Sun, Jun 07, 2020 02:42होमपेज › Edudisha › हॉलिडे कन्सल्टंट व्हा

हॉलिडे कन्सल्टंट व्हा

Published On: May 14 2019 2:05AM | Last Updated: May 14 2019 2:05AM
सध्या पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. ट्रॅव्हल्स कंपन्या, विमान कंपन्या, सरकारच्या अधिकृत एजन्सी, हॉटेल व्यावसायिक, पर्यटन महामंडळाकडून विविध प्रकारे ऑफर्सचा मारा करून पर्यटकांना आकर्षित करण्याचा ट्रेंड कमालीचा वाढला आहे. त्यातच ऑनलाईनच्या माध्यमातून बुकिंग करणे सोपे झाल्याने पर्यटन व्यवसाय अगदी ‘बूम’ झाला आहे. या स्थितीत हॉलिडे किंवा ट्रॅव्हल कन्सल्टटचे महत्त्व वाढलेले दिसून येते. हॉलिडे कन्सल्टंट हा पर्यटन किंवा सहलीसंदर्भात संपूर्ण माहिती पुरवणारा व्यक्‍ती असो. तो संपूर्णपणे ट्रिपचे नियोजन करत असो आणि ग्राहकांना मार्गदर्शन करत असतो. 

पर्यटनस्थळी जाण्यासाठी प्रवासाचे बुकिंग, हॉटेलचे बुकिंग, फिरण्यासाठी गाडीचे बुकिंग, शॉपिंगसाठी बाजाराची माहिती देणे आदींची इंत्यभूत माहिती देण्याचे काम हॉलिडे कन्सल्टंट करत असतो. 
ग्राहकांना कमीत कमी पैशात जास्तीत जास्त टूर कसा करता येईल, यासंबंधी तो मार्गदशर्न करत असतो. अनेक ट्रॅव्हल कंपन्या हॉलिडे कन्सल्टटची निवड करतात आणि ग्रुप टूरसाठी त्याची नेमणूक करत असतात. कधी-कधी लाँग टूरवर ट्रॅव्हल कंपन्या हॉलिडे कन्सल्टंटला पाठवतात, जेणेकरून ग्राहकांना प्रवासादरम्यान अडचण येणार नाही. याशिवाय फोनवरून किंवा मेसेजच्या माध्यमातून पर्यटकांशी सतत संपर्कात असतो आणि फिरण्याबाबत तो सूचना करत असतो. ज्यांना फिरण्याची हौस आहे, विविध शहरे, संस्कृती जाणून घेण्यात रुची आहे, अशा मंडळींनी हॉलिडे कन्सल्टंट म्हणून करिअरचा विचार करावयास हरकत नाही. याशिवाय देश-विदेशातील एक्झिबिशनमध्ये देखील ट्रॅव्हल कन्सल्टंटला सहभाग घेण्याची संधी मिळत असते. आपल्या भागातील, देशातील पर्यटन व्यवसाय वृद्धीसाठी हॉलिडे कन्सल्टंट हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. 

देशात अनेक ठिकाणी मॅनेजमेंट कोर्स शिकवणार्‍या संस्था असून त्याठिकाणी हॉलिडे कन्सल्टंट म्हणून अभ्यासक्रम उपलब्ध असतात. या अभ्यासक्रमात पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त करता येते तसेच पदविका देखील विद्यार्थ्यांना मिळवता येते. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो. इंग्रजी माध्यमातून असणारे अभ्यासक्रम हे हॉटेल मॅनेजमेंटशी निगडित असलेल्या कॉलेजमध्ये किंवा खासगी संस्थेत शिकवले जातात. 

करिअरला वाव : हॉलिडे कन्सल्टंट म्हणून भारतात खासगी आणि सरकारी क्षेत्रात करिअर करण्यासाठी चांगली संधी मिळू शकते. सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रात काम करताना पर्यटन महामंडळात किंवा पर्यटन विभागात संधी मिळू शकते. खासगी क्षेत्राचा विचार केल्यास ट्रॅव्हल्स एजन्सी, हॉटेल, एअरलाइन्स कंपन्यांत हॉलिडे कन्सल्टंट म्हणून वाव आहे. 

नामांकित संस्था : भारतातील अनेक ट्रॅव्हल आणि टूरिझम इन्स्टिट्यूटस, कॉलेज आणि विद्यापीठात हॉलिडे कन्सल्टंटशी निगडित अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यापैकी काही नामांकित ट्रॅव्हल आणि टूरिझम इन्स्टिट्यूटचा याठिकाणी उल्लेख करता येईल. कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी अ‍ॅड टूरिझम (गुडगाव), हेरिटेज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल अँड टूरिझम(आग्रा)

मानधन/वेतन : साधारणत: खासगी ट्रॅव्हल कंपन्यांत ट्रॅव्हल कन्सल्टंट म्हणून जबाबदारी सांभाळताना एक ते तीन लाखांपर्यंतचे वार्षिक मानधन दिले जाते. जर कंपनी प्रतिष्ठित आणि नामांकित असेल तर यापेक्षा अधिक मानधन पदरात पडू शकते. याशिवाय केंद्र सरकारच्या वेतनश्रेणीप्रमाणे पर्यटन खात्यातील कर्मचार्‍याला/अधिकार्‍याला वेतन मिळते. कारण पर्यटन खाते केंद्राच्या आखत्यातरित येते. 

सत्यजित दुर्वेकर