Wed, Feb 20, 2019 15:19होमपेज › Crime Diary › मोह क्षणाचा..!

मोह क्षणाचा..!

Published On: Jul 11 2018 1:39AM | Last Updated: Jul 11 2018 1:39AMरात्री फौजदार मोहिते यांनी तिघा तरुणांकडे खास पोलिसी खाक्याने विचारणा करण्यास सुरुवात केली. तिघेही तरुण उच्चशिक्षित असले तरी ते सराईत नव्हते. त्यामुळे थोडा आवाज चढविताच त्यातल्या एका अविवाहित तरुणाने सांगितले, की ‘साहेब, रोहित सारखा दीप्‍तीच्या मागे मागे करत होता. त्याच्या मनात तिच्याविषयी अभिलाषा होती; पण तो विवाहित असल्याने ती त्याला दाद देत नव्हती. गेल्या तीन-चार दिवसांत त्या दोघांमध्ये यावरून वादावादीदेखील झाली होती.’ मग...

फौजदार मोहिते सकाळी थोडे लवकरच पोलिस ठाण्यात आले होते. 470.. त्यांचा करारी आवाज सार्‍या पोलिस ठाण्यात दणाणला. कॉन्स्टेबल जाधव पळत आत आला. त्याच्याशी मोहिते बोलणार इतक्यात टेबलवरील फोन खणाणला. मोहिते यांनी रीसिव्हर उचलून ‘हॅलो’ म्हणताच, पलीकडून काहीसा घाबरल्यासारखा बोलणार्‍या व्यक्‍तीचा आवाज आला. साहेब, शहरातील हॉटेल शरारामध्ये एका तरुणीचा खून झाला आहे.’ खून म्हणताच मोहिते ताडकन उठून उभेच राहिले. ‘कोण बोलतोय’ असे विचारताच बोलणारा म्हणाला, ‘साहेब, मी हॉटेलमधूनच बोलतोय, आपण ताबडतोब इकडे आला तर बरे होईल.’ ‘आता गेला सारा दिवस...’ असे पुटपुटतच   टेबलवरील पिक्ड कॅप डोक्यावर बसवत मोहिते यांनी चालकाला हाक दिली. दुसर्‍याच क्षणी त्यांची जिप्सी सुसाट निघाली. 

एव्हाना हॉटेलमध्ये एकच पळापळ सुरू झाली होती. एक बिझनेस हॉटेल म्हणून शराराचा अल्पकाळातच लौकिक झाला होता. अशा चांगल्या आणि नावाजलेल्या वस्तीमध्ये असलेल्या हॉटेलमध्ये एका तरुणीचा खून व्हावा, या घटनेने हॉटेलचे व्यवस्थापन हादरले होते.  पोलिस पथकासह मोहिते खून झालेल्या दुसर्‍या मजल्यावरील रूममध्ये गेले. तेथे बेडवर एका तरुणीचा मृतदेह पडला होता. रात्रीचेच कपडे अंगावर आणि झटापटीत बेडशीट विस्कटल्याचे स्पष्ट दिसत होते. मोहितेंनी ही गोष्ट चांगलीच ‘काऊंट’ केली.  खोलीत अन्यत्र काही दिसते का हे पाहिले. मात्र, काही माग राहिलेला दिसला नाही. मात्र,  हल्लेखोराशी मृत तरुणीची चांगलीच झटापट झाल्याचे स्पष्टच दिसत होते. शेजारी हॉटेलचा पोरगेला व्यवस्थापक काहीसा भांबावलेल्या स्थितीत उभा होता. त्याकडे कटाक्ष टाकत मोहिते यांनी विचारले, ‘तरुणीचे नाव, गाव, पत्ता नोंद आहे का?’ प्रथमदर्शनी त्यांना हा प्रकार अनैतिक संबंधातून झाला असावा असेच वाटले; पण हॉटेल व्यवस्थापकाने माहिती दिल्यानंतर ते काहीसे चकित झाले.

उच्चशिक्षित आणि चांगल्या कौटुंबिक पार्श्‍वभूमी असलेल्या तरुणीचा खून होणे ही घटनाच त्यांना नवलाची वाटली. त्यांनी अधिक विचारणा केली. मृत तरुणी तिच्या  तीन सहकार्‍यांसह चार दिवसांपासून या हॉटेलमध्ये राहिली होती. शिवाय, आणखीन दोन आठवड्यांसाठी त्यांनी रूमचे बुकिंग केले होते. चौघेही स्वतंत्र रूममध्ये राहत होते. कंपनीने शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये एका कारखान्याच्या उभारणीचे काम घेतले होते. त्यासाठी या चौघा इंजिनिअरांची टीम पाठविण्यात आली होती. त्यातील दोघे विवाहित तर  तिसरा तरुण अविवाहित होता. मृत तरुणी देखील अविवाहित होती. रोज सकाळी हे चौघेही स्पेशल गाडीतून कंपनीकडे जात होते. रात्री साडेसात-आठपर्यंत ते परत रूमवर येत होते. त्यांच्यात काही वावगे आढळत नव्हते, तसेच ते चांगले मित्र होते.’ असे व्यवस्थापकाने सांगितले. आपल्या सहकारी इंजिनिअर दीप्ती या तरुणीचा खून झाल्याने हादरलेले तिघे  इंजिनिअरदेखील चांगलेच भांबावलेल्या अवस्थेत दुसर्‍या रूममध्ये बसले होते.

