Wed, Nov 21, 2018 19:27होमपेज › Crime Diary › क्रूरतेची परिसीमा

क्रूरतेची परिसीमा

Published On: Nov 07 2018 1:33AM | Last Updated: Nov 06 2018 7:41PMमनोज कळमकर, खालापूर

वार्डमध्ये राऊंड मारून डॉ. विश्‍वजित विश्रांतीकरिता त्यांच्या रूमकडे निघाले... घड्याळाने देखील बाराचे ठोके देत दुसरा दिवस सुरू झाल्याची वर्दी दिली होती. दिवसभर पेशंटच्या गराड्यात वेळेवर जेवण नाही. त्यामुळे डॉक्टरांना कधी एकदा बेडवर अंग टाकतोय असे झाले होते. मोबाईल उशीजवळ ठेवत डॉक्टर बेडवर बसले तेवढ्यात रूममधील इंटरकॉमची रिंग वाजली. रात्री-अपरात्री येणार्‍या कॉलची सवय असल्यामुळे विश्‍वजितनी फोन उचलला...  ‘सर..इमर्जन्सी आहे. 8 वर्षांचा मुलाला आणलंय...’ पलीकडून संध्या नर्सचा 
आवाज होता. पायात स्लिपर चढवली आणि विश्‍वजित जिने उतरून ओपीडीकडे आला. 

‘डॉ. साहेब 2 तासांपासून पोरगं उलट्या करतंय.. उलट्या थांबायचं नाव नाही..पाणी बी थांबत नाही पोटात...’ मुलाच्या आईने रडत रडतच डॉक्टरला माहिती दिली. ‘रात्री काय जेवला होता?’ विश्‍वजितने मुलाच्या आईला विचारले.. ‘यश रात्री नाही जेवला ...संध्याकाळी नातेवाईकांकडे पूजा होती तिथंच आम्ही सर्व जेवलो.’ ‘बाहेर नंतर काय खाल्लंय का? डॉक्टरांच्या प्रश्‍नावर ...‘नाय काय माहीत नाही’ असं उत्तर दिलं. ‘वेळेवर आणलंत आणखी 15 मिनिट उशीर झाला असता तर माझ्याकडे उपचार झाले नसते,’ डॉ. विश्‍वजितचं बोलणं ऐकून मुलाच्या आई-बापांनी हात जोडत ‘डॉक्टर पोराला वाचवा’ अशी विनवणी केली. डॉक्टरांच्या सूचनेनुसार संध्या पटापट कामे करीत होती. तेवढ्यात आणखी दोन मुलांना घेऊन त्यांचे आई- वडील आले. यशचे मित्रच होते. 8 ते 10 वर्षांची मुलं अचानक उलट्या सुरू झाल्या होत्या. दोन्ही मुलांची परिस्थिती गंभीर होती. यशसारखी परिस्थिती होती. तेवढ्यात विश्‍वजितच्या मनात शंका आली. शहाड गावातले हे पेशंट पूजेच्या ठिकाणी जेवलेत आणि त्रास होतोय याचा अर्थ काहीतरी गडबड आहे.पेशंटची संख्या वाढू शकते. रात्रीचे 12.30 वा. होते. विश्‍वजितनी मदतीसाठी 24 तास तत्पर व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर पुढील संकटाची कल्पना देणारा मेसेज टाकत शक्य तेवढ्या डॉक्टर व रुग्णवाहिकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. तोपर्यंत विश्‍वजितच्या रुग्णालयात पेशंटचा आकडा 10 च्या वर गेला. 

विश्‍वजितच्या मेसेजला तत्काळ प्रतिसाद मिळाला. शहरातील डॉक्टरांची टीम आणि पोलिस, सामाजिक कार्यकर्त्यांसह सर्व मदतीसाठी पोहोचले. रुग्णालयाबाहेर गर्दी वाढत चालली होती. शहरातील सेजरीवाल डॉक्टरांकडेसुद्धा असे 3 पेशंट अ‍ॅडमिट झाले असल्याची माहिती गर्दीत एकाने दिली. शहाड गावातील जवळपास 50 पेक्षा जास्त गावकर्‍यांना जेवणातून विषबाधा झाल्याची बातमी व्हॉटस् अ‍ॅपवर पसरली. काही पेशंटना तातडीने पुढे हलविण्याच्या व्यवस्था करावी लागेल याची कल्पना डॉ. विश्‍वजितनी नातेवाईक आणि मदतीसाठी आलेल्या तरुणांना दिली.

