Thu, Apr 25, 2019 11:15होमपेज › Crime Diary › कथा सोनेरी बाहुलीची

कथा सोनेरी बाहुलीची

Published On: Aug 08 2018 1:52AM | Last Updated: Aug 07 2018 6:43PMदुकानदाराकडे मयताचे फोटो दाखविताच त्यांनी मयत तरुणास ओळखले. दोन महिन्यांपूर्वी या तरुणाने ही बाहुली नेली होती.  सोबत त्याच्या एक तरुणीही होती. रजिस्टरमधील त्यांनी तरुणाचा नाव पत्ता पोलिसांना दिला. पोलिस पत्ता घेऊन त्या ठिकाणी पोहोचले. एका महिलेने दरवाजा उघडला. पोलिसांना बघून तिचा चेहरा घाबरा झाला.

वसंत ऋतूच्या आगमनामुळे सार्‍या सृष्टीत नवचैतन्य बहरले होते. कोकिळा आपल्या मंजुळ आवाजाने आसमंत उल्हासित करत होती. अनेक पक्ष्यांच्या विणीचा हंगाम जवळ आल्यामुळे पक्षी घरटे बांधण्यात मग्‍न होते. 

मुंबईच्या नवीन उपनगर भागामध्येही कावळ्याची घरटी बांधण्यासाठी धडपड सुरू होती. मालाड पूर्वच्या बाजूलाही कावळे घरटे बांधत होते. जमिनीवरील काड्या उकरून काढून कावळे नेत होते. एका इमारतीच्या समोर असणार्‍या उंच निलगिरी झाडावर एक कावळ्याचे जोडपे घरटे बांधत होते. काड्यांबरोबर नारळीच्या शेंडीचे धागेही ते चोचीने गोळा करत होते. चोचीने शेंडी उकरत असताना एक बाहुली मातीतून बाहेर आली. कावळ्याने बाहुली चोचीने बाहेर काढली. अपार्टमेंटच्या समोर बसलेल्या वॉचमनचे लक्ष त्या बाहुलीकडे गेले. त्याने जवळ जाऊन ती बाहुली हातात घेतली. त्या बाहुलीवर वाळलेले रक्‍ताचे डाग त्याला दिसले. तसा तो बावरला. त्याने अपार्टमेंटच्या प्रमुखांना फोन केला.

त्यांनी येऊन बाहुली पाहिली. त्यांनाही हिच शंका आली. त्यांनी ताबडतोब पोलिसांना फोन केला. खबर मिळताच पोलिस घटनास्थळी आले. पोलिसांनी बारकाईने पाहणी केली. वाळलेले रक्‍ताचे डाग पोलिसांनी तपासणीसाठी पाठविले. पोलिसांनी बाहुली जिथे सापडली तिथे खुदाई करण्याचा निर्णय घेतला. मजुरांना बोलावून खुदाई करण्यात आली. तीन फुटांवरच पोलिसांना एका तरुणाचे प्रेत सापडले. 

पोेलिसांनी खड्ड्यातून प्रेत बाहेर काढले. पंचनामा करून प्रेत पी.एम.साठी पाठविण्यात आले. पोलिसांनी आता त्या अपार्टमेंटमध्ये चौकशी सुरू केली. वॉचमनकडे अधिक चौकशी केली. मात्र आपणास गेल्या चार दिवसात संशयास्पद काहीच जाणवले नसल्याचे त्याने सांगितले.

दिवसा अपार्टमेंटमध्ये गर्दी असते. त्यामुळे रात्री प्रेत पुरण्यात आल्याची शक्यता होती. अपार्टमेंटच्या तिन्ही बाजूला शेतजमीन आहे. एका बाजूलाच वस्ती आहे. अपार्टमेंटमधील कोण गायब आहे का? याचीही पोलिसांनी चौकशी केली. मात्र त्या कुटुुंबांतील कुणीही गायब नव्हते. त्यामुळे या तरुणाला बाहेर ठार मारुन इथे आणून पूरण्यात आले असावे, अशी शक्यता होती. पोलिसांनी बाहुली ताब्यात घेतली.

मयत तरुणाचे फोटो स्थानिक वृत्तपत्रे व इतर प्रसार माध्यमांवरून देण्यात आले. चार दिवस झाले तरी मयताची ओळख पटलेली नव्हती. दरम्यान, पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढलेला होता. मात्र कुठेच मयत तरुणाच्या ओळखीचा धागादोरा लागत नव्हता. मयत तरुणाचा चाकूसारख्या धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिला. शिवाय बाहुली व मयताच्या शरीरावरचे रक्‍तगट एकच असल्याचे दिसून आले. त्यामुळे मयताची ओळख पटविण्यासाठीही बाहुली उपयोगी पडणार होती. याकरिता पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.

अशा बाहुल्या विकत मिळतात त्या दुकानामध्ये पोलिसांनी चौकशी सुरू केली. मालाड परिसरात असणार्‍या पोलिस सर्व दुकानांमध्ये बाहुलीची चौकशी करत होते. पण अशा प्रकारच्या बाहुल्या मालाडमध्ये मिळत नसल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे मालाड सोडून इतर भागांमध्ये चौकशी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. मालाडमध्ये एका ठिकाणी एका विक्रेत्याने अशा बाहुल्या कोकणातल्या एका दर्ग्याजवळ मिळतात, अशी माहिती दिली.