घटनास्थळी प्राथमिक सोपस्कार केल्यानंतर मोहिते यांनी दीप्तीचा मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठविला. तोपर्यंत चौघांच्या कंपनीतील काही  वरिष्ठ अधिकारी देखील मुंबईहून यायला निघाल्याचा मेसेज पोलिसांंना मिळाला. पंचनामा झाला. ते तीन तरुण मात्र अजूनही विमनस्कपणेच बसून होते. मोहिते यांनी त्यातील एकेकाला दुसर्‍या खोलीत बोलवून त्यांच्याकडे विचारणा करण्यास सुरुवात केली. दोन विवाहित तरुणांपेक्षा त्यांची त्या तिसर्‍या अविवाहित तरुणांकडेच अधिक माहिती विचारली. अगदी एकतर्फी प्रेमातून जबरदस्तीची शक्यता गृहित धरून देखील ते खास पोलिसी स्टाईलने प्रश्‍न विचारत होते. मात्र, त्यांना संशयास्पद असे काही सापडले नाही. मात्र, त्या विवाहित तरुणांपैकी एक रोहित मात्र त्या तरुणीच्या सारखे मागे मागे करत होता. एवढा त्यांना क्‍लू मिळाला. याचवेळी मोहिते यांच्या मनाला काय वाटले कोण जाणे,  त्यांनी तातडीने त्या रूमची पुन्हा पाहणी करण्याचे ठरविले. 

ते परत दुसर्‍या मजल्यावर गेले, त्यांनी त्या रूमची पुन्हा पाहणी केली. अगदी खिडक्या, बेडची बारकाईने पाहणी केली.  परत ते बाहेर आले, त्या तिघा तरुणांच्या वेगवेगळ्या रूममध्ये त्यांनी पाहणी केली. काही संशयास्पद असे आढळते का याचा ते विचार करत होते; पण काहीच आढळेना. मात्र याच दरम्यान, त्यांच्या लक्षात आले, की ती तरुणी राहत होती त्या खोलीच्या खिडक्या काहीशा मोडकळीस आल्या होत्या. नव्हे त्यांची दारेदेखील जबरदस्तीने उघडल्यासारखी वाटत होती. याचा अर्थ हल्लेखोराने या खिडकीतून तरुणीच्या रूममध्ये प्रवेश केला असणार हे त्यांना स्ट्राईक झाले. सारा घटनाक्रम त्यांनी मनाशी आणण्यास सुरुवात केली. मात्र, झटकन खाली येऊन मोहिते यांनी तिघाही तरुणांना संशयावरून अटक केली.

रात्री मोहिते यांनी पुन्हा  तिघा तरुणांकडे खास पोलिसी खाक्याने विचारणा करण्यास सुरुवात केली. तिघेही तरुण उच्चशिक्षित असले तरी ते सराईत नव्हतेे. त्यामुळे थोडा आवाज चढविताच त्या अविवाहित तरुणाने सांगितले, की ‘साहेब, रोहित सारखा दीप्तीच्या मागे मागे करत होता. त्याच्या मनात तिच्याविषयी अभिलाषा होती; पण तो विवाहित असल्याने ती त्याला दाद देत नव्हती. गेल्या तीन-चार दिवसांत त्या दोघांमध्ये यावरून वादावादीदेखील झाली होती.’ झाले, सूतावरून स्वर्ग गाठण्यात तरबेज असलेल्या मोहिते यांनी लगेच रोहितवर प्रश्‍नांची सरबत्ती सुरू केली; पण सुरुवातीला त्याने दाद दिली नाही; पण जेव्हा मोहिते यांनी ‘मला सारे काही समजले आहे’ हे त्याला सांगताच रोहितने त्यांच्याकडे पाहून हात जोडले आणि म्हणाला, ‘साहेब, मी चुकलो..’

