होमपेज › Crime Diary › गुन्हेगारांची अनाकलनीय मानसिकता

गुन्हेगारांची अनाकलनीय मानसिकता

Last Updated: Jan 29 2020 2:03AM
श्रीकांत देवळे

कारागृहात गुन्हेगारांना वेगवेगळे ठेवले जावे आणि त्यांच्या मनस्थितीचा अभ्यास करून, त्यांना गुन्हेगारीस प्रवृत्त करणारी अशी कोणती घटना घडली; याचा शोध घेतला जावा, असे मनोविश्लेषकांचे मत आहे. गुन्हेगारी जगताकडे त्यांची पावले कोणत्या कारणांमुळे वळली, त्यांच्या मनात ती इच्छा कशी आली, याचा अभ्यास ते महत्त्वाचा मानतात. गुन्हेगारांना सुधारण्याचा प्रयत्न करायलाच हवा; मात्र कोणत्याही गुन्हेगारावर पूर्णपणे विश्वास ठेवू नये, असेही ते सुचवितात.

ब्रिटनमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेने संपूर्ण देशाला विस्मयचकित करून टाकले. अन्य देशांप्रमाणेच ब्रिटनमध्येही अनेक गुन्हेगार आणि दहशतवादी विविध कारागृहांमध्ये शिक्षा भोगत आहेत. दहशतवाद्यांची आणि गुन्हेगारांची मानसिकता बदलावी आणि त