Thu, Apr 25, 2019 11:29होमपेज › Crime Diary › प्रियकराच्या हत्येचं शूटिंग करणारी ‘व्हिडीओ क्‍वीन’

प्रियकराच्या हत्येचं शूटिंग करणारी ‘व्हिडीओ क्‍वीन’

Published On: Aug 08 2018 1:52AM | Last Updated: Aug 07 2018 6:55PMफरिदा शेख ही 21 वर्षांची तरुणी ‘व्हिडीओ क्‍वीन’ म्हणून सोशल मीडियावर ओळखली जात होती. तिनं आपल्याच प्रियकराच्या हत्येचा कट रचला होता.  आणि  तो पूर्णही केला . सापडल्यानंतर  बचावासाठी ‘त्याच्या हत्येशी आपला काहीही संबंध नसल्याचं’ फरिदानं आपल्या जबानीत म्हटलं होतं...तरीही मरणाच्या दारात असलेल्या ‘रझाकचा व्हिडीओ तयार करण्याच्या कृतीची आपल्याला आता लाज वाटते,’ असंही तिनं शेवटी म्हटलं होतं. पण तिनं वापरलेली ‘पंगा’ घेण्याची भाषा कोर्टाला खटकली होती आणि त्यामुळं कोर्टानं ती अपमानकारक ठरवली. तिला शेवटी दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली.  सोशल मीडियाचं असलेलं नको तितकं वेड तिच्या अधोगतीला कारणीभूत ठरलं...काय होतं हे सगळं प्रकरण?

ही घटना आहे डिसेंबर 2016 मधल्या त्या रविवारची. लंडनच्या नॉर्थ अ‍ॅक्टन परिसरात फरिदा तिचा प्रियकर रझाक अहमदसह  बोलत थांबली होती. अचानक रझाकवर एक माथेफिरूने अचानक हल्ला चढवला. दोघांच्यात झटापट झाली. पण त्या माथेफिरूने आपल्याकडील चाकू काढून काही कळायच्या आत रझाकवर अगणित वार केले आणि त्यानंतर तो तिथून पळून गेला. त्यानं रझाकच्या छातीवर अनेक खोलवर एवढे वार केले, की  त्याचा एकदा चाकू त्याच्या छातीच्या आरपारही गेला. या सगळ्यात फरिदा मात्र जागच्याजागी निश्‍चल उभी होती.

रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेला रझाक जेव्हा अखेरचे श्वास घेत होता, तेव्हा त्याला मदत करायचं सोडून फरिदानं आपल्या खिशातून आपला मोबाईल काढला आणि अखेरच्या घटका मोजणार्‍या रझाकचं व्हिडीओ शूटिंग करायला सुरू केलं. दरम्यान, तिच्या आणि त्याच्या मदतीला जेव्हा काही लोक गेले तेव्हा त्याही परिस्थितीत मदत करण्याऐवजी अथवा मदत मागण्याऐवजी ती फोनवरून शूटिंग करण्यात आणि फोनवर कुणाशीतरी बोलण्यात मग्न होती. त्यातल्याच एकानं फातिमाला विचारलं की, ‘तुझा इरादा काय आहे? मरणाच्या दारात असलेल्या या माणसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकणार आहेस का?’ पण ती अवाक्षरही बोलली नाही. फक्‍त शूटिंग करत राहिली.

काही वेळानं तिचा प्रियकर निपचित पडला. मग तिनं आपलं शूटिंग बंद केलं आणि शेजारच्या एका टॅक्सीला हात केला. ती थांबली. त्यात बसून ती तेथून निघून गेली. काही वेळाने तिथे पोलिस आले. आणि रझाकला हॉस्पिटलला घेऊन गेले. पण त्याची  प्राणज्योत अगोदरच मालवली होती. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. काही तासानंतर फरिदानं रझाकचा ‘तो’ व्हिडीओ आणि एक मेसेज लिहून आपल्या आवडत्या सोशल मीडियाच्या साईटवर टाकला आणि त्याच्या खाली हे लिहिलं, ‘माझ्याशी पंगा घ्याल तर अशी गत करून घ्याल.’

‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाला आणि जगभर एकच खळबळ उडाली. कारण ‘तो’ प्रत्यक्ष मृत्यूच्या घटनेचा व्हिडीओ होता. त्या व्हिडीओसोबत तिनं आपले आणखी काही फोटोही शेअर केले. ज्यामध्ये ती ‘काही घडलेच नाही’ अशा आविर्भावात दिसत होती. त्यानंतर तिने शेवटी आपल्या घरच्यांच्याबरोबरचा एक ‘फॅमिली’ व्हिडीओ शेअर केला. 

हे सर्व अवघ्या काही तासांत घडलेलं होतं. नंतर तपास करणार्‍या पोलिसांकडून फरिदाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. पण ‘मी नव्हेच,’ अशा पद्धतीने फरिदाने तपास करणार्‍या पोलिसांसमोर तांडव केले. काही काळात या घटनेशी संबंधित फोटो आणि व्हिडीओही त्या साईटवरून कोणाकडूनतरी हटवण्यात आले होते. पण तरीही तिला अटक करण्यात आली. सोशल मीडियावरील तिचे फोटो आणि ‘त्या’ व्हिडीओबद्दल ती अवाक्षरही काढत नव्हती. पण ‘मी गुन्हेगार नाही’ असाच तिचा सूर होता. तपास सुरू झाला आणि एकाएका गोष्टींवर प्रकाश पडत गेला.

पोलिसांकडील सर्वच पुरावे हे फरिदाच्या विरुद्ध भक्कम पुरावे म्हणून कोर्टात सादर केले होते. त्यापैकी एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होतं की, तिचा प्रियकर रझाक तिच्यासमोर रक्‍ताच्या थारोळ्यात पडला होता तरीही फरिदा  मदत मागण्याऐवजी किंवा रझाकला मदत करण्याऐवजी एका फोनमध्ये  त्याच्या मरणासन्न अवस्थेचे शूटिंग करत होती आणि त्याचवेळी दुसर्‍या फोनवर कोणाशीतरी बोलत होती. कोण होता तो? हे  कोणालाही माहीत नव्हतं. या सगळ्या घटनाक्रमात  तो माथेफिरू कोण होता, तो कुठे गेला हे कोणालाही माहीत नव्हतं. आणि पोलिसांनाही सापडत नव्हतं. पण तो सापडला तर या सगळ्यावर लख्ख प्रकाश पडणार होता.

...आणि शेवटी यावर प्रकाश पडला. पोलिसांच्या तपासात उजेडात आलं की तो माथेफिरू नसून तो तिचा दुसरा प्रियकर रमजान खान होता. आणि ती त्याच्याशीच बोलत होती. तोच रझाकचा मारेकरी होता. रझाकवर हल्ला करून रमजान तिथून पसार झाला होता. पण फोनवर फरिदाशी सतत संपर्कात होता.

कोर्टात केस उभी राहिली तेव्हा कोर्टात तिच्याबाबतीत दोन्हीबाजूने अनेक मुद्दे मांडले गेले. फरिदाला मोठा मानसिक धक्‍का बसला होता त्यामुळे तिने तो व्हिडीओ मदत मागण्यासाठीच तयार केला होता आणि सोशल मीडियावर टाकला होता, असा दावा फरिदाच्या वकिलानं केला.

तसेच फरिदाला तिच्या आयुष्यातली लहानसहान प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट करण्याचं व्यसन लागलं होतं, असंही तिच्या वकिलांनी कोर्टात मांडलं. ज्यांचं जगणं हेच सोशल मीडिया आहे, अशा तरुणांपैकीच फरिदा एक आहे; ते त्या माध्यमाप्रमाणे स्वत:त बदल घडवतात. ही स्थिती फार चांगली नसते. हा एक मानसिक आजार आहे, हेही त्यांनी नमूद केलं.

तर सरकारी वकिलांनी मांडलेल्या मुद्द्यांमध्ये काही बाबी लक्षवेधी होत्या. त्यापैकीच एका प्रत्यक्षदर्शींच्या मते, लोक त्याठिकाणी जेव्हा पोहोचले त्यावेळी फरिदा मदत मागत नव्हती तर तडफडणार्‍याचा व्हिडीओ तयार करत होती. तिला त्यापासून हटकले तेव्हा ती न बोलता ते शूटिंग पूर्ण करण्याचा आटापिटा करत होती. तसेच कोणाशीतरी होणार्‍या घडामोडी संदर्भात सातत्याने बोलत होती. 

