Mon, Nov 20, 2017 17:21होमपेज › Crime Diary › क्राईम डायरी : जीवघेणी थट्टा!

क्राईम डायरी : जीवघेणी थट्टा!

Published On: Nov 08 2017 1:28AM | Last Updated: Nov 07 2017 9:03PM

बुकमार्क करा

शिराळा-कराड रोडपासून आजूबाजूला असलेल्या डोंगर-टेकड्यांमध्ये आजूबाजूच्या गावातील गुराखी नेहमी आपापली गुरे चारायला जातात. मूळातच शिराळा तालुका म्हणजे मुसळधार पाऊस कोसळणारे कोकणचे प्रवेशद्वारच. त्यामुळे वर्षातील बाराही महिने बघेल तिकडे हिरवळच हिरवळ. त्यामुळे गुराख्यांना आपली गुरे चारण्यासाठी फारशी यातायात करावी लागत नाही. कोणत्याही दरी-खोर्‍यात जनावरे सोडून दिली की दिवसभर बघायला नको. मात्र 2006 साली राज्यभर पावसाने ओढ दिल्यामुळे शिराळा तालुक्यालाही त्याची झळ बसली होती. नेहमी हिरवागार असणारा परिसर उजाड, बोडका वाटत होता. त्यामुळे गुराख्यांनाही चार्‍यासाठी गुरांसोबत बरीच पायपीट करावी लागत होती. असेच एके दिवशी ही गुराखी मंडळी चार्‍याच्या शोधात दर्‍या-खोर्‍या धुंडाळत असताना मुख्य रस्त्यापासून बर्‍याच अंतरावर एका खोल दरीवजा ओढ्यात एका तरुणाचा पार सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. लागलीच ही खबर शिराळा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता मृतदेहाजवळ एक बंद पडलेला मोबाईल मिळून आला. चार-पाच दिवसांपूर्वी सदर तरुणाचा मृत्यू झाल्याचे एकूण परिस्थितीवरून दिसून येत होते. मात्र घटनास्थळी हा घातपात की अपघात याचा कोणताही थांगपत्ता लागेल असा मागमूस दिसून येत नव्हता.

त्यावळी प्रताप पोमण हे शिराळा पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून काम पाहत होते. त्यांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीने या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. मृतदेहाच्या छायाचित्रावरून सदरचा विजय नामक तरुण याच भागातल्या एका खेडेगावातील असून गेल्या जवळपास चार-पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समजले, मात्र त्यापुढे काही माहिती मिळत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी तपासाच्या दृष्टीने विजयचा घटनास्थळी मिळून आलेला पण बंद पडलेला मोबाईल चालू केला आणि थट्टा-मस्करीतून झालेल्या एका खून प्रकरणाचा पर्दापाश झाला.

