधाच्या पॅकिंगसाठी योग्य त्या सामग्रीची निवड करणे या स्वरूपाचे काम पॅकेजिंग टेक्नॉलॉजीमध्ये अपेक्षित आहे.
•
शैक्षणिक अभ्यासक्रम :

1) डी. फार्म - बारावीनंतर डिप्लोमा फार्मसी करता येते. दोन वर्षांचा हो कोर्स असतो. डिप्लोमा फार्मसी हे त्या क्षेत्रातील प्राथमिक शिक्षण असल्याने ज्यांना बारावीत कमी गुण आले आहेत, त्यांनी डिप्लोमाचा विचार करायला काही हरकत नाही. डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर पदवीच्या दुसर्‍या वर्षाला प्रवेश मिळतो. मेडिकल रिप्रेझेंटिव्ह आणि फार्मसीचे दुकान या संधी असतात.

2) बी. फार्म - बारावीनंतर चार वर्षांचा हा कोर्स आहे. या कोर्सनंतर डिप्लोमा फार्मसीच्या विध्यार्थ्यांना शिकवता येते. औषधनिर्मिती कंपनीमध्ये नोकरीच्या संधी असतात. कंपनीमध्ये विविध शाखांमध्ये काम करता येते.

3) एम. फार्म- फार्मसी क्षेत्रातील मास्टर्स डिग्री असल्याने संशोधन विभागामध्ये काम करता येते. डिप्लोमा आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना शिकवता येते.

4) फार्म डी- वरील कोर्सच्या व्यतिरिक्‍त हा नवीन कोर्स येत आहे. फार्म डी नावाचा हा कोर्स असून, डॉक्टर ऑफ फार्मसी असा याचा अर्थ आहे. सहा वर्षांचा हा कोर्स असून, प्रथम अमेरिकेत हा कोर्स सुरू झाला. डॉक्टरसोबत या विद्यार्थ्यांना काम करावे लागत असल्याने हे विद्यार्थी डॉक्टरला औषध लिहून देण्यात मदत करू शकतात. फार्मसी आणि मेडिकल असे सर्व शिक्षण या विद्यार्थ्यांना घेता येते. त्यामुळे हे विद्यार्थी फार्मासिस्ट आणि डॉक्टर यांच्यातील दुवा असतो.

- प्रा. सचिन लोकापुरे