पोलिसांनी केलेल्या तपासात आणखी काही धक्‍कादायक माहिती उजेडात आली. ती म्हणजे जेव्हा पोलिसांनी तिचे ई-मेल्स, सोशल मीडियावरचे अकाऊंट तपासले तेव्हा त्यांना समजलं की फरिदा ‘चॅटिंग कॉर्नर’वर लोकप्रिय बाला होती आणि स्वत:ला ‘व्हिडीओ क्‍वीन’ म्हणवून घेत असे. तिने पोस्ट केलेला व्हिडीओ आणि ‘तो’ संदेश काही तासानंतर कोणाकडूनतरी काढून टाकण्यात आला होता. मात्र, दरम्यानच्या काळात फरिदाच्याच एका मित्रानं त्या संदेशाची कॉपी केली होती आणि पोलिस आवाहनानंतर ती त्यांना दिली होती. तेच नंतर कोर्टात पुरावा म्हणून सादर करण्यात आले. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करण्याबरोबरच तिनं वापरलेली ‘पंगा’ घेण्याची भाषा कोर्टाला खटकली आणि कोर्टानं ती अपमानकारक ठरवली.

सुनावणीतनंतर हेही स्पष्ट झालं की, मारेकरी रमजान खान हा रझाकची हत्या करणार आहे हे फरिदाला आधीपासूनच ठाऊक होतं. आणि असं करण्याला तिची पूर्ण संमतीही होती. ज्यावेळी रझाकवर त्यानं हल्ला केला तेव्हा त्यांच्यात काही काळ झटापटही झाली होती. त्यानंतर रझाकवर वार करून रमजान पळाला. तो आजतागायत फरारच आहे. त्यानं नुकतंच विशीत पदार्पण केलं आहे.पोलिस त्याचा शोध घेऊ शकलेले नाहीत. तो देश सोडून गेला असावा असा त्यांचा अंदाज आहे.

रझाक आणि फरिदा दोघांचंही प्रेमप्रकरण अनेक वर्षं सुरू होतं. पण आताआता त्यांच्यात काहीतरी बिनंसलं होतं. रझाकच्या अगोदरही फरिदाचा एक प्रियकर होता. रमजान खानही तिच्या प्रेमात पडला होता आणि तिला सोशल मीडियावर फॉलोही करत होता. तो तिचं सगळे संदेश पहायचा. रझाक आणि रमजान यांच्यात फरिदावरून त्यापूर्वीही एकदा वादावादी झाली होती.

सरकारी पक्षानं युक्‍तिवाद करताना कोर्टात सांगितलं की, फरिदाच्या डोळ्यादेखत हत्या झाली होती पण तरीही तिने आरडाओरडा न करता अथवा कोणाकडे याचना करत मदत मागितली नाही आणि स्वत:ही त्याठिकाणी कसलीही मदत केली नाही. काही वेळानं तिनं एक भाड्याची टॅक्सी थांबवली आणि ती तिथून निघून गेली. त्या रात्री घरी परतल्यावर फरिदानं जो शेवटचा व्हिडीओ घरी बनवला होता आणि सोशल मीडियावर पोस्ट केला होता, त्यात ती आपल्या कुटुंबीयांशी हसतखेळत बोलताना दिसत होती. तो व्हिडीओ पाहिल्यावर असं वाटत होतं की, काही तासांपूर्वी डोळ्यादेखत एक हत्या पाहून आलेल्या घटनेचा लवलेशही फरिदाच्या चेहर्‍यावर दिसत नव्हता. शेवटी तिचं म्हणणं ऐकून घेतल्यावर कोर्टानं तिला हत्या करणार्‍याइतकंच जबाबदार धरून दोषी ठरवलं. आणि सोशल मीडियाचं असलेलं नको तितकं वेड तिच्या अधोगतीला कारणीभूत ठरलं. 


मारुती वि. पाटील, कोल्हापूर