Sun, Jun 07, 2020 02:22होमपेज › Crime Diary › घरसफाईच्या नावाखाली  महिलांचा दोन तासात डल्ला

घरसफाईच्या नावाखाली  महिलांचा दोन तासात डल्ला

Published On: May 15 2019 1:47AM | Last Updated: May 15 2019 1:47AM
गणेश शिंदे, मुंबई

मुंबई मायानगरीत गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसाला दोन-तीन तासांसाठी म्हणून काम करणार्‍या तात्पुरत्या घरसफाई महिलांकडून उच्चभू्र वस्तीमध्ये चोरी झाल्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून वाढल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी गेल्या महिन्यात सांताक्रुझ पोलिसांनी घरसफाईच्या नावाखाली काम करणार्‍या दोन महिलांना पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून लाखो रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. सध्या संशयित महिला भायखळा कारागृहात आहेत. 

दरम्यान, मुंबईत गेल्या आठ-दहा वर्षांपासून अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. पण; अनेक उच्चभू्र कुटुंबे बदनामीच्या भीतीने तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. याचा गैरफायदा आरोपी घेतात. त्यामुळे कोणत्याही कुटुंबाबाबत असा प्रकार घडला असेल तर, त्या कुटुंबीयांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

मुंबईची महानगर आणि मायानगरी म्हणून ओळख आहे. साधारणत : एक कोटी 25 लाख लोकसंख्या असलेल्या या मोठ्या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेदिवस वाढत असल्याचे दिसून येते. याचे कारण म्हणजे रोजगारांसाठी याठिकाणी येणारे परप्रांतीय होय. मुंबईतील ओशिवरा, जुहू, वर्सोवा, अंबोली, पवई, सांताक्रुझ हा परिसर उच्चभू्र आहे. उच्चभू्र वस्तीतील अनेक कुटुंबे कायमपणे घरसफाई कामगार ठेवतात. पण; सुट्टीनिमित्त घरसफाईगार गावी गेला तर ते कुटुंब (तात्पुरते कामासाठी) घराची साफसफाई करण्यासाठी दुसर्‍या एखाद्या महिलेला ठेवते, अशी येथील पद्धत आहे. हेच हेरून घरसफाई करणार्‍या अशा  महिला दोन-तीन तासातच घरसफाईच्या बहाण्याने मौल्यवान हिरेजडित दागिन्यासह सोने-चांदी दागिन्यांचे ऐवज चोरून नेतात.

दरम्यान, जानेवारी 2018 मध्ये सांताकु्रझमधील जैन मंदिर सोसायटी परिसरात झालेल्या चोरीचा पर्दापाश सांताक्रुझ पोलिसांनी केला. या प्रकरणी मानखुर्द परिसरातून गेल्या महिन्यातून एका महिलेला अटक केली. वनिता असे  तिचे नाव आहे. या प्रकरणाचा कौशल्याने तपास करून संशयित वनिताला अटक केली. तिच्याकडून तब्बल पाच लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये अडीच लाखाचे हिरेचे ब्रेसलेट, 80 हजारांची हिरेजडित अंगठी, दोन लाखांचे सोन्याचे रुद्राक्ष यांचा समावेश आहे. तिने या वर्षात म्हणजे  एक जानेवारी ते 20 मार्च 2019 या कालावधीत जूहू, वर्सोवा, अंबोली व ओशिवरा या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारचे चार गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले. सध्या ती भायखळा कारागृहात आहे. 

ही कारवाई सहायक पोलिस आयुक्त दत्तात्रय बरगुडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीनिवास कोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनोद गावकर, सहायक पोलिस निरीक्षक सुरेश वळवी व त्यांच्या पथकाने केली.