‘तू  नेमके काय केलेस हे सांग?, मोहिते यांच्या या कडक आवाजातील प्रश्‍नावर रोहित मात्र नंतर पोपटासारखा सांगू लागला. ‘मुंबईजवळील एका मोठ्या कंपनीत रोहित, दीप्ती आणि ते दोघे असे चौघे एकत्र काम करत होते. उच्चशिक्षित असल्याने त्यांच्या निखळ मैत्रीला मोकळेपणाची देखील झालर होती. दीप्ती सातार्‍याकडील एका गावातील होती. तिच्या आई-वडिलांनी परिस्थिती नसताना देखील तिला इंजिनिअर केले होते.  तीदेखील आई-वडिलांची स्वप्ने जणू साकार करण्यासाठी झटत होती. लवकरच तिला मद्रासमध्ये एका नामांकित कंपनीत मुलाखतीसाठी बोलाविणे येणार होते. याच दरम्यान, त्यांच्या कंपनीने या चौघांची उस्मानाबादजवळील  औद्योगिक वसाहतीत एका कारखान्याच्या उभारणीसाठी पाठविले होते. या शहरात आल्यापासून रोहित सारखा तिच्या  मागे मागे करत होता. मात्र, ती त्याला काही दाद देत नव्हती. त्या दिवशीच्या आधी दोन दिवस चौघेही बाहेर जेवायला गेले होते. येताना रोहितेने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती वाघिणीसारखी खवळून उठली होती. यातून संतापलेल्या रोहितने तिला धडा शिकविण्याचा मनोमन निर्धार केला. 

हॉटेलमध्ये  दुसर्‍या मजल्यावर सलग चार रूममध्ये हे चौघे राहत होते. घटना घडली त्या रात्री रोहित आपल्या रूममध्ये बेडवर पडला होता. रात्रीचे साडेबारा होत आले तर त्याला झोप येत नव्हती. डोळ्यासमोर सारखी दीप्ती येत होती. यातूनच बेचैन झालेल्या रोहित एकदाचा याचा सोक्षमोक्ष लावायचा असा निश्‍चय करत उठला आणि तो शेजारीच असलेल्या तिच्या रूमकडे निघाला. त्याने आत चाहूल घेतली तर दीप्ती बेडवर गाढ झोपली होती. झोपेतही तिच्या चेहर्‍यावर हसू विलसत होते. तो हसरा चेेहरा पाहून रोहित चांगलाच अस्वस्थ झाला. मात्र, दार आतून बंद होते. बिजागर्‍या सैल झालेल्या खिडकीचे दार हलवून उघडण्याचा प्रयत्न केला. हलक्या  हिसड्यातच दार उघडले. त्यातून रोहित आवाज न करता खोलीत गेला. अगदी बेडजवळ गेला. एव्हाना झालेल्या आवाजाने दीप्ती जागी झाली. नाईटलॅम्पच्या मंद प्रकाशात बेडशेजारी रोहित उभा आहे हे प्रथम झोपेत असलेल्या दीप्तीच्या लक्षात येईनाच. पूर्ण जागी झाल्यावर ती चांगलीच संतापली. ‘रोहित, असा मध्यरात्री तू माझ्या खोलीत काय करतोयस?

मात्र, तिच्या प्रश्‍नाला उत्तर देण्यासाठी रोहित भानावर होताच कोठे? ‘मला तू आवडतेस, आपण लग्‍न करू या’ असे तो म्हणताच संतापाने तिचा तिळपापड झाला. ती ताडकन म्हणाली, ‘आधी खोलीच्या बाहेर जा, सकाळी आपण बोलू.’ पण मनावर वासना आणि अभिलाषेचे गारुड झालेल्या रोहितने तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता तिला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यातून सुटण्यासाठी धडपडत दीप्ती खवळून म्हणाली, ‘तुला उद्या सकाळी काय ते सांगते.’ मग मात्र रोहित चांगलाच भानावर आला; पण उद्या ती सर्वांना हा प्रकार सांगणार, आपली नोकरी जाणार, बायको देखील संतापणार, या सार्‍यामुळे घाबरलेल्या रोहितने तिचा गळाच आवळण्यास सुरुवात केली. मात्र, तीदेखील ताकदीने त्याला प्रतिकार करू लागली, पण  रोहितच्या ताकदीपुढे तिचे काही चालले नाही. तिचा प्रतिकार अपुरा पडला. काही क्षणातच ती निष्प्राण होऊन बेडवर पडली. एव्हाना घामाघूम झालेल्या रोहितच्या लक्षात सारा प्रकार आला. त्याने तातडीने खिडकीतूनच बाहेर उडी मारत आपली रूम गाठली आणि सकाळी साळसूदपणाने वावरण्यास सुरुवात केली. सारा घटनाक्रम ऐकून मोहिते देखील काही काळ सुन्‍न झाले. मात्र, त्यांनी लगेचच रोहितच्या मुसक्या आवळल्या.  न्यायदेवतेने त्याला जन्मठेप सुनावली. मात्र, शारीरिक सौंदर्याच्या अभिलाषेने एक सुस्वरूप, उच्चशिक्षित तरुणी विनाकारण आपल्या प्राणास मुकली. 

- विवेक दाभोळे