Fri, Apr 26, 2019 20:07होमपेज › Crime Diary › मोहपाश

मोहपाश

Published On: Oct 31 2018 12:56AM | Last Updated: Oct 31 2018 12:56AMजप्त केलेले साहित्य पोलिस बारकाईने पुन्हा तपास करू लागले. मात्र तपास करूनही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे या खुनाचा छडा लावायचा कसा? हा प्रश्‍न पोलिसांना पडला होता. कडाक्याच्या थंडीत चहाच्या टपरीवर गर्दी होती. हवालदार ठोंबरे चहा पीत पीत अनुराधाच्या खुनाची कडी सोडवण्याचा प्रयत्न करत होते. ‘साहेब, लागला का हो तपास’ असे म्हणताच, ‘नाही रे अजून? बघ तुला काही माहीत आहे का?’, ‘साहेब, मोहन ड्रायव्हरला पकडा. तोच तुम्हाला सांगेल’ असे म्हणताच पोलिसांनी मोहनला ताब्यात  घेतले.

डी. एच. पाटील, म्हाकवे (कोल्हापूर)

‘मुंबईच्या लोकांच्या वाढलेल्या गर्दीत पशुपक्ष्यांची संख्या मात्र कमी होऊ लागली आहे. त्यात तुलनेने  कावळ्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. वाढते प्रदूषण व वाढलेल्या मोबाईल टॉवरची संख्या यामुळे पक्ष्यांची संख्या झपाट्याने रोडावली. आज मुलुंडच्या त्या भागात असणार्‍या एका टॉवरवर सकाळपासूनच कावळे व गिधाडांची गर्दी दिसून लागली होती. कामाच्या शोधात आलेला आणि इथे बर्‍यापैकी रूळलेला समीर हा तरूणही उठला. त्याने बाहेर पाहिले. त्याची वॉचमनची ड्युटी असली तरी रात्री त्याला झोप पुरेशी मिळत होती.

कावळ्याचा ‘कावकाव’पणा वाढला तसा तो उठला.  ‘काय  ही बिशाद कावळ्यांची.  आयला, म्हाळाचा महिना अजून हाय वाटतं’ असे म्हणत त्याने बाहेर बघितले. तर मरणाची थंडी पडलेली. अशा थंडीत  गप्प बसण्याऐवजी कावळ्यांचा होणारा कर्कश आवाज त्याला बेचैन करत होता. श्रावण महिना झाला की, म्हाळाचा महिना.  त्याला आठवले, गावाकडे भाताच्या मळण्या सुरू असायच्या. अमावस्या झाली की, येणार्‍या पहिल्या गुरुवारी पाटलांच्या म्हाळाचा वार असायचा. मग इतरांचा. पहाटे उठून आई दहीभाताचा नैवेद्य कावळ्यासाठी केळीच्या पानात घालून द्यायची. बापू घराला शिडी लावून घरावर नैवेद्य ठेवायचा. मग कावळा येऊन नैवेद्य खाऊन जायचा. क्षणभराने तो भानावर आला.

टॉवरच्या खाली थंडीने कुडकुडत एक कुत्रे पाय दुमडून झोपलेले होते. समीरने दार उघडताच वस्सकन् त्याच्या अंगावर भुकले. ‘ए लेकाच्या, वळख लागना व्हय रं?’ तसं शेपटीचा गोंडा हलवत त्याचा हात चाटू लागले. पुन्हा ते कुत्रे भुंकू लागले. तो पुढे झाला. त्याने पाहिले अन् तो दचकला. समोर कोणी तरुणी निपचित पडलेली होती. आता त्याला उमगले. मगापासून कावळे का ओरडत होते ते. त्याला काही सुचेना तो उठला. टॉवरच्या जवळपास वस्ती नव्हती. तो सकाळी सकाळीच मोठ्याने ओरडला. त्याच्या ओरडण्याने लोक गोळा झाले. आता सूर्य बराच वर झाला होता. गुलाबी थंडी अंगाला बोचत होती. झोपडपट्टीतली मुले कचर्‍याची शेकोटी पेटवून शेकत बसली होती. समीरच्या आवाजाने तीही पळत आली. गर्दीतल्या एकाने पोलिसांना फोन केला. 

