Wed, Oct 24, 2018 01:57होमपेज › Crime Diary › क्राईम डायरी : कानातील बाली

क्राईम डायरी : कानातील बाली

Published On: Dec 06 2017 12:01AM | Last Updated: Dec 06 2017 12:01AM

बुकमार्क करा

आज छकुलीची शाळा तशी लवकर सुटली होती. त्यामुळे धावत पळत जाऊन तिने स्कूलबस पकडली. आज दोन तास अगोदर शाळा सुटल्यामुळे आपल्या आईबरोबर दुकानात दंगा मस्ती करायला मिळणार म्हणून ती गाडीत दरवाजाजवळच बसली होती. गाडी सुटली, अर्ध्या तासात ती घराजवळ पोहोचली. दुपार झाली होती. चेहर्‍यावर हास्याची लकेर उडवतच ती दरवाजाजवळ आली. तिने दरवाजा ढकलला. तो आपसूकच उघडला. तिने पळत जाऊन सोपासेटवर दप्तर टाकलं नी ती किचन रूममध्ये आली. अन् तिचा आनंद एकदम मावळला. ती  घाबरली. ‘आई’ म्हणून तिने जोरात किंकाळी फोडली. मग पळत गल्लीत आली. ‘दिणूकाका, चला लवकर आई कशी पडलीया बघा’ म्हणून ती दिनकर राणेंच्या घरात आली. छकुलीच्या कपड्यांवरील रक्ताचे डाग बघून दिनूही घाबरला. तो तिच्याबरोबर घरात आला. आणि समोरचे दृष्य  बघून त्यालाही घाम फुटला. समोर छकुलीची आई सुवर्णा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. दिनूने ताबडतोब पोलिसांना फोन केला. 

घटनेची खबर मिळताच फौजदार माणिक पाटील घटनास्थळी दाखल झाले. सुवर्णाच्या छातीमध्ये पाठीमागून कशाने तरी वार करण्यात आला होता. लागलीच तिच्या नवर्‍यालाही ही माहिती देण्यात आली. आपली रिक्षा घेऊन तो धावत आला. त्यानेही पत्नीचा मृतदेह बघून हंबरडा फोडला.

सुवर्णा मकोटे एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून परिचित होत्या. स्वतःचे किराणा दुकान त्या चालवीत होत्या. अशा व्यक्तीचा खून कोणी व कशासाठी करावा हा प्रश्‍न सर्वांना पडला होता. पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी बारकाईने पाहणी केली. मात्र, कोणताही धागादोरा घटनास्थळी मिळून आला नाही. आरोपीचे फिंगर प्रिंटस् सुद्धा कुठेही आढळले नाहीत. याचा अर्थ आरोपीचे योजनाबद्ध रितीने हा खून केला होता. पोलिसांचा पंचनामा सुरू असताना तीन डान्सबार तरुणी ओरडतच त्याठिकाणी आल्या. ‘आक्का’ म्हणून त्या ओरडत होत्या. त्यांच्या सोबत एक किन्नरही होता. तोही धायमोकलून रडत होता.

पोलिसांनी त्यांना बाजूला घेतलं. अन् विचारपूस चालू केली. ‘साहेब, आक्का आमच्यासाठी अखंड मोहल्यात भांडायची. अहो, आम्ही डान्सबारमध्ये काम करतोय. त्यामुळे गल्लीवाले आम्हाला इथे राहू देत नव्हते. त्यावेळी आक्कानं गल्लीवाल्यांबरोबर भांडण केलं. कोणी सुखाने बारगर्ल होत नाही. मजबुरीने इथे नाचावं लागतं. एकदा तर गल्लीतल्या राहुल जमदाडेने माझा हात धरला तर आक्कानं त्याचं थोबाड रंगवलं, अन् तुझ्या घरात आईबहीण आहे का नाही असं सुनावलं...’

पोलिसांना हलका धागा मिळाला होता. पोलिसांनी राहुलचे घर गाठले परंतु, घटना घडल्यापासून गायब होता. त्याचा फोनही लागत नव्हता. राहुल सापडत नव्हता.

पोलिसांनी शेजारी दिनूवर लक्ष केंद्रीत केले. कारण सुवर्णाच्या प्रेताचा पंचनामा सुरू असताना छकुली दिनूला बिलगून रडत होती. दिनूची चौकशी केली. मात्र, दिनू आपले व सुवर्णाचे संबंध मैत्रीचे होते. त्यात गैर काहीच नव्हते, असे सांगितले. चौकशी करून दिनूलाही सोडून देण्यात आले. मग आपला मोर्चा सुवर्णाचा पती शंकरकडे वळविला. 

खून झाला त्यावेळी शंकर रिक्षावर होता. पोलिसांनी बस स्टँड, रिक्षा स्टँडवर त्याची चौकशी केली. तर शंकर खरे बोलत होता. तरीसुद्धा त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. सहा दिवस उलटूनही कोणताच धागादोरा पोलिसांना लागत नव्हता. सहाव्या दिवशी राहुल स्वतःहून पोलिसांत हजर झाला. ‘साहेब, मी मित्राच्या लग्नासाठी कोकणात दुर्गम भागात होतो. त्यामुळे तिथे फोन लागत नव्हता. कालच मित्राचा फोन आला पोलिस शोधताहेत म्हणून. आज हजर झालोय. साहेब, या डान्सबारमधल्या मुली आमच्या गल्लीत राहतात. त्याला आमचा विरोध होता. त्यावरून आमचा वाद झाला होता. समाजासाठी झटणारी ‘आक्कांसारखी माणसं कमी असतात,’ असे माझ्या आईने सांगितले. नंतर मी त्यांची माफी मागीतली होती.’ राहुललाही सोडून देण्यात आले. 

फौजदार माणिक पाटील यांनी जिथे घटना घडली तिथे पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, संपूर्ण घर धुंडाळून पोलिसांना काहीच सापडले नाही. मात्र, घरासमोर गटारीत एक बाली पोलिसांना आढळून आली. 

दहा दिवसांनंतर खबर्‍याने ‘डान्सबार तरुणीची चौकशी करा’ असे सांगितले. मग पोलिसांनी तिघी जणींना चौकशीला पुन्हा बोलावले. दोघींनी आपला खुनाशी काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, एकीने आपले व सुवर्णाचा पती शंकर याचे संबंध असल्याचे कबूल केले. शिवाय आपण त्याच्या मुलाची आई होणार असल्याचेही सांगितले. कानातली बाली शंकर वापरत नव्हता. दुसरे लग्न करण्यासाठी शंकरनेच सुवर्णाचा खून केला नसेल कशावरून? हा प्रश्‍न माणिक पाटलांना सतावत  होता.

आता बाली हाच धागा पोलिसांच्याकडे होता. पोलिसांनी राहुलला पुन्हा चौकशीसाठी बोलावले. मात्र, तोही बाली वापरत नव्हता. मात्र, ‘ही बाली तो किन्नर हमीद वापरतो’, असे म्हणताच फौजदार पाटलांचे डोळे चमकले. तो त्यादिवशी धायमोकलून रडत होता. पोलिसांनी लागलीच हमीदला ताब्यात घेतले. त्याला चांगला पाहुणचार दिला. शेवटी त्याने तोंड उघडले. ‘होय साहेब मीच मारलं आक्काला. माझ्या स्वार्थासाठी.’ म्हणून तो रडू लागला.

‘साहेब मला ऑपरेशन करायचं होतं. त्या लिंग बदलण्याच्या ऑपरेशनसाठी दोन लाखांची गरज होती. मला पैसे उपलब्ध होत नव्हते. मी सहज विषय शंकर जवळ काढला. त्याने मला आक्काचा खून करण्यासाठी दोन लाखांची सुपारी दिली. माझ्या स्वार्थासाठी मी तिचा खून केला; पण मला पैसे शंकरने दिलेच नाहीत! म्हणून तो रडू लागला. शंकर व हमीदला जन्मठेपेची शिक्षा झाली. बिचारी छकुली मात्र अनाथ झाली.

- डी. एच. पाटील, म्हाकवे, कोल्हापूर