मयत विजय आणि त्याच गावातील प्रकाश हे दोघे अगदी लहानपणापासून जिगरी दोस्त होते. कुठे जाईल तिकडे दोघे नेहमी सोबत असायचे. तर या प्रकाशच्या आईने प्रकाश लहान असतानाच पहिल्या नवर्‍याला सोडून दुसरा घरोबा केला होता. गावातील सगळ्यांनाच त्याबद्दल माहिती होते त्यामुळे  फारसे कुणी त्याबद्दल बोलत नव्हते. मात्र अलिकडे काही दिवसांपासून विजय हा प्रकाशच्या सावत्र बापावरून आणि त्याच्या आईवरून नेहमी त्याची चेष्टा करायचा. लहानपणापासूनचा मित्र असल्यामुळे प्रकाश ही चेष्टा हसण्यावारी सोडून द्यायचा. मात्र अलिकडे विजयची चेष्टा मर्यादा सोडून निघाली होती. भररस्त्यात, बाजारपेठेत, चारचौघात, कुठे दिसेल तिथे विजय प्रकाशची आई आणि त्याच्या सावत्र बापावरून त्याची जिव्हारी लागणारी थट्टा करायचा. त्यामुळे लोकही फिदीफिदी हसायचे पण प्रकाशच्या अंगाचा मात्र तिळपापड व्हायचा. त्याने याबाबतीत अनेकवेळा विजयला सांगून पाहिले, अशी जीवघेणी थट्टा न करण्याबद्दल विनंत्या केल्या, पण काही फरक पडत नव्हता. विजयच्या या थट्टेमुळे दिवसेंदिवस प्रकाशचा मात्र गावात चांगलाच पाणउतारा होऊ लागला. बाकीचे लोकही याच कारणावरून त्याची थट्टा करू लागले. मग मात्र प्रकाशने एकदाचा या प्रकरणाचा कायमचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्णय घेतला.
प्रकाश आणि विजय हे लहानपणापासून एकमेकांचे मित्र असल्यामुळे एकमेकांची उणीदुणी आणि खाचाखोड्या दोघांनाही माहीत होत्या. तारुण्यात पदार्पण केल्यापासून विजयला काही प्रमाणात मदिरा आणि मदिराक्षीचा चांगलाच नाद लागला होता. त्यामुळे अधूनमधून तो कराड, सांगली आणि कोल्हापूर भागात जाऊन चांगलीच अय्याशी करून यायचा. मदिरा आणि मदिराक्षी या विजयच्या ‘विक पॉईंट’ बनल्या होत्या आणि प्रकाशला याची पुरती जाणीव होती. त्यामुळे नेमक्या याच संधीचा फायदा घेऊन प्रकाशने विजयचा काटा काढायचा निर्णय घेतला.

त्या दिवसात त्या भागात रस्त्याचे काम चालू होते आणि या रस्त्याच्या कामावर असलेल्या एका मजूर तरुणीत विजयचा जीव अडकला होता आणि नेमक्या या संधीचा फायदा प्रकाशने उचलला. त्याने विजय आणि त्या तरुणीचे सूत जूळवून देण्याची विजयला हमी दिली. एके दिवशी रात्री आठ वाजल्यानंतर प्रकाशने विजयला त्याच्या मोबाईलवर फोन करून संबंधित तरुणी घटनास्थळी भेटायला येणार असल्याची थाप मारली. त्यामुळे मदिराक्षीचे वारे कानात शिरलेला विजय नेहमीपेक्षा दोन पेग जास्त मारूनच प्रकाशने बोलावलेल्या ठिकाणी हजर झाला. गप्पांच्या ओघात प्रकाशने आणखी दोन-चार पेग विजयला पाजले, त्यामुळे तो आपली शुद्धबुद्ध हरवून बसला. ही संधी साधून प्रकाशने सोबत आणलेल्या लोखंडी रॉडच्या एका घणाघाती घावातच विजयचा खेळ संपवला आणि मुख्य रस्त्यापासून बर्‍याच अंतरावर असलेल्या एका दरीत त्याचा मृतदेह टाकून दिला.

हे ठिकाण डोंगर-दर्‍यात दूरवर असल्याने आणि लोकांची त्या भागात फारशी वर्दळ नसल्याने घटना घडल्यानंतर चार-पाच दिवस उलटून गेल्यानंतरही कुणाला त्याचा थांगपत्ता लागला नव्हता. त्या भागात गेलेल्या गुराख्यांनी हा प्रकार समोर आणल्यानंतरही आरोपीचा मागमूस लागत नव्हता. मात्र मयत विजयच्या मोबाईलच्या कॉल डिटेल्सवरून अखेर पोलिस खर्‍या आरोपीपर्यंत पोहोचलेच.आज प्रकाश कारागृहात आपल्या गुन्ह्याची फळे भोगत आहे. जीवघेण्या थट्टेमुळे जिगरी दोस्त असलेल्या एकाचा जीव गेला तर दुसरा आयुष्यातून उठला. त्यामुळे थट्टा-मस्करी करताना प्रत्येकानेच किमान काही तारतम्य बाळगायची गरज आहे.

- विठ्ठल नलवडे, शिराळा