पोलिसांनी लागलीच कोकणातला तो दर्गा गाठला. दर्ग्याजवळ पोलिसांनी दुकानांची चौकशी केली. अगदी हुबेहूब बाहुली तिथे मिळत होती. दुकानदाराकडे मयताचे फोटो दाखविताच त्यांनी मयत तरुणास ओळखले. दोन महिन्यांपूर्वी या तरुणांने ही बाहुली नेली होती.  त्याच्या सोबत एक तरुणीही होती. रजिस्टरमधील त्यांनी तरुणाचा नाव पत्ता पोलिसांना दिला. पोलिस पत्ता घेऊन त्या ठिकाणी पोहचले. एका महिलेने दरवाजा उघडला. पोलिसांना बघून तिचा चेहरा घाबरा झाला. ‘साहेब, काय झालं?’ पोलिसांनी मयताचा फोटो तिला दाखविला. फोटो पाहताच तिनं हंबरडा फोडला. ‘महेश’ म्हणून ती रडू लागली. ‘साहेब, तो मुंबईत मालाडला नोकरी करायचा, मला दर महिन्याला पैसे पाठवायचा, पण असा गायब होईल असे वाटलं नव्हतं हो.’ असे म्हणून ती रडू लागली. सोबत असणार्‍या तरुणीबद्दल विचारताच ‘त्याचे अद्याप लग्‍न झालेले नाही.’ असे तिने सांगितले. त्यामुळे सोबत असणारी तरुणीही खुनाबाबत माहिती देऊ शकते असे त्यांना वाटले.

पोलिसांनी पुन्हा मुंबई गाठली. वेगवेगळ्या कंपनीमध्ये, हॉटेलमध्ये तो कुठे काम करत होता याचा शोध सुरू केला. तो चांगला शिकलेला होता. त्यामुळे तो चांगल्या कंपनीमध्ये असणार हे जाणून मालाड सोडून इतर भागातही मोठ-मोठ्या कंपनींमध्ये शोध घेऊ लागले. शोध सुरू असताना एका फायनान्स कंपनीत तो अधिकारी म्हणून काम करत होता. चांगला पगारही होता. कंपनीत चौकशी करत असताना अनेक धक्‍कादायक माहिती पुढे आली. 

महेशचे अनेक मुलींशी अनैतिक संबंध होते. कंपनीतील अनेक महिलांना त्याने नादी लावले होते. त्यामुळे त्याचा खून अनैतिक संबंधातूनच झाला होता हे निश्‍चित होते. हा धागा पकडून पोलिसांनी तपास सुरू केला.

कंपनीतील महिलांची त्यांनी प्रथम चौकशी सुरु केली. यामध्ये या महिलांच्या नवर्‍यांना पोलिस स्टेशनला आणून खास चौकशी केली. मात्र तरीही पोलिसांना काहीच हाती लागले नाही. त्यामुळे कंपनी सोडून अन्य एखादीच्या संबंधातून हा खून झालेला असावा, असा अंदाज पोलिसांनी काढला. त्यादृष्टीने पुन्हा तपासामध्ये बदल केला. त्याच्या जवळचे मित्र यांच्यावर फोकस केला. दरम्यान खबरेही आपले काम करत होते. एका खबर्‍याने मात्र एक खबर दिली अन् पोलिसांच्या तपासाला गती दिली. खबर मिळताच पोलिस तिथे पोहोचले. एका 25 वर्षीय तरुणीने दार उघडले. ‘बोला साहेब, काय काम होतं’ ‘वैशाली राजमाने आपणच का?’ हो, मीच, ‘बोलायचे होते थोडे, महेशच्या खुनाबद्दल..’ ‘काय, महेशचा खून?’ असे म्हणून ती किंचाळलीच. ‘होय, दहा दिवसांपूर्वी महेशचा चाकूने भोकसून खून केलाय, बोला तुम्हाला महेशबद्दल काय माहिती आहे?’ ‘महेश माझा भाऊ अविनाशचा दोस्त होता. तो नेहमी आमच्या घरी यायचा, बस्स बाकी काही नाही.’ तेवढ्यात अविनाश आला. पण वैशालीचा चेहरा पडला. पोलिसांनी अविनाशला चौकशीला नेले. चांगला पाहुणचार दिला. मग त्याने तोंड उघडले. ‘होच साहेब, मीच मारलं त्या हरामखोराला.’ महेश व मी मित्र होतो. तो आमच्या घरी नेहमी यायचा. त्यातूनच  त्याचे वैशालीचे संबंध निर्माण झाले. तिला दिवस गेले. याने लग्‍नाला नकार दिला. हे मला काहीच माहीत नव्हते. तिचे लग्‍न झाले.

तिचा नवरा रमेश व महेश एकाच कंपनीत होते, त्यावेळी महेशने तिच्या नवर्‍याला आपले व वैशालीचे संबंध व दिवस गेल्याचे सांगितले. त्यामुळे रमेशने तिला घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर मला हे समजले अन् त्याचवेळी निर्णय घेतला ही कीड संपवायची.

त्या दिवशी तो उपनगरात होता. रात्रीची वेळ होती. सोबत एक तरुणी होती. तिच्या हातामध्ये सोनेरी बाहुली होती. तिला सोडून तो परतत असताना मी त्यावर चाकूने वार केला. रात्रीची वेळ होती. रस्ता निर्मनुष्य होता. रस्त्यामध्ये थोडासा खड्डा दिसला. त्यामध्ये महेशला पुरला अन् बाहुली त्यांच्यावर ठेवली. अन् मी निघून गेलो. रितसर खटला चालून त्याला जेलची हवा खावी लागली.

- डी. एच. पाटील, म्हाकवे (कोल्हापूर)