होमपेज › Crime Diary › प्लॅन उलटला खेळ संपला!

प्लॅन उलटला खेळ संपला!

Published On: Oct 03 2018 1:11AM | Last Updated: Oct 03 2018 12:07AMपुष्कराज दांडेकर

जूनच्या शेवटच्या आठवड्यातील दिवस. सकाळ नऊ वाजले होते. कात्रज परिसरात रोजच्याप्रमाणे रेलचेल सुरू होती. कात्रज येथील उच्चभ्रू सोसायटीच्या मागे असलेल्या मैदानातून कुत्र्यांच्या भुंकण्याने रहिवाशांनी फ्लॅटच्या खिडक्या बंदच केल्या होत्या. पावसाळा सुरू झालेला असल्याने पावसात काहीतरी पडलं असावं आणि ते खाण्यासाठी कुत्र्यांचा गोंगाट सुरू झाला असावा, असा अंदाज बांधला जात होता. शेजारच्या सोसायटीला मैदान लागूनच असल्याने याच गोंगाटाचा छडा लावण्यासाठी सोसायटीचा सुरक्षारक्षक मेहमूदभाई त्या मैदानात गेला. तेव्हा त्याला एकाच ठिकाणी कुत्री जमली असल्याचं दिसलं. त्याला वाटलं काहीतरी मेलं असावं; परंतु तो जसजसा जवळ गेला. तशी कुत्री तेथून पसार झाली. दोन कुत्री पळून गेल्यावर मात्र त्याला लक्षात आलं कुणीतरी झोपलंय. पुढे जाऊन त्याने पाहिलं तेव्हा तो जागच्या जागी थबकला. पाहतो तर काय एका माणसाचा मृतदेह. चेहरा विद्रुप झालेला. रक्ताने माखलेला आणि आजूबाजूला कुत्री. अंगातलं सगळं अवसानच गळालं. त्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. शेजारच्या सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांनी तिकडे धाव घेतली. ते दृश्य पाहून त्यांनाही काही सुचत नव्हते.

सोसायटीच्या शेजारी डेड बॉडी सापडली. ही बातमी मात्र सोसायट्यांमध्ये वार्‍यासारखी पसरली. सोसायट्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांना कळविण्यात आले. भारती विद्यापीठ पोलिस घटनास्थळी आले. पंचनामा केला. डेड बॉडी घेऊन निघून गेले. सोसायटीत चर्चांना उधाण आले होते. कोणाची बॉडी असेल, का खून केला असेल, लहान मुलांना याबद्दल काही समजू देऊ नका असे मोठी माणसं सांगू लागली. परंतु मुलांपर्यंतही या गोष्टी आल्या. मुलं घाबरू लागली होती.

मृत व्यक्तीचा चेहरा आधीच दगडाने ठेचलेला होता. त्याबरोबरच कुत्री आणि डुकरांनीही त्याचे लचके तोडले होते. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी प्रथम अनोळखी व्यक्तीच्या खूनप्रकरणी अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करून तपासाची सूत्रे हाती घेतली. मृतदेहाची ओळख पटविल्याशिवाय पुढील तपासच करता येत नव्हता. त्यामुळे प्रथम पोलिसांनी आसपासच्या मिसिंगच्या तक्रारींची पडताळणी केली. सूरज मडके याच्या मिसिंगच्या वर्णनाप्रमाणे कपडे तर मृत व्यक्तीच्या अंगावर दिसत होते. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांना त्यांनी त्याला ओळखले. कपडे आणि वर्णनावरून तो सूरजच असल्याचे प्रथमदर्शनी दिसले. त्यावरून पोलिसांना खात्री झाली की, हा सूरजच आहे. इकडे सूरजच्या घरात सगळ्यांना अचानक धक्का बसला. सूरज रात्री घरातून गेला, परंतु परत आला नाही तो कायमचा. कुटुंबीयांनाही काही कळेना काय झालं असावं सूरजसोबत. कुटुंबातील व्यक्तींना पोलिसांनी विचारपूस केली. कुणाशी वैर, कोणाशी भांडण, काही झालं होतं का. कोणावर संशय मात्र तसं काही झालं नसल्याचं पोलिसांना सांगितल. पोलिसांना त्याची ओळख पटल्याने थोडा धीर आला. म्हणजे तपासात प्रगती होऊ शकते. याचा त्यांना विश्वास आला.