तेवढ्यात डॉ. सेजरीवालकडचे 3 मुले दगावल्याच्या बातमीने  सर्वांची धावपळ उडाली. किती जण जेवलेत, आकडा कितीवर जाणार कोणास ठाऊक याचीच चिंता सर्वांना सतावत होती. मोठ्या शहारातील हॉस्पिटला अँब्युलन्स भरून पेशंट जात होते.

दुसरा दिवस उजाडला तोच सुतकी छाया घेऊन.. शहाड गावातील 5 मुलं आणि 60 वर्षीय वृद्धाचा रात्रीच्या घटनेत मृत्यू झाला होता. काळूराम पाटील यांचे वास्तुशांती कार्यक्रमाला हा प्रकार घडला होता. जेवणातून विषबाधा झाली होती. पोलिस यंत्रणा कामाला लागली. पो. नि. अजय भोसले यांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखून स्वतः काळूराम यांच्या घराला भेट दिली. जेवणाची भांडी, शिल्लक जेवण तसेच काळूरामच्या घरातील कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका, अशा सूचना दिल्या. ‘साहेब घराच्या मागं शेगडीवर जेवण बनविले होतं’ असं सांगत काळूरामने घराच्या मागे असलेली मोकळी जागा भोसलेंना दाखवली. एक उग्र दर्प नाकात घुसला. शेतात वापरण्यात येणार्‍या जहाल फोरेटचा वास भोसलेंनी ओळखला. 

बापरे...फोरेट जर जेवणात मिसळले असेल तर..भोसलेंच्या मनात आलेल्या  विचाराने एक भयंकर शहारा अंगावरून गेला. शहाड गाव पत्रकार आणि टी.व्ही. रिपोर्टरने भरून गेलं. ब्रेकिंग न्यूज सुरू झाली होती. पत्रकारांनी भोसले साहेबांना गराडा घातला. ‘अद्याप प्राथमिक तपास सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला सांगण्यासारखे काही नाही.’ सांगत भोसले जीपमध्ये बसले. सोबत जिपमध्ये काळूराम होता. ‘काळूराम जेवणात कोणीतरी जाणून- बुजून विष टाकलंय असं दिसतंय तुमचा कोणावर संशय आहे का?’ भोसलेंच्या प्रश्‍नावर काय उत्तर द्यावं हेच काळूरामला सुचेना. कालच्या घटनेने तो पण सुन्‍न झालेला. ‘तुमचं गावात कोणाशी भांडण आहे का?’ भोसलेंनी परत प्रश्‍न केला. तसा सावरत ‘नाही साहेब, भांडण तंटा नाही. आम्ही पडलो बाहेरगावचे. स्वस्तात जागा मिळाली म्हणून ऐपत नसताना घर बांधलं. कोणाशी वैर घेणार!’ काळूराम बोलला. ‘तरीसुद्धा आठवून सांगा’ ...भोसलेंना काळूरामला बोलतं करायचं होतं. 

काळूरामला 4 महिन्यांपूर्वीची घटना पटकन आठवली. त्याच्या घराला लागून असलेला चाळीचा मालक रोहिदास आणि काळूरामचं जागेवरून वाजलं होतं. काळूरामने अतिक्रमण केलं म्हणून रोहिदासने शिव्या दिल्या होत्या. घर कस बांधतो अशी धमकी काळूरामला दिली होती. दोन दिवसांपूर्वी पण ‘तुझ्या कार्यक्रमात गोंधळ घालतो’ असा रोहिदास बोलला होता, असे काळूरामने भोसलेसाहेबांना सांगितले. भोसलेंनी साध्या वेशातील कर्मचारी शहाड गावात पाठवून रोहिदासला आणण्यास सांगितले. भीतीने थरथरत रोहिदास भोसलेंच्या पुढ्यात उभा होता. 

पोलिस ठाण्याची पायरी न चढलेला रोहिदास गडबडून गेला होता.आपल्याला का आणलं हेच त्याला कळत नव्हतं. ‘भांडणाचा राग असा काढलास ..किती जीव घेतलेस..’ भोसलेंच्या प्रश्‍नावर रोहिदास मटकन खालीच बसला. स्वतःच्या थोबाडीत मारून घेत ..‘साहेब एवढं वंगाळ काम नाय होणार हातानी.. जीव घेण्याचा विचार पण मनात नाय यायचा’ असं म्हणत रोहिदासनी भोसले साहेबांचे पाय धरले. ‘कार्यक्रमात गोंधळ घालणार होतास ना.. असा घातलास गोंधळ’ भोसले रोहिदासला परत दमात घेतला. ‘सायेब रागाच्या भरात बोललो होतो. मलापण पोरबाळं आहेत असं कसं करेन’ रोहिदास काकुळतीला येऊन बोलत होता. गुन्हेगाराला एका नजरेत हेरणार्‍या भोसलेंच्या पोलिसी नजरेला रोहिदास असं करणार नाही याचा अंदाज आला. पण मग खरा गुन्हेगार कसा शोधणार, भोसलेंच्या डोक्यात विचारचक्र सुरू होते.