वनिताबरोबर नर्मदाही जाळ्यात; पोलिसांचे एका दगडात दोन पक्षी

संशयित वनिता गायकवाड प्रकरणाचा तपास करताना सांताकु्रझ पोलिसांना अशा प्रकारच्या गुन्ह्यात वॉन्टेड असलेली संशयित नर्मदा ऊर्फ आशा ऊर्फ संगीता ऊर्फ दीपा शोएब खान ही मिळून आली. वनिताच्या मोबाईलमध्ये तिचा नंबर व व्हॉट्स अ‍ॅपवर छायाचित्र होते. तिचे रेखाचित्र तयार करून गुन्हे कार्यप्रणाली शाखेकडे पोलिसांनी पाठविले. नर्मदेची वनिताबरोबर कारागृहात ओळख झाली होती. तिच्याकडून  आठ लाख 91 हजार रुपयांच्या मुद्देमालांपेकी सहा लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी केला. सध्या ती भायखळा कारागृहात आहे.

नर्मदा ही मूळ औरंगाबादची असून तिचा प्रेमविवाह झाला आहे. तिचे सासर उत्तरप्रदेश येथे आहे. ती कधीतरी सासरी तर कधी मुंबईत राहते. तिच्या व्हॉट्स अ‍ॅपवर मुलाचे छायाचित्र होते. या छायाचित्रात मुलाच्या ड्रेसवर शाळेचे नाव होते. त्याचा आधार घेऊन पोलिसांनी उत्तरप्रदेशातून नर्मदेला अटक केली. नर्मदेने 12 मार्च 2019 ला श्री निकेतन इमारत नॉर्थ अव्हेन्यू रोड येथे चोरी केली होती. या प्रकरणी सांताकु्रझ पोलिसात गुन्हा नोंद आहे.

वनितावर 40 च्यावर गुन्हे...

वनिता पूर्वी कायमस्वरूपी घरकाम करत पण; तिला पैशाची गरज असल्याने तिने पहिल्यांदा चोरी केली. ही चोरी पचनी पडल्यानंतर तिने दुसरी चोरी केली; मात्र ती पोलिसांना सापडली. 2010 पासून ते आजपर्यंत तिच्यावर खार, बांद्रा, सांताकु्रझ, भायखळा, जुहू, वर्सोवा, मरिन ड्राईव्ह, डी.एन. नगर, ओशिवरा, ताडदेव या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून सर्वोधिक जुहू पोलिसात नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चोरीनंतर घरे बदलली...

एखाद्या ठिकाणी मोठा हात मारल्यावर (दोन ते पाच लाखांपर्यंतची चोरी केल्यानतर) वनिता भाड्याने राहत असलेले घर तत्काळ बदलत असे. तिने आतापर्यंत मानखुर्द, लालबाई कपाऊंड, वाशी, देवनार, अंबरनाथ, लोखंडी मार्ग चेंबूर या परिसरात घरे बदलली असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

...तर तुम्ही जीवाशी खेळणार

गतवर्षी खार पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका घरकाम नोकराने वयोवृद्ध दाम्पत्याचा खून केला होता. त्या दाम्पत्याची मुले ही परदेशात राहतात.कोणतीही पार्श्‍वभूमी न बघता या घरकाम नोकराला दाम्पत्याने ठेवून घेतले होते. या खूनप्रकरणी खार पोलिसांनी अखेर त्याच्या मुसक्या आवळून याचा छडा लावला.

याचबरोबर दीड महिन्यापूर्वी जुहू परिसरात मालकाला गुंगीचे औषध देऊन घरकाम नोकराने चोरी करून मुद्देमाल घेऊन पसार झाला होता. त्यामुळे कोणत्याही कुटुंबाने घरकाम नोकर ठेवताना त्याचे छायाचित्र, आधारकार्ड  घेऊन ते पोलिसांकडे द्यावे. पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट (पीसीसी) मध्ये त्याचा यापूर्वीचा इतिहास समजणार आहे. त्यामुळे जे कुटुंब घरसफाई कामगार ठेवणार असतील त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.