Wed, Jun 19, 2019 08:35होमपेज › Crime Diary › बक्कल नंबर 

बक्कल नंबर 

Published On: Oct 10 2018 1:27AM | Last Updated: Oct 09 2018 8:06PMडी. एच. पाटील, म्हाकवे (कोल्हापूर)

समुद्राला भरतीमुळे उधाण आले होते. तर याच समुद्रात असणार्‍या तटबंदीला या लाटा जोरदार धडकत होत्या. धडकणार्‍या लाटा झेलत किल्‍ला कित्येक वर्षं उभा होता. अनेक परकीय आक्रमणाचा सामना करत छत्रपती शिवरायांना या किल्ल्याने बळ दिले होते. समुद्र खवळल्यामुळे पाण्यातील होड्या हेलकावे खात काठावर येत होेत्या. समोरच्या गलबतांमधून दिसणारा अथांग सागर मनाला मोहून टाकत होता.  रमजानही आज नमाज पठण झाल्यानंतर समुद्रावर फिरण्यासाठी आला होता. आज शुक्रवार असल्याने रात्री बिर्याणीचा बेत असल्याने तो  समुद्रावर आला होता. रमजान तसा दुकानात काम करत होता. मात्र दर शुक्रवारी तो सुट्टी घेत होता. 

खवळलेला समुद्र पाहत तो  धब्यावर आला. तिथे पाणीपुरी खाऊन तो  बंदराकडे वळला. आज बंदरावर फारशी गर्दी नव्हती. तो पाण्यात पाय सोडून बसला अन् अचानक त्याचे लक्ष समोरच्या बाजूला गेले. कुणाचे तरी एक प्रेत तरंगत येत होते. तो पुढे झाला अन् त्याला धक्‍काच बसला. एका तरुणीचे प्रेत होते. तो गडबडला. त्याने इकडे तिकडे पाहिले. जवळपास कोणीच नव्हते. सूर्य आता मावळतीकडे झुकला होता. रमजानने 100 नंबर डायल केला.

घटनेची खबर मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. एव्हाना अंधार पडू लागला होता. रमजानने समोरच दिसणार्‍या मशिदीकडे पाहिले अन् ‘हे परवर दिगार, किसकी लडकी है? उनके माँ-बापपर क्या बितेगी’ असे म्हणत त्याने अल्‍लाकडे दुवा मागितली. डोक्यावरील टोपी काढून त्याने खिशात ठेवली. पंचनामा पूर्ण झाला. प्रथमदर्शनी गळा आवळून मारल्याचे स्पष्टपणे दिसते होते. दोन दिवसांपासून मृतदेह पाण्यात असल्याने जलचरांनी मृतदेहाचा बराचसा भाग खावून टाकला होता. त्यामुळे चेहर्‍याची ओळख पटून येत नव्हती.

पंचनामा करून पोलिसांनी जवळपास ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. अंधार पडू लागल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

दुसर्‍या दिवशी पुन्हा घटनास्थळी पोलिसांनी चौकशी सुरू केली. समुद्रावर फिरायला येणार्‍यांना मयत तरुणीचे फोटो दाखविण्यात येत होते. मात्र ओळख पटत नव्हती. बंदरावर पोलिस फिरत होते. मात्र तरुणीची ओळख पटत नव्हती. मयत तरुणीविषयी कोणत्याच पोलिस स्टेशनला  बेपत्ता फिर्याद नोंद नव्हती. त्यामुळे मयत तरुणीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना आटापिटा करावा लागत होता. पोलिसांनी प्रेत सापडले तिथे पुन्हा चौकशी सुरू केली. बारकाईने पोलिस तपास करत होते. सोबत रमजानलाही घेतले होते. ओहोटी असल्याने वाळूमध्ये काही सापडते का, ते पोलिस तपासून पाहत होते. मात्र दोन तास तपास करूनही  पोलिसांना हाती काहीच लागत नव्हते. मात्र वाळूमध्ये एक ओळखपत्रासारखे काहीतरी सापडले. पोलिसांनी ते उलटून-पालटून पाहिले. पण घाणीमुळे ते ओळखूनच येत नव्हते. कसलीतरी चकती दिसत होती. त्यावरती चार अक्षरी इंग्रजी नंबर होता.  

पोलिसांनी ती बेल्टची चकती स्टेशनला आणली. आकडे तपासणार्‍यांना बोलावण्यात आले. त्यांनी नंबर एक दोनवेळा पाहिला अन् हा पोलिसांचाच बक्‍कल नंबर असल्याचे सांगितले. पोलिस मुख्यालयात हा नंबर पाठविण्यात आला. पोलिसांना नंबरची माहिती मिळाली. तो नंबर होता मारुती जगदाळे यांचा. पोलिसांनी ताबडतोब वायरलेसवरून मेसेज पाठवून जगदाळेला बोलावले. जगदाळे नजीकच्या जिल्ह्यातील ग्रामीण पोलिस स्टेशनला कार्यरत होता. 

संदेश मिळताच तो पोलिस स्टेशनला हजर झाला. त्याने आपला नंबर ओळखला. मात्र, ‘आपण  पत्नीसह गेलो असताना समुद्रात अंघोळ करताना बेल्ट  तुटल्याचे’ मान्य केले. मयत तरुणीचा फोटो दाखवताच त्याने ‘आपण या तरुणीस ओळखत नसल्याचे’ सांगितले. पोलिसांनी जगदाळेला चौकशी करून सोडून दिले. मात्र त्याची संपूर्ण माहिती खबर्‍यांना काढण्यास सांगण्यात आली.

खबर्‍याने जगदाळेची पूर्ण माहिती पोलिसांना दिली. त्याची सासरवाडी, त्याचे गाव असा सगळा तपशील पोलिसांना मिळाला. त्याच्या मूळगावी पोलिसांनी चौकशी केली. त्याच्या आईने मयत तरुणीचा फोटो ओळखला अन् पोलिसही चक्रावले. ती त्याची मेहुणी होती. जगदाळे ओळखत नाही, मग त्याच्या आईने कसे ओळखले? हा संभ्रम पोलिसांना पडला. त्यामुळे हवालदार जगदाळे काहीतरी लपवतोय, हे पोलिसांनी जाणले.

मयत तरुणी हेमलता ही मारुती जगदाळेची मेहुणी होती. त्यामुळे त्याची सासरवाडी बदलमुख येथे पोलिसांनी चौकशी केली. हेमलता ही मारुती जगदाळेकडे राहण्यास होती. शिवाय तिचा मृत्यू झाल्याचेही तिथे माहीत नव्हते. याचा अर्थ मारुती जगदाळे काहीतरी लपवत होता. त्यामुळे हेमलताच्या खुनाशी जगदाळेचा काहीतरी संबंध असावा असा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी चौकशीसाठी हवालदार जगदाळेला ताब्यात घेतले. पाहुणचार दिला. मात्र त्याने ‘आपण हेमलताचा खून केला नसल्याचे’ सांगितले. जगदाळेची पत्नी स्वरूपा हिलाही ताब्यात घेण्यात आले. मात्र  तीही ‘हेमलता त्यादिवशी गावाकडे जातो म्हणून गेली. आम्हाला वाटले, ती गावी असेल म्हणून आम्ही चौकशी केली नाही.’
पोलिसांनी बदलमुखकडे जाणार्‍या बसस्थानकावर चौकशी केली. तेथील दुकानदार, हॉटेल चालक, भिकारी यांच्याकडे चौकशी केली. मात्र हेमलताला बसस्थानकावर कोणीच पाहिलेे नव्हते.
मग पोलिसांनी शक्‍कल लढवत या दाम्पत्याला असणार्‍या सोनिया नावाच्या मुलगीला चौकशीला बोलावले.

‘...साहेब, पप्पा अन् मम्मी सारखे भांडत असत. मावशीवरून मम्मी सारखी भांडत होती. त्यादिवशी मम्मी बाजारात गेली होती अन् घरी आल्यानंतर पुन्हा भांडण झाले. मात्र, मी पुन्हा शाळेतून आले त्यावेळी मावशी गावी गेली होती.’ सोनियाला घरी पाठविण्यात आले.

पोलिसांनी पुन्हा हवालदार जगदाळेवर थर्ड ड्रिग्रीचा वापर केला. मार असहाय्य झाल्याने त्याने तोंड उघडले, ‘होय साहेब, मीच मारले हेमलताला. मला तिला मारायचे नव्हते, स्वरूपाला मारायचे होते. मात्र नेमकी हेमलता मध्ये आली अन् तिचा जीव गेला.’

‘शाळा शिकण्यासाठी हेमलता आमच्याकडे आली. दोन चार वर्षात ती चांगली रुळली. ती अगदी बिनधास्त वागायची. एकदा दुपारी ती मोबाईलवर  अश्‍लील द‍ृश्ये पाहत असताना मी तिला पाहिले अन् माझाही तोल गेला. आमच्यात संबंध निर्माण झाले. एके दिवशी दुपारी अचानक नको त्या अवस्थेत होतो, ते स्वरूपाने पाहिले अन् मग घरात वाद सुरू झाला. मला  हेमलता आवडत होती. हेमलता व मी लग्‍न करणार होतो. परंतु स्वरूपाचा त्याला विरोध होता. त्यामुळे  आम्ही स्वरूपालाच संपवण्याचा निर्णय घेतला. त्यादिवशी दुपारी आमच्या बेडरूमध्ये स्वरूपा झोपली असे समजून मी तिच्या तोंडावर उशी टाकून दाबून धरली. तिची हालचाल बंद  झाल्यानंतर पांघरूण काढले अन् मला धक्‍काच बसला. ती हेमलता होती. स्वरूपाला हे कळताच तिची विल्हेवाट लावण्याचा सल्‍ला तिने दिला. रात्रीच्या वेळी मी तिला समुद्रात फेकली. त्या गडबडीत बक्‍कल तुटून पाण्यात पडलं. मला वाटले, समुद्रात कुठे कुणाला  सापडतंय? म्हणून मी निवांत होतो. पण मी सापडलो...’ पोलिसांनी जगदाळेला अटक केली. नंतर त्याला शिक्षा झाली.