पोलिस कामाला लागले. त्यांनी सूरजचे  मित्र, नातेवाईक आणि शेजारीपाजारी यांच्याकडे चौकशी केली. मात्र काही धागादोरा लागत नव्हता. त्याचवेळी एका खबर्‍याने सांगितले की, सूरज तर काल रात्री अमितेश जाधव सोबत होता. पोलिसांनी अमितेशचा शोध घेण्यास सुरुवात केली. अमितेश आणि त्याचे दोन मित्र रितेश आणि राहुल यांच्यासोबत लेकटाऊन परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी लागलीच पथक पाठवून तिघांनाही ताब्यात घेतलं. तिघांकडे चौकशी केली. मात्र तिघेही उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. पोलिसांनी शेवटी आपला पोलिसी हिसका दाखवल्यावर मात्र अमितेश रडू लागला आणि बोलायला सुरुवात केली.

अमितेश सांगू लागला. हो, आम्हीच खून केला त्याचा. कारण त्याने मला मारण्याचा प्लान केला होता. त्याचा प्लान त्याच्यावरच उलटवण्याचं ठरवलं. अमितेशचे सूरजच्या बहिणीवर प्रेम होते. दोघांचे प्रेमसंबंध असल्याने दोघेही सोबत हिंडत फिरत असायचे. सूरज आणि अमितेशही एकमेकांचे चांगले मित्र होते. तर रितेश त्यांचा दोघांचा चांगला मित्र होता. परंतु आपल्याच मित्राने बहिणीशी प्रेमसंबंध ठेवणे त्याला आवडले नव्हते. त्यात विशेष म्हणजे त्याला बहिणीशी लग्न करण्यास सांगितल्यावर त्याने लग्नाला नकार दिला होता. त्यामुळे सूरजला अमितेशचा भयंकर राग आला होता. अमितेशला संपविण्याचा त्याने निर्धार केला. एके दिवशी अमितेश आणि सूरजचा कॉमन मित्र असलेला रितेश सूरजकडे आला होता. दोघे दारू प्यायला गेले. सूरजने त्याला तिथे गेल्यावर दोन पेग रिचवल्यानंतर अमितेशचा विषय काढला. रितेशने विचारले अरे काय झालं तो तर चांगला आहे ना. आणि सूरज त्याला एकेक करून आपली नाराजी सांगू लागला आणि त्याने केलेला निर्धारही रितेशला सांगितला.

रितेशही त्याच्या हो ला हो करत ऐकू लागला. अमितेशला दारू प्यायला घेऊन जाऊ आणि त्याचा काटा काढू. सूरजने प्लान सांगितला. त्यादिवशी दोघेही घरी गेले. रितेशला मात्र काही राहवेना. त्याने अमितेशला दुसर्‍या दिवशी रात्रीचं  सगळं सांगितलं. मग अमितेशलाही हे ऐकून राग आला. त्याने आता रितेश सोबत मिळून सूरजला संपविण्याचा प्लान केला. सूरज सोबत दारू प्यायला जायचं, परंतु काटा त्याचाच काढायचा. आणि ठरल्याप्रमाणे त्या रात्री तिघेही दारू पिण्यासाठी मोकळ्या मैदानात गेले. तेथे सूरजला दारू पाजली. चौघेही पिले. त्यानंतर चौघांनी सूरजला मारहाण केली. डोक्यात दगड घालून खून केला. सूरजचा प्लान चौघांनी त्याच्यावरच उलटवला आणि खेळच संपवला.