Sun, Feb 24, 2019 02:17होमपेज › Crime Diary › पापाचा घडा

पापाचा घडा

Published On: Feb 14 2018 2:49AM | Last Updated: Feb 14 2018 2:49AMरात्री उशिरा कामावरून घरी परतणार्‍या व्यक्‍तीस हेरायचे. त्याच्याकडील चीजवस्तूंचा अंदाज घ्यायचा. त्याची इच्छा नसतानाही त्याला घरी सोडण्याच्या बहाण्याने आपल्याकडील रिक्षामध्ये बसवायचे. त्यांना निर्जनस्थळी नेऊन  लुटायचे. प्रतिकार करणार्‍यास बेदम मारहाण करायची. लुटल्यानंतर वाटेत सोडून द्यायचे असा उद्योग तिघाजणांच्या टोळक्यांनी सुरू केला होता; पण एकाने मात्र प्रसंगावधान राखून त्या टोळक्याच्या हातून आपली सुटका करून घेतली आणि पोलिस स्टेशन गाठले. टोळक्याचे वर्णन त्यांचा रिक्षा क्रमांक दिल्यानंतर या टोळक्यास जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आणि त्यांच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश झाला.

काही महिन्यांपूर्वी सांगली इस्लामपूर बायपास रस्त्यावरील सांगलीवाडी - कदमवाडी परिसरात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याची खबर एका व्यक्‍तीने सांगली शहर पोलिस ठाण्यात दिली. पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी रवाना झाले. रितसर पंचनाम्याचा सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर या खुनाचा तपासाच्या द‍ृष्टीने चौकशी करण्यात आली. खून झालेली नेमकी व्यक्‍ती कोण? याच्या खुनामागील कारण काय? मारेकरी कोण? याबाबी तपासाच्या द‍ृष्टीने तशा महत्त्वाच्या होत्या. तथापि कोणताच धागा घटनास्थळी दिसून येत नव्हता; पण चार-पाच दिवसांनंतर एक मध्यमवर्गीय व्यक्‍ती तडक सांगली शहर पोलिस ठाण्यात रात्री साडेअकराच्या दरम्यान दाखल झाली. आणि ‘लुटीच्या इराद्याने मला तिघांनी मारहाण केली. एका रिक्षातून मला निर्जनस्थळी रात्रीच्या वेळेस नेले. जेवणाचा डबा, शे-दोनशेची रोकड, मनगटी घड्याळा व्यतिरिक्‍त माझ्याकडे काहीही नव्हते. चोरट्यांनी रोकड काढून घेतली. मध्येच सोडून त्यांनी रिक्षासह पलायन केले. अहो साहेब, तुम्ही मला न्याय द्या. तुम्हाला रिक्षा नंबरसहीत त्या व्यक्‍तीचे वर्णनही सांगतो. साहेब ही बाब गांभीर्याने घ्या. त्या टोळक्यांना जेरबंद करून त्यांना तुरुंगात टाका.’ म्हणून दाद मागू लागली.

पो. नि. रवींद्र शेळके यांनी तक्रार नोंदवून घेतली. पुढील तपासाची चक्रेही फिरवली गेली. काही दिवसांपूर्वी सांगलीवाडी - कदमवाडी रस्त्यावरील एका शेतात आढळून आलेला मृतदेह  तसेच आज एका मध्यमवर्गीय व्यक्‍तीस लुटीच्या इराद्याने केलेली मारहाण, त्यांनी केलेली तक्रार, टोळक्याच्या रिक्षा नंबरसहीत केलेले वर्णन, लुटारुंची दिलेली माहिती याचा काहीतरी संबंध असणार. त्यामुळे  पो. नि. शेळके यांनी काही खबर्‍यांना याबाबत सूचना दिल्या. 

त्या रात्री साडेआठ नऊच्या दरम्यान एका रिक्षामध्ये तिघा व्यक्‍तींच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्यानंतर खबर्‍याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी रिक्षाला घेराव घालून रिक्षाची पाहणी केली. त्यावेळी एका अल्पवयीन युवकासह दोघेजण रिक्षात आढळून आले. तपासणीत रिक्षात काठी व धारदार शस्त्रेही आढळून आल्यानुसार चौकशीसाठी त्या तिघांना ताब्यात घेण्यात आले. 

प्रथमतः आम्ही त्यातले नाही, उगीच आमच्यावर आळ घेऊ नका, चोर सोडून संन्याशाला का फाशी देताय, अशा प्रकारचा आव आणला. पोलिस ठाण्यात त्या तिघांना आणल्यानंतर पो. नि. यांनी त्यांच्यावर प्रश्‍नांची सरबती सुरू ठेवली. मग पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर ते तिघेही पोपटासारखे बोलू लागले. त्यातील एकजण बिलंदर निघाला. ‘असे खूप गुन्हे मी पचवलेत, अशा गुन्ह्यात माझा कोणीही हात धरू शकणार नाही,’ बघा मी कसा सहज निसटतोय ते’ अशी वल्गना तो करू लागला. यावेळी ‘आम्ही तिघांनी मिळून एकाला संपविले आहे. मीही यापूर्वी एक खून पचविला आहे,’ असेही तो बोलून गेला. शेळके साहेबांच्या मग खास चौकशीत यापूर्वी तिघांनी मिळून केलेल्या खुनाची त्यांनी कबुली दिली. मारहाण करून लुटून त्याचा मृतदेह सांगलीवाडी - कदमवाडी हद्दीतील एका शेतात टाकल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. 

‘एके रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कामावरून परतणारा एकजण आढळून आला. ‘कुठे जाणार आहात’ याची आम्ही चौकशी केली. तो एक ते आठ तारखेचा कालावधी असल्याने त्याच्याकडे पगाराची रक्‍कम असल्याचा अंदाज बांधून त्याला आम्ही रिक्षात बसविले. बायपास मार्गे एका निर्जनस्थळी आणून त्याच्याकडील रक्‍कम काढून घेतली. प्रतिकार केल्यामुळे आम्ही तिघांनी त्याला  मारहाण केली. तशा अवस्थेतही तो ‘तुमची तक्रार नोंदवतो, तुम्हाला खडी फोडायला तुरुंगात पाठवतो’ असे म्हणू लागल्यानंतर त्याला रस्त्या कडेच्या एका शेतात नेऊन परत बेदम मारहाण करून टाकून दिले. त्याची पूर्ण हालचाल थांबल्यानंतर निघून आलो. घरी येऊन कपडे बदलले. दुसर्‍या दिवसापासून आम्ही काही घडलेच नाही असे दाखवायला सुरुवात केली. काही दिवसांनी पुन्हा हा लुटमारीचा धंदा सुरू केला...’

आपल्या गुन्ह्याचे बिंग फुटेल या धास्तीने निरपराध व्यक्‍तीचा तिघांनी बळी घेतला पण एका जागृत नागरिकाने दाखवलेल्या माहितीवर पोलिसांनी सतर्कता दाखवून या टोळक्याच्या मुसक्या आवळल्या. यातील एक अल्पवयीन असल्याने त्या युवकाची बालसुधार गृहात तर दोन मध्यमवर्गीय गुन्हेगारांची कारागृहात रवानगी करण्यात आली.

सचिन ढोले, सांगली.