घटनेची खबर मिळताच फौजदार वाय. डी. पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. टॉवरच्या खाली तरुणीचा मृतदेह पडला होता. मृतदेहाजवळ पोलिसांनी काही सापडते का ते पाहिले. मयत तरुणीच्या अंगावर कोणत्याही जखमा अगर खुणा नव्हत्या. मात्र गळ्यावर लालसर व्रण दिसत होते. पोलिसांनी बारकाईने तपास केला. मात्र काहीच घटनास्थळी सापडत नव्हते. पोलिसांनी टॉवरचा सगळा परिसर पिंजून काढला. पंचनामा पूर्ण करून फौजदार पाटील यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आता सूर्य बराचसा वर आल्याने बघ्यांची गर्दी बरीच जमली होती. मात्र तरुणीच्या राहणीमानावरून ती कुठेतरी काम करत असावी, असे वाटत होते. 

टॉवरचा भाग पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी पिंजून काढला. मात्र कोणीही मयत तरुणीस ओळखत नव्हते. अखंड मुलूंडचा परिसर पिंजून काढूनही मयताची ओळख पटत नव्हती. दोन तीन दिवस चौकशी करूनही मयत तरुणीची ओळख पटली नाही. वृत्तपत्रात पोलिसांनी बातमी दिली. तीन दिवसानंतर एक तरुण हातात पेपर घेऊनच फौजदार वाय. डी. पाटील यांच्या समोर उभा राहिला.

‘साहेब, ह्या तरुणीला मी ओळखतो.’ त्याचबरोबर पाटील साहेबांनी त्याला बसायला खुर्ची दिली. ‘बोला, तुम्हाला काय माहिती  आहे?’

‘साहेब, मयत तरुणी एम. आय. कंपनीत कामाला होती. मात्र एक वर्षापासून तिने नोकरी सोडली होती. कंपनीच्या समोर माझी चहाची टपरी आहे. त्यामुळे मी तिला ओळखतो. मात्र ती कुठे राहते ते माहीत नाही.’

पोलिसांनी लागलीच एम. आय. कंपनी गाठली. कंपनीचा मालक जगदीश टपोरा कंपनीतच होता.

‘साहेब, बोला.’ मयत तरुणीचा फोटो दाखविताच जगदीशच्या डोळ्यात पाणी आले. ‘साहेब, ही माझी बायको आहे, मात्र दुसरी! ती गावी निघून घेली असेल म्हणून मी जास्त चौकशी केली नाही तिची. पण मला सकाळीच आमच्या चहावाल्याकडून समजलं. मी आपल्या स्टेशला फोनही केला होता.’ साहेबांनी एकवार त्यांच्याकडे पाहिले. तो चपापला. ‘माझ्या कंपनीतच ती माझी सेक्रेटरी होती. त्यातूनच आमचे प्रेम निर्माण झाले. मग मी अन् अनुराधानं लग्‍न केलं. पण साहेब, मी नाही मारलं तिला हो.’ जगदीशची चौकशी करून पोलिस कंपनीतून बाहेर पडले.

पोलिसांनी लागलीच जगदीशचे घर गाठले. जगदीशची पहिली पत्नी सुवर्णा सोप्यावरच बसली होती. पोलिसांना पाहताच ती घाबरली. ‘साहेब, काय झालं?’ म्हणत  ती  विचारू लागली.

‘अनुराधाचा खून झालाय. त्याबद्दल चौकशी करायला आलोय.’ ‘मात्र, मला त्याबाबत काहीच माहिती नाही. लग्न केलंय हे मला माहीत होते. मात्र माझ्या मुलीच्या  भविष्याचा विचार करून मी गप्प बसले होते. एवढेच नव्हे तर  तिला बंगला घेऊन दिला तरीही मी गप्प बसले.’