अचानक मनात विचार चमकून गेला. दगावलेली 5 मुलं काळूरामच्या नात्यातील होती. काळूरामच्या कुटुंबातलं कोणीतरी विष घातलं नसेल कशावरून? भोसलेंनी पुन्हा काळूरामकडे मोर्चा वळविला. जेवण वाढायला कोण कोण होतं त्याची माहिती घेण्यास सुरुवात केली. नात्यातील चार बायका जेवण वाढत होत्या, असा प्रसंग काळूरामवर ओढावला आणि घरातील बायकांना चौकशीसाठी बोलावण भोसलेंना योग्य वाटत नव्हतं. अखेर मनाशी विचार करून एक प्लान तयार केला. साध्या वेशातील महिला पोलिस कर्मचारी सोनम खरे आणि सोबत पो. शि. योगेश शिंदे यांना काळूरामच्या घरातील हालचालीवर नजर ठेवण्यास सांगितले. 

दोन दिवस उलटले. आणखी 25 जण सिरीयस होते. शहाड गावावर शोककळा पसरली होती. सर्व गावात व्यवहार ठप्प होते. स्मशानशांतता होती. परंतु, साध्या वेशातील सोनम आणि योगेश घारीसारखी नजर ठेवून होते. काळूरामच्या घरात गडबड सुरू झाली तसे दोघे सावध झाले. काळूरामची सून हेमाला उलटी झाली आणि ती चक्‍कर येऊन पडल्यामुळे एकच धावपळ उडाली. हेमाला गाडीतून डॉ. विश्‍वजितच्या हॉस्पिटला आणले. शहाड गावातला पेशंट असल्यामुळे कसली रिस्क नको म्हणून विश्‍वजितने सर्व तपासण्या करायचा निर्णय घेतला. हेमाला अ‍ॅडमिट केल्याची खबर पो. शि. योगेशने भोसले साहेबांना दिली. सर्व हालचालीवर बारीक नजर ठेवा, अशा सूचना भोसलेंनी दिल्या. साध्या वेशात वावरणार्‍या सोनमने  हेमासह तिची सासू आणि नणंद याची माहिती काढली. हेमाचं यापूर्वी एक लग्‍न झालं होतं; पण पहिल्या नवर्‍याने सोडचिठ्ठी दिल्यानंतर काळूरामच्या दारूड्या पोराच्या गळ्यात हेमाला बांधली होती. रंगरूप नसलेली आणि कोळशागत काळी हेमाला गळ्यात डोरलं बांधायला आधार एवढंच काय ते दुसर लग्‍न होतं. सोनमने सर्व माहिती भोसले साहेबांना सांगितली. माहितीत वावगं नसलं तरी हेमा दोन दिवसांनी अ‍ॅडमिट झाली. विष इथंच कुठेतरी मुरतंय असा संशय भोसलेंच्या मनात होता.

त्यांनी डॉ. विश्‍वजितला फोन लावून हेमाच्या तब्येतीची चौकशी केली. हेमाच्या शरिरात विषाचा अंश देखील नाही.. तणावामुळे तिला चक्‍कर आली असं डॉक्टरांनी सांगितल्यावर हेमाच विषबाधा प्रकरणावर उतारा देऊ शकेल याची खात्री भोसलेंना पटली. डॉक्टर आणि भोसले साहेबांचे बोलणे झाले. हेमाला डिस्चार्ज देऊन चौकशीसाठी ताब्यात घ्यायचे ठरले. साध्या वेषात हेमावर लक्ष ठेवून असलेली सोनम आणि योगेशने हॉस्पिटलमधून हेमाला थेट पोलिस ठाण्यात आणले. घरात घडलेल्या प्रसंगाचं दडपण हेमाच्या चेहर्‍यावर स्पष्ट जाणवत होतं. 

