Wed, Oct 24, 2018 02:14होमपेज › Crime Diary › बेगडी प्रेमाचा शेवट

बेगडी प्रेमाचा शेवट

Published On: Dec 06 2017 12:14AM | Last Updated: Dec 06 2017 12:13AM

बुकमार्क करा

प्रिया आपल्या घरापासून काही अंतरावर राहत असलेल्या रूपेशच्या प्रेमात पडली. घरची परिस्थिती बर्‍यापैकी असल्यामुळे रूपेश हा तसा लाडात वाढलेला तरुण; पण प्रियाची घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. दोघांच्या प्रेमाच्या गुजगोष्टी सुरू झाल्या. रूपेशने प्रियाला लग्न करण्याचा तगादा लावला होता. प्रियाने रूपेशची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण प्रेमाने वेडापिसा झालेल्या रूपेशने एकेदिवशी  तिच्या घरात जाऊन प्रियावर अ‍ॅसिड हल्ला केला व तो पसार झाला. शेवटी पोलिसांनी रूपेशचा ठावठिकाणा शोधून त्यांच्या मुसक्या आवळल्या.

रूपेश -प्रिया हे दोघेही एकाच गावात राहणारे होते. दोघांच्या वयात तसे 4-5 वर्षांचे अंतर. दोघेही एकाच महाविद्यालयात शिकणारे. ऐन तारुण्यात पदार्पण केलेल्या प्रियावर रूपेश भाळला. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर महाविद्यालयाला, क्लासला दांडी मारून दोघेही सर्वांची नजर चुकवून प्रेमाच्या गुजगोष्टी करीत फिरू लागले. प्रेमाच्या आणाभाका सुरू झाल्या. रूपेशच्या शिक्षणाकडे पूर्णतः दुर्लक्ष होऊ लागल्याने त्याच्या घरातील मंडळींनी त्याला दम भरण्याचा प्रयत्न केला. तरीही त्याच्यात सुधारणा झाली नाही. तर प्रिया हुशार विद्यार्थिनी म्हणून सर्वांना परिचित होती.

एकेदिवशी रात्री आठच्या सुमारास रूपेश प्रियाच्या घरी गेला. त्यावेळी प्रियाचे आईवडील घरगुती कार्यक्रमानिमित्त नातेवाईकांकडे गेले होते. घरी प्रियाची विवाहित बहीण, बहिणीचे पती, त्यांची दोन लहान मुले होती. प्रिया अभ्यासात मग्न होती. रूपेशने घरात आल्याबरोबर ‘तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाहीस, हे आताच सांग,’ असे प्रियाला सांगून धमकावू लागला. यावेळी प्रियाची बहीण-भाऊजी तेथेच दुसर्‍या खोलीत होते. रूपेश अभ्यासाच्या निमित्ताने प्रियाकडे आला असावा, असे समजून त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. रूपेशच्या लग्नाच्या मागणीला प्रियाने साफ नकार दिला. ‘माझे तुझ्यावर प्रेम असले तरी आपण पहिले शिक्षण पूर्ण करू त्यानंतर लग्नाचे ठरवू. मी तुला हेच पहिल्यापासून समजावून सागतेय. आता तू येथून निघून जा. आणि मला पुन्हा घरात भेटण्यासाठी येऊ नकोस,’ असे म्हणताच, रूपेशच्या रागाचा पारा चढला.

घरातून येतेवेळी त्याने सोबत एक पिशवी आणली होती. त्या पिशवीत अ‍ॅसिडची डबी होती. रूपेशने क्षणाचाही विलंब न लावता प्रियाच्या चेहर्‍यावर अ‍ॅसिड फेकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रसंगावधान राखून प्रियाने आपले दोन्ही हात चेहर्‍यावर ठेवल्याने तिच्या हाताला व घरातील दोघा लहान मुलांच्या अंगाला जखम झाली. रुपेशचेही दोन्ही हात भाजले. गोंधळ उडाल्याने आणि आपण सापडू या धास्तीने त्याने प्रियाच्या घरातून पळ काढला. प्रियाने झाल्या प्रकाराची माहिती घरच्यांसह वडिलांना दिली. तिच्या वडिलांनी तडक नजीकच्या कांदिवली पोलिस ठाण्यात धाव घेऊन रूपेशविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक माने यांनी रूपेशचे छायाचित्र मागवून घेऊन अन्य पोलिस ठाण्यांनाही तपास व चौकशीसाठी सहकार्याचे आवाहन केले.

घटनेनंतर आठ-दहा दिवस रूपेश गावातून पसार झाला होता. तर घरच्यांनी तपासात हात वर केले होते. अशा वेळी वरिष्ठांच्या आदेशानुसार तपास करताना मोबाईलच्या लोकेशनवरून रूपेश परराज्यात एका शहरात असल्याचे स्पष्ट झाले. पो. नि. माने यांनी त्या शहरात सहकार्‍यांसमवेत तळ ठोकला. सुरुवातीला तो सहज सापडेल असे वाटत होते; पण तो वेळोवेळी हुलकावणी देत होता.  दोन-तीन दिवसांनी एक युवक शहरात वेगळे नाव धारण करून राहत असल्याची व त्याच्या दोन्ही हाताला जखम असल्याची माहिती माने साहेबांना मिळाली. त्यांनी रूपेशबाबत मिळविलेल्या माहितीनुसार पाळत ठेवल्यानंतर एकेदिवशी सायंकाळच्या सुमारास माने यांच्यासह साध्या वेशातील विशेष पथकास दोन्ही हाताला जखम झालेला रूपेश आढळून आला. त्याची विचारपूस करताच त्याने घरातील भांडणामुळे मी घर सोडून आल्याचे सांगितले; पण हाताला झालेल्या जखमेविषयी त्याने गुप्तता पाळली. मग त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. प्रियाच्या नातेवाईकांचे जाबजबाब नोंदवून घेतल्यानंतर रूपेशची कारागृहात रवानगी करण्यात आली. आणि रूपेशच्या बेगडी प्रेमाचा असा पर्दाफाश झाला.

सचिन ढोले, सांगली