‘म्हणूनच तुम्ही अनुराधाचा खून केला?’

‘नाही साहेब, मुलीची शपथ’ असे म्हणताच पोलिस निघून आले.

पोलिसांनी जगदीशला चौकशीसाठी स्टेशनला आणून थर्ड डिग्रीचा वापर केला. मात्र तरीही जगदीश कबूल करत नव्हता. घटना घडली त्यादिवशीचे जगदीशचे फोन लोकेशन पोलिसांनी पाहिले. त्यामध्येही जगदीश दोषी आढळत नव्हता. चौकशी करून पोलिसांनी जगदीशला सोडून दिले. अनुराधाच्या खुनाचे कारण फक्‍त सुवर्णाकडे होते. मात्र  त्याबाबतही पोलिसांना पुरावा मिळाला नाही. जगदीश-सुवर्णा  खुनी नव्हेत. मग अनुराधाच्या खुनाचा कोणाला फायदा होणार होता?

खुनाची घटना घडून दहा दिवस उलटले तरी खुनाचा तपास लागला नव्हता. पोलिसांना खुनाचे ठोस कारण मिळत नव्हते. फौजदार वाय.डी.पाटील यांनी तपासाची दिशा बदलली. जप्त केलेले साहित्य पोलिस बारकाईने पुन्हा तपास करू लागले. मात्र तपास करूनही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे या खुनाचा छडा लावायचा कसा? हा प्रश्‍न पोलिसांना पडला होता. थंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत होते. कडाक्याच्या थंडीत चहाच्या टपरीवर गर्दी होती. हवालदार ठोंबरे चहा पीत पीत अनुराधाच्या खुनाची कडी सोडवण्याचा प्रयत्न करत होते.

‘साहेब, लागला का हो तपास’ असे म्हणताच, ‘नाही रे अजून? बघ तुला काही माहीत आहे का?’, ‘साहेब, मोहन ड्रायव्हरला पकडा. तोच तुम्हाला सांगेल’ असे म्हणताच पोलिसांनी मोहनला ताब्यात  घेतले. चांगला पाहुणचार दिला. मग मात्र तो वाय. डी. साहेबांच्या समोर पोपटाप्रमाणे बोलू लागला.

‘साहेब, मीच मारलं अनुराधाला. तेही माझ्या प्रेमाखातर...’ असे म्हणून तो रडू लागला. ‘जगदीशसाहेबाकडं मी पाच वर्षांपासून नोकरी करतोय. अनुराधा मॅडमला सोडायला मीच घरी जायचो. लग्‍न झाल्यानंतर मात्र तिने नोकरी सोडली. त्यानंतर माझी प्रेयसी तनुजाला मी सेक्रेटरी म्हणून जगदीश साहेबांकडं ठेवली. मात्र तिथेही त्यांनी तनुजावर जाळं टाकलं. तनुजा साहेबांकडून पैसे मिळवत होती. एकदा मी बोलता बोलता अनुराधाचा विषय काढला अन् तनुजाचे डोके सणकले.  ‘मी जगदीशवर प्रेम करते अन् तो अनुराधावर ’ असे म्हणून तिने मला अनुराधाचा काटा काढायला सांगितला. मी तनुजाच्या  आग्रहाखातर अनुराधाचा खून केला. त्यादिवशी मी सहज म्हणून अनुराधाच्या घरी गेलो आणि तिला गाफील ठेवून दोरीने तिचा गळा आवळला अन् मृतदेह  शेजारी नेऊन टाकून दिला. मात्र खुनानंतर मात्र तनुजा पालटली. ती साहेबातच अडकली. मला मात्र वार्‍यावर सोडलं.’

पोलिसांनी मोहनला अटक केली.

सर्व घटना सत्य मात्र नावे काल्पनिक