साहेबांच्या इशार्‍यानंतर योगेशने हेमापुढे ज्युसचा ग्लास धरला. परंतु, हेमाने मानेने नकार दिला. ‘तुमच्या वाईटावर कोण असेल? जेवणात विष कोणी टाकलं असेल?’ भोसलेंनी थेट हेमाला प्रश्‍न केला. ‘सायेब काय माहीत..काय सांगू तुम्हाला..’ हेमाचं उत्तर ऐकून पुढचं सगळे मार्गच बंद झाल्यासारखे भोसलेंना वाटलं. पण हार मानणार ते भोसले नाही.. ‘जेवण तुम्हीच चौघी वाढत होता ना.. मग तुम्हाला माहीत पाहिजे’ भोसलेंनी आवाज चढविला. पण हेमाचा चेहरा तसाच निर्विकार आणि पुन्हा तेच उत्तर. हेमाला बाजूच्या रूममध्ये घेऊन जा..साहेबांनी सांगताच सोनम आणि योगेश पुढे आले. हेमाला बाजूच्या खोलीत बसवून योगेश पुन्हा साहेबांच्या पुढ्यात आला. ‘साहेब माझा डाऊट हेमावर आहे.’ 

योगेश ठामपणे बोलला.‘ कशावरून वाटतंय..’भोसलेंनी विचारले. ‘साहेब हॉस्पिटलपासून हेमाच्या बरोबर आहे. जेवणात टाकलेल्या विषाचा तो उग्र वास नाकात बसलाय.. तोच वास हेमाच्या साडीला येतोय.’ योगेशच्या बोलण्यात दम होता...खरं होतं. हेमा आपल्या केबिनमध्ये आली तेव्हा आपल्याला हा वास जाणवला होता याची भोसलेंना आठवण झाली. 

हेमाला बोलती करायची तर पोलिस खात्याचं चौदावं रत्न दाखवावं लागेल. भोसले साहेबांनी महिला पोलिस सोनमवर हेमाला बोलती करायची जबाबदारी सोपवली. अर्ध्या तासानी घामाघूम सोनम साहेबांपुढे आली. ‘साहेब पट्ट्यांनी मारली.. पण हू का चू नाही. मी विष टाकलं नाही असं सांगतेय.’ सोनमने दमलेल्या आवाजात सांगितलं. ‘ठिक आहे माझ्या केबिनमध्ये आणा बघतो मी.’ अशी ऑर्डर भोसलेंनी दिली.

‘हेमा शेवटची संधी देतोय खरं सांग.. तुझ्या साडीला पण फोरेटचा वास येतोय..’पण भोसलेचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं करून हेमा निमूट होती. तेवढ्यात वीज चमकावी असा भास हेमाला झाला.. भोसलेंचा पोलिसी रपाटा कानाखाली बसल्याने हेमाला काही क्षण बधीर झाल्यासारखे वाटले. सणसणीत कानाखाली बसताच हेमा ताळ्यावर आली. ‘हो विष मीच टाकलं होतं वरणात.पण मला सर्वांना नव्हतं मारायचं ...माझी सासू- सासरे आणि नणंद यांना ठार मारायचं होतं. पण घडलं भलतंच.’ हेमाच्या तोंडून विषासारखं जहाल सत्य बाहेर पडत होतं. ‘सासरी नेहमी 

घालून पाडून बोलायचे. मी काळी असल्याने सगळेच द्वेष करायचे. आमच्या पोराला शोभत नाही. त्याला दुसरी बायको बघू, असे म्हणायचे. साहेब पहिल्या नवर्‍याने सोडलं. आता दुसरा संसार मोडला, तर माझं आयुष्य बरबाद होणार त्यापेक्षा यांचं आयुष्य बरबाद करायचं ठरविलं...’ हेमाला बोलताना दम लागला तशी थांबली. ‘अगं पण एवढ्या लोकांच्या जेवणात विष घातलंस.. ते पण अशा कार्यक्रमात..’ सोनम बोलली.

‘पोरांना नव्हतं मारायचं.. बाहेरची लोकं जेवल्यावर घरातील जेवायला बसली. तेव्हा वरणात विष टाकलं. पण नणंदेची पोरं परत जेवायला बसली... मी वरणाचं पातेलं लाथ मारून सांडायचा प्रयत्न केला तेव्हा सासू भडकली. डोळे फूटलेत का अशी बोलली. त्यामुळे संशय नको म्हणून तेच वरण वाढलं’ हेमा डोळ्यात एक अश्रूचा टिपूस न आणता सांगत होती. 

‘सायेब सर्व असह्य झालं होतं रोजरोज रंगावरून टोमणे म्हणून संपवायचं ठरवलं पण जीव गेला पोरांचा...’ हेमा बोलताना थांबली. बदला घेण्यासाठी हेमानं घेतलेल्या निर्णयाने लेकुरवाळी कुटुंबं उद्ध्वस्त झाली होती. पण त्याचा पश्‍चाताप हेमाच्या चेहर्‍यावर नव्हता.