Thu, Nov 14, 2019 07:31होमपेज › Crime Diary › हैवान पाब्लो! १८ कोटींची शेकोटी!

हैवान पाब्लो! १८ कोटींची शेकोटी!

Published On: Jul 10 2019 1:34AM | Last Updated: Jul 17 2019 2:10AM
सुनील कदम, कोल्हापूर
 

संपूर्ण जगाला हादरवून सोडणार्‍या पाब्लो एस्कोबारचा उदय कसा झाला, हे आपण यापूर्वीच्या भागात वाचलेलेच आहे. आता त्याच्या अफाट संपत्तीची अचंबित करणारी ही कथा. 
पाब्लो एस्कोबारकडे कोकेन तस्करीच्या माध्यमातून इतका पैसा जमा झाला होता, की त्याची गणती करणेच अशक्य. त्यामुळे पाब्लोने उभ्या आयुष्यात कधी पैशाची फिकीरच केली नाही. त्याच्या घरात आणि गोदामांमध्ये पैसा अक्षरश: सडत पडलेला दिसून येत असे. याच पैशाच्या जोरावर पाब्लोने कोलंबियाचा राष्ट्राध्यक्ष होण्याचाही प्रयत्न केला होता. त्यासाठी देशावर असलेले 40 हजार कोटी रूपयांचे कर्ज फेडण्याचीही त्याची तयारी होती, पण ...

लहानपणी पाब्लोला पायात घालायला बूट नसल्यामुळे त्याला शाळेतून बाहेर काढण्यात आले होते, शाळेची फी भरायला पैसे नसल्यामुळे त्याला शाळा सोडावी लागली होती. पण एक काळ असा आला की त्याच पाब्लोच्या घरी साक्षात लक्ष्मी पाणी भरायला लागली. आपल्या पुढच्या आयुष्यात पाब्लोने कोकेन तस्करीच्या माध्यमातून अमाप पैसा मिळविला. इतका की त्याच्या काळात तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्‍तींच्या यादीत गणला जाऊ लागला.1970 पासून  दोन-तीन दशके पाब्लो जवळपास निम्म्या जगात कोकेनची तस्करी करीत होता. या धंद्यातील त्याची वार्षिक उलाढाल इतकी प्रचंड होती की वर्षाकाठी पाब्लोला जवळपास 1 लाख 54 हजार कोटी रूपयांचा निव्वळ फायदा होत होता. साधारणत: आपल्या देशातील अनेक राज्यांचा वार्षिक अर्थसंकल्पसुध्दा एवढा मोठा नाही. 

एवढ्या प्रचंड प्रमाणात मिळणारा पैसा ठेवायचा कुठे, हा पाब्लोसमोरचा एक जटील प्रश्‍न बनून गेला होता. कारण मिळणारा हा सगळा पैसा कोकेन तस्करीच्या अवैध मार्गाने मिळविलेला असल्यामुळे पाब्लो तो पैसा बँकांमध्ये ठेवू शकत नव्हता. त्यामुळे घरात, गोदामात आणि जागा मिळेल तिथे पाब्लोच्या पैशाच्या थप्प्या रचून ठेवल्या जात होत्या. अनेकवेळा तर जंगलांमध्ये आणि जमिनीत वेगवेगळ्या ठिकाणी खड्डे काढून त्यात हजारो कोटी रूपये पुरून लपवून ठेवले जायचे. असे म्हणतात की काही वेळेला पाब्लोला स्वत:लाच आपला पैसा नेमका कुठे कुठे ठेवला आहे, याची माहिती नसायची. मिळणार्‍या नोटांचे मोजून गठ्ठे बांधून ठेवण्यासाठी पाब्लोने काही माणसेच कामाला ठेवली होती. हे कामगार रबरबँडने नोटांचे गठ्ठे बांधायचे. त्यावेळी साधारणत: एक रूपयामध्ये पंचवीस रबरबँड मिळायचे.  या नोटांचे गठ्ठे बांधण्यासाठी या कामगार लोकांना आठवड्याला तब्बल 1 लाख 75 हजार रूपयांचे नुसते रबरबँड लागायचे. यावरून पाब्लोकडे किती प्रचंड प्रमाणात पैसा येत असेल त्याचा अंदाज येण्यास हरकत नाही.  जागा मिळेल तिथे या पैशाच्या थप्प्या रचून ठेवल्या जायच्या. पाब्लोने अशा पध्दतीने ठिकठिकाणी ठेवलेल्या पैशातील जवळपास 7 हजार कोटी रूपये दरवर्षी वाळवी लागल्याने किंवा उंदरांनी कुरतडून टाकल्याने नष्ट व्हायचे, पण त्यामुळे पाब्लोला काडीइतकाही फरक पडत नव्हता. कारण मिळणारा पैसाच इतका प्रचंड होता की त्याच्यापुढे 7 हजार कोटी रूपये म्हणजे ‘दर्या में खसखस’! कोलंबिया सरकारच्या अंदाजानुसार त्या काळात पाब्लोकडे साधारणत: 2 लाख 24 हजार कोटी रूपयांची रोकड होती. त्याच्या मालकीची विमाने, हेलिकॉप्टर्स, पाणबुड्या, हजारो एकर जमीन, आलिशान बंगले, बंदर, विमानतळ हे सगळे धरले तर पाब्लोची मालमत्ता त्या काळात जवळपास 4 लाख कोटी रूपयांची होती म्हणायला हरकत नाही. 

1970-80 च्या दशकातील 4 लाख कोटी रूपये म्हणजे आताच्या तुलनेत जवळपास 20 लाख कोटी रूपये झाले. याचा अर्थ आज भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्यापेक्षा पाब्लोकडे जवळपास वीसपट जादा संपत्ती होती, असे समजायला हरकत नाही. विशेष म्हणजे पाब्लोच्या मृत्यूनंतर कोलंबिया आणि अमेरिका सरकारने पाब्लोची ही जमिनीत पुरून ठेवलेली संपत्ती शोधून काढण्यासाठी विशेष मोहीम उघडली होती. काही लोकसुध्दा रानावनात आणि जंगलात फिरून पाब्लोने पुरून ठेवलेल्या पैशातील काही रक्कम आपणाला मिळते काय, यासाठी अनेक वर्षे शोध घेत होते. मात्र त्यापैकी कुणाच्या हाताला काय लागले, याचा शेवटपर्यंत उलगडा होऊ शकला नाही. कदाचित पाब्लोने जमिनीत पुरून ठेवलेले हजारो कोटी रूपये उंदीर-घुशी आणि वाळव्यांनीसुध्दा फस्त करून टाकले असावेत.

पाब्लोचे आपल्या कुटुंबीयांवर जीवापाड प्रेम होते. त्याची बायको व्हिक्टोरिया आणि मुलगी ज्युआन व मुलगा मॅन्यूएल यांची तर तो अतिशय काळजी घ्यायचा. त्यांच्यासाठी त्याने तब्बल पाच हजार एकर जागेवर त्या काळातील जगातील सर्वात आलिशान आणि सर्व सोयींनीयुक्‍त असा ‘हैसियेंदा नॅपोलेस’ नावाचा महालच बांधला होता. या ठिकाणी जगभरातील सगळ्या सोयीसुविधा तर होत्याच, पण जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय, अनेक स्विमिंग पूल, तलाव आणि नितांतसुंदर असे बागबगिचे होते. एकदा पाब्लोची मुलगी ज्युआन हिला न्यूमोनिया झाला आणि रात्रीच्यावेळेस तिला भयंकर थंडी वाजू लागली. ऐनवेळी शेकोटी करण्यासाठी वाळलेली लाकडे मिळाली नाहीत म्हणून पाब्लोने आपल्या लाडक्या लेकीसाठी चक्क नोटांचे गठ्ठे जाळून शेकोटी तयार केली. या शेकोटीत तब्बल 18 कोटी रूपये पाब्लोने जाळून टाकले, यावरून पाब्लोच्या आयुष्यात पैशापेक्षा आपल्या कुटुंबीयांना किती अफाट महत्त्व  होते, याचा अंदाज येण्यास हरकत नाही. 

आपल्या कुटुंबीयांसाठी आणि प्रामुख्याने त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीकोनातून पाब्लोने एक ग्रीक पध्दतीचा किल्लाच बांधायला सुरूवात केली होती. मात्र पाब्लोच्या दुर्दैवाने आणि कोलंबिया सरकारच्या सुदैवामुळे या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. हा किल्ला बांधून पूर्ण झाला असता तर कदाचित पाब्लो कधीही पोलिसांच्या हाती लागला नसता.  दुर्दैवाची बाब म्हणजे पाब्लोच्या ‘कर्तबगारी’मुळेच पाब्लोच्या मृत्यूनंतर त्याच्या बायका-मुलांना कोलंबिया देश सोडून पळून जावे लागले. जगाच्या पाठीवरील एकही देश त्यांना थारा द्यायला तयार झाला नाही. शेवटी आधार मिळविण्यासाठी पाब्लोच्या बायका-मुलांवर त्याचे नावसुध्दा टाकून देण्याची वेळ आली. त्यानंतर उभ्या आयुष्यात पाब्लोच्या कुटुंबीयांनी कधीही पाब्लो या नावाचा कोणत्याही कारणासाठी वापर केला नाही. ज्या कुटुंबावर पाब्लोचे जीवापाड प्रेम होते, त्या कुटुंबीयांना त्यांच्या आयुष्यात पाब्लोचे नावसुध्दा वापरणे अशक्य होऊन जावावे, याला दैवदुर्विलासच म्हणावा लागेल. विशेष म्हणजे ज्या कुटुंबीयांसाठी म्हणून पाब्लोने इतकी अफाट माया जमविली, त्यातील एक फुटकी कवडीसुध्दा त्याच्या बायको-पोरांच्या वाट्याला येऊ शकली नाही. कोलंबिया सरकारने पाब्लोची सगळी मालमत्ता, पैसाअडका जप्त करून तो सरकारजमा करून टाकला.

आपल्या आयुष्यातील अखेरच्या टप्प्यात पाब्लोने पैशाच्या जोरावर कोलंबियाचा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठीही बराच प्रयत्न केला. त्यासाठी त्याने त्याकाळी कोलंबिया सरकारवर असलेले 40 हजार कोटी रूपयांचे कर्ज एकरकमी भागविण्याची तयारी दर्शविली होती. शिवाय विकासकामांसाठी कोलंबिया सरकारला हजारो कोटी रूपये देण्याचीही तयारी दर्शविली होती. मात्र सरकारने पाब्लोचा हा प्रस्ताव स्वीकारला नाही. जर यदाकदाचित पाब्लो कोलंबियाचा राष्ट्राध्यक्ष झालाच असता तर कोकेन तस्करीच्या माध्यमातून त्याने आणखी किती थैमान घातले असते, त्याची कल्पनासुध्दा करता येत नाही.
लोकाश्रय मिळविण्यासाठी म्हणून पाब्लोने अनेक कामे केली. कोलंबियामध्ये त्याने कित्येक फूटबॉल मैदाने तयार करून दिली, त्यासाठी हजारो कोटी रूपयांच्या देणग्या दिल्या. त्याच्या मेडेलिन गावासह अनेक गावांमध्ये चर्च उभारून दिली. पाब्लोकडे असलेला अफाट पैसा आणि थरकाप उडविणारे त्याचे गुन्हेगारी कारनामे बघून लोकांच्या मनात त्याच्याविषयी रॉबीनहूडची प्रतिमा तयार झाली होती. पाब्लोही स्वत:ला रॉबीनहूडच समजायचा. हजारो लोकांना देणग्या दिल्यामुळे आणि लाखो गोरगरिबांना वेगवेगळ्या पध्दतीची मदत केल्यामुळे या लोकांच्या मनात पाब्लोविषयी एक प्रकारचा आदर तयार झाला होता. त्यामुळे तर पाब्लोच्या अखेरच्या दिवसांमध्ये याच लोकांनी पाब्लोला पोलिसांपासून वाचविण्यासाठी त्याला मदत केली.

‘अति तिथं माती’ हे ठरलेलेच आहे, पाब्लोच्या बाबतीतही तसेच झाले. अफाट पैशाच्या जोरावर त्याच्या महत्त्वाकांक्षा उफाळून आल्या. पैशाच्या जोरावर त्याने देशातील राष्ट्राध्यक्ष हे सर्वाच्च स्थान मिळविण्यासाठी बरीच खटपट केली. त्यासाठी राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीतील एका उमेदवाराचाच मुडदा पाडला आणि पाब्लोच्या पापाचा घडा भरायला सुरूवात झाली. एकापाठोपाठ एक संकटांनी पाब्लोवर घाला घालायला सुरूवात केली. आजपर्यंत सगळे काही पैशाच्या जोरावर रेटून नेणार्‍या पाब्लोला आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात पैसा काही कामी आला नाही. लाखो  कोटी रूपये असूनसुध्दा पाब्लोची काही मात्रा चालू शकली नाही. पाब्लोचे अनेक साथीदार त्याच्यावर उलटले, अनेकांनी त्याची साथ सोडली. ज्या लोकांना त्याने हजारो कोटी रूपयांची मदत केली होती ते लोकसुध्दा त्याच्या पडत्या काळात त्याला मदत करायला तयार झाले नाहीत. पाब्लोने आपल्या आयुष्यात हजारो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करून लाखोजणांशी शत्रूत्व पत्करले होते. या लोकांनी पाब्लोच्या शेवटच्या दिवसात जणू काही सूड उगविण्याच्या हेतूने पाब्लोचा पिच्छा पुरविला. अमेरिका आणि कोलंबियाचे पोलिसही हात धुवून त्याच्या मागे लागले होते. जगातील सर्वाधिक आलिशान महाल पाब्लोच्या कामी आला नाही, हा महाल आणि बायको-मुले सोडून पाब्लोला परागंदा व्हावे लागले. कधी रानावनात तर कधी गोरगरिबांच्या झोपडपट्टीत लपून-छपून राहण्याची त्याच्यावर वेळ आली. कधीकाळी गोरगरिबांना लाखो रूपये वाटणार्‍या आणि आपल्या देशाला हजारो कोटी रूपयांचे कर्ज द्यायला तयार झालेल्या पाब्लोवर एकवेळच्या अन्नासाठी मोताद होण्याची वेळ आली. जवळपास निम्म्या जगाला कोकेनच्या नशागर्तेत ढकलून, लाखो कोटी रूपये कमावून ऐषोआरामी जीवन जगायची स्वप्ने बघणार्‍या पाब्लोवर दैवाने उगविलेला हा सूडच म्हणावा लागेल. (क्रमश:)