Mon, Nov 20, 2017 17:19होमपेज › Crime Diary › अपहरण!

अपहरण!

Published On: Nov 15 2017 1:59AM | Last Updated: Nov 14 2017 8:39PM

बुकमार्क करा

जवळपास चाळीस वर्षांपूर्वी घडलेली ही घटना आहे. सांगली जिल्ह्यातील एका मोठ्या गावात एक सरदार घराणे होते, हे घराणे मूळचे अन्य जिल्ह्यातील; पण जवळपास पन्‍नास-साठ वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यात स्थायिक झाले होते. आजूबाजूच्या चार-पाच जिल्ह्यांत या घराण्याचा ‘सरकार’ म्हणून दबदबा होता. या सरकार घराण्यातील वीरसिंग हे बडे प्रस्थ. वीरसिंग यांची सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत प्रचंड म्हणजे जवळपास अडीच-तीन हजार एकर शेती होती. ज्या ज्या ठिकाणी या सरकारांच्या जमिनी होत्या, त्या त्या ठिकाणी सरकारांच्या हवेल्या होत्या. वीरसिंग सरकारांचे राहणीमान म्हणजे परंपरेनुसार राजेशाही थाटाचेच होते. सांगली जिल्ह्यातील ते राहत असलेल्या गावी त्यांची भलीमोठी हवेली होती.  घरीदारी पाच-पन्‍नास नोकर-चाकर, दारात जर्मन बनावटीच्या दोन काँन्टेसा मोटारी, दोन-तीन जीपगाड्या, बुलेट आणि राजदूतसारख्या चार-पाच मोटारसायकली असा सगळा बडेजाव होता.

या वीरसिंग सरकारांच्या घरी त्या दिवशी नोकर-चाकरांची आणि घरातील लोकांची एकच लगबग सुरू होती. कारण वीरसिंग यांचा पुण्यात शिकायला असलेला थोरला मुलगा सम्राट हा आपल्या चार-पाच मित्रांसह बर्‍याच दिवसांनी गावी आला होता. त्यामुळे भल्यामोठ्या जेवणावळीचे आयोजन करण्यात आले होते. आजूबाजूच्या पाच-पन्‍नास तालेवारांना जेवणाचे निमंत्रण धाडण्यात आले होते. शिरस्त्यानुसार या जेवणावळीसाठी दोन भलेमोठे बोकड कापून सामिष भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. वीरसिंग सरकार या सगळ्याकडे जातिनिशी लक्ष देत होते. इकडे जेवणाची तयारी सुरू होती आणि तिकडे सम्राट आणि त्याचे पुण्याहून आलेले मित्र जीपमधून फिरायला म्हणून बाहेर पडले होते.

सायंकाळी जेवणाची वेळ झाली तसे जेवणासाठी निमंत्रण दिलेली एक-एक मंडळी सरकारांच्या हवेलीवर डेरेदाखल होऊ लागली. मात्र सम्राट आणि त्याच्या मित्रांचाच पत्ता नव्हता. शिवाय आजच्यासारखा तो काही मोबाईलचा जमाना नव्हता की उचलला मोबाईल आणि लावला कानाला! त्यामुळे सम्राट आणि त्याच्या मित्रांची वाट पाहण्याशिवाय कुणाच्या हातात काहीच नव्हते, नाही म्हणायला वीरसिंग सरकारनी एक-दोन नोकरांना मोटारसायकलवरून सम्राटला बोलावून आणण्यासाठी धाडले होते; पण त्यांचाही अजून पत्ता नव्हता, त्यामुळे सरकार काहीसे त्रस्त झाले होते. तेवढ्यात सम्राटची जीप येताना दिसली आणि सरकारांचा जीव भांड्यात पडला. जीप आली पण त्यात सम्राट नव्हता आणि सम्राटचे मित्र काहीसे घाबरलेले आणि कावरे-बावरे झालेले दिसत होते.

सम्राटच्या या मित्रांनी वीरसिंग सरकारना काहीसे बाजूला नेले आणि कानात असे काही सांगितले की त्यामुळे सरकारांच्या काळजाचा ठोकाच चुकला. मित्रांनी सांगितले की आम्ही डोंगराच्या बाजूला फिरायला गेलो असताना एका जीपगाडीतून सात-आठजण आले आणि ते सम्राटला घेऊन गेले. कुठे घेऊन गेले, का घेऊन गेले याची कुणाला काही कल्पनाच नव्हती. सगळ्या रंगाचा बेरंग झाला, सरकारनी जेवणावळ रद्द करून लागलीच आपल्या नोकर-चाकरांना सम्राटच्या शोधासाठी धाडले आणि स्वत:ही सम्राटच्या मित्रांसह आपल्या काँन्टेसा गाडीतून  बाहेर पडले. तास-दोन तास सर्वत्र शोधाशोध केली; पण सम्राटचा काही थांगपत्ता लागला नाही, त्यामुळे वीरसिंग सरकारसह त्यांचे सगळे कुटुंबीय हवालदील झाले होते.

अशा पद्धतीने घरातली सगळी मंडळी सम्राटची चिंता करीत असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास सरकारांच्या घरातील टेलिफोन खणखणला. पलीकडून बोलणार्‍याने सांगितले की, ‘सम्राट आमच्या ताब्यात असून तो जीवंत पाहिजे असेल तर उद्या रात्रीपर्यंत पाच लाख रुपये अमूक-अमूक ठिकाणी ठेवा आणि निघून जावा, पहाटेपर्यंत सम्राटला तुमच्या घरी पोहोच करू’. याबाबत पोलिसांना कळविले तर सम्राटच्या जीवाचे बरेवाईट करण्याची धमकीही अपहरणकर्त्यांनी दिली होती. चाळीस वर्षांपूर्वी पाच लाख रुपये म्हणजे थोडी-थोडकी रक्‍कम नव्हती; पण सरकारांच्या द‍ृष्टीने फार मोठीही नव्हती.

त्यामुळे सरकारांनी दुसर्‍या दिवशी लगेच पाच लाख रुपयांची जुळणी करून रात्री अपहरणकर्त्यांनी सांगितलेल्या एका गुप्त जागी नेऊन ठेवले; पण अपहरणकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे संग्राम काही परत आला नाही. उलट दुसर्‍या दिवशी अपहरणकर्त्यांचा फोन आला आणि त्यांनी आणखी पाच लाख रुपयांची मागणी करून त्याच जागेवर पैसे ठेवण्यास सांगितले. यावेळी मात्र सरकार जरा सावध झाले, कारण सुरुवातीपासून त्यांना सम्राटच्या मित्रांबद्दल काहीशी शंकाच येत होती. 

कारण घटना घडल्यानंतर आपण परत पुण्याला जात असल्याचे सांगून निघून गेलेल्या दोन मित्रांपैकी एक मित्र सरकारांना गावातच दिसून आला होता, सरकारांची गाडी दिसताच तो एका बोळात शिरून गायब झाला होता, त्यामुळे तर सरकारांना यात काहीतरी काळेबेरे असल्याची शंका येत होती. त्यामुळे अपहरणकर्त्यांच्या दुसर्‍या फोनबाबत सम्राटच्या मित्रांना किंवा घरातील अन्य कुणाला काहीही न सांगता त्यांनी ही बाब पोलिसांच्या कानावर घातली. त्यावेळी संबंधित पोलिस ठाण्याचे प्रमुख निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले एक वयोवृद्ध अधिकारी होते. त्यांनी गुन्हेगारी विश्‍वातील बरेच उन्हाळे-पावसाळे बघितले होते.

सरकारांनी याप्रकरणी पोलिसांची मदत घेतली आहे, याची वार्ता या कानाची त्या कानाला कळू न देता पोलिस कामाला लागले. दुसर्‍या दिवशी पोलिसांनी अत्यंत गुप्त पद्धतीने पाच पोलिस अपहरणकर्त्यांनी पैसे ठेवायला सांगितलेल्या ठिकाणी पेरून ठेवले, रात्रभर या ठिकाणावर डोळ्यात तेल घालून जागता पहारा ठेवण्याच्या सूचना या पोलिसांना करण्यात आल्या होत्या, शिवाय हे पोलिस कुणाला शंकासुद्धा येणार नाही अशा अत्यंत साध्या आणि येर्‍या-गबाळ्याच्या वेशात होते. त्या दिवशी सायंकाळी सरकारांनी मुद्दामच सम्राटच्या अन्य मित्रांना आणखी पाच लाख रुपये मागितल्याची आणि आज रात्री आपण ते पैसे तेथे ठेवणार असल्याची बातमी सांगितली. ठरल्याप्रमाणे सरकार रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अपहरणकर्त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी एक पिशवी ठेवून परतले.

रात्री दीड-दोन वाजण्याच्या सुमारास एकजण दबकत दबकत त्या ठिकाणी आला आणि ती पिशवी घेऊन जाऊ लागला, तेवढ्यात दबा धरून बसलेल्या पाच पोलिसांनी झडप टाकून त्याला ताब्यात घेतले, बघतायत तर काय, तो होता पुण्याला जातो म्हणून निघून गेलेला संग्रामचा मित्र. पोलिसी खाक्या दाखवताच तो लागला पोपटासारखे बालायला. त्याचे असे झाले होते की वीरसिंग सरकारांच्या गडगंज पैशाच्या जोरावर सम्राट आणि त्याच्या मित्रांना ऐश करण्याची सवय लागली होती, त्यांची ही ऐश एवढी वाढत गेली होती की सरकार सम्राटला दरमहा पाठवीत असलेले पाच-दोन हजार त्यांच्या चैनीला पुरत नव्हते. त्यामुळे सम्राटसह त्याच्या मित्रांनी सम्राटच्या अपहरणाचा बनाव रचून त्याच्या वडिलांकडून पाच लाख रुपये उकळलेही; पण ‘जमीन मऊ लागली म्हणून कोपराने खणण्याच्या’ हव्यासापायी ते पोलिसांच्या ताब्यात सापडले. संग्रामही यात सामील होताच. सगळी भानगड चव्हाट्यावर आल्यावर मग मात्र 

सरकारांनी सम्राटसह त्याच्या मित्रांचा आपल्या ‘सरकारी पद्धतीने’ असा काही पाहुणचार केला की विचारता सोय नाही. दुसरी बाब म्हणजे या शहरातील पोरांच्या नादानं आपलं पोरगं बिघडायला नको म्हणून सरकारांनी सम्राटचे शिक्षण बंद केले ते कायमचेच!

सुनील कदम, सांगली