Sun, Feb 24, 2019 02:48होमपेज › Crime Diary › प्रेमात गमावला जीव

प्रेमात गमावला जीव

Published On: Feb 14 2018 2:49AM | Last Updated: Feb 14 2018 2:49AM‘साहेब, आमच्या शौचालयाची टाकी साफ करताना एक स्वच्छता कर्मचारी बुडून मेला,’ असल्याची माहिती गजानन यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. ‘अकस्मात मृत्यूची नोंद’ केली. मात्र, बुडून मेलेल्या सुरेशच्या मोठ्या भावाने मृत्यूबाबत शंका उपस्थित केल्याने सखोल चौकशी केल्यावर खळबळजनक माहिती समोर आली. सुरेशचा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती नव्हता; तर पूर्वनियोजित कट रचून त्याचा आणि इतर दोघा मित्रांचा खून करण्यात आल्याचे चौकशीअंती उघडकीस आले. त्यामुळे राज्यभर खळबळ उडवून देणारे एक हत्याकांड उघडकीस आले.

सुरेशच्या मृत्यूची चौकशी सुरू होताच पोलिसांना त्याच परिसरातील विहिरीत आणि शेतजमिनीत दोन मृतदेह सापडले. हे दोघेही मृतदेह सुरेशचे मित्र कैलास आणि सोन्याचे होते. त्यामुळे तिघांची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी गजाननसह त्याच्या नातलग आणि पूर्वीच्या वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. सुरेशचा मृतदेह ज्या टाकीत सापडला होता, त्या टाकीचे झाकण अरुंद असल्याने त्यात सुरेश बुडून मरण्याचा प्रश्‍नच येत नसल्याचे उघड झाले. तर कैलास आणि सोन्याच्या मृतदेहाचे तुकडे करून त्यांचा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून सात आरोपींना अटक केली. त्यात कैलासच्या प्रेयसीच्या वडील, भाऊ, काकांसह जुन्या वाहन चालकाचाही समावेश होता. 

पोलिसांच्या तपासात कैलासचे परजातीय मुलीसोबत म्हणजेच गजाननच्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचे उघडकीस आले. ज्या महाविद्यालयात गजाननची मुलगी शिकत होती त्याच महाविद्यालयात कैलास स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत होता. दोघांचे प्रेम जुळले. याची कुणकुण हळूहळू गावातील काही नागरिकांना आणि मुलीच्या कुटुंबीयांनाही लागली. त्यांनी कैलासला धमकावत मुलीसोबत न बोलण्यास सांगितले. मात्र, प्रेमात आकंठ बुडलेल्या दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला. याची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना लागली. यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी गजाननचा काटा काढण्याचे ठरवले. 

नियोजित कटानुसार घरच्यांनी जुना चालक रावसाहेब यास वस्तीवरील शौचटाकी स्वच्छ करण्यासाठी म्हणून सुरेशला फोन करून बोलावण्यास सांगितले. त्यासाठी जादा पैशांचे आमीष दाखवले. त्यामुळे सुरेश त्याच्यासह मित्र कैलास आणि सोन्याही टाकी स्वच्छ करण्यासाठी गजाननच्या शेतात आले. सुरेश प्लंबिंग व टाक्यासफाईची कामे करायचा. त्याच्या मदतीला कैलास व सोन्या हे मित्रही असायचे. 

त्यादिवशी सकाळी तिघेही कामासाठी हजर झाले. टाकी स्वच्छ करत असताना तिरस्काराने पेटलेल्या मुलीच्या घरच्यांनी सुरुवातीस सुरेशचे पाय पकडून त्याचे तोंड शौचटाकीत बुडवले. त्यात गुदमरून सुरेशचा मृत्यू झाला. कैलास आणि त्या मुलीच्या प्रेमाचा सुरेशनेच पहिल्यांदा गावभर बोभाटा केला होता. 

सुरेशची अवस्था पाहून कैलास आणि सोन्याने घटनास्थळापासून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अगोदरच तयारीत असलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी दोघांनाही पाठलाग करून पकडले. त्यानंतर तिच्या त्या नातलगांनी पहिल्यांदा सोन्याला पकडून त्याच्या डोक्यात, पाठीत धारदार हत्याराने वार करून ठार मारले. नंतर कैलासवर सर्वाधिक राग असल्याने आरोपींनी गवत कापण्याच्या अडकित्त्यात कैलासचे हात आणि पाय टाकून तोडलेे. त्याचा जीव गेल्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले. ते पडक्या विहिरीत मोकळ्या शेतात टाकून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी अंगावरील रक्‍ताचे कपडे शेतात जाळून टाकले. तसेच कैलासने आणलेली दुचाकीही लपवून ठेवली. 

पण कामासाठी म्हणून घराबाहेर पडलेली मुले अद्याप परत न आल्याने मुलांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. गजानन मला काही माहीत नाही असा पवित्रा घेतला. शेवटी पोलिसांत बेपत्ताची केस दाखल केल्यानंतर गजाननने सुरेशच्या मृत्यूची माहिती पोलिसांना दिली. सुरुवातीस आम्ही कोणताही गुन्हा केलाच नाही असा पवित्रा आरोपींनी घेतला होता. मात्र, पोलिसांच्या तपासात आरोपींविरोधात ठोस पुरावे सापडले. त्यात चालकाने कैलास आणि त्याच्या मित्रांना टाकी साफ करण्यासाठी बोलवणे, घटनेनंतर गजाननची मुलगी महाविद्यालयात  न जाणे, गजाननने पोलिसांना सुरेशच्या मृत्यूची चुकीची माहिती देत दिशाभूल करणे तसेच गजाननच्याच शेतात कैलास, सुरेश आणि सोन्या यांना मजुरीसाठी आलेल्या लोकांनी पाहिल्याची साक्ष, त्याचप्रमाणे आरोपींनी काही दिवसांपूर्वी कैलासला जीवे मारण्याची दिलेली धमकी या गोष्टी सिद्ध झाल्या. त्यामुळे न्यायालयाने सातपैकी सहा आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. तर एकाची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्‍तता झाली.    
    
गौरव अहिरे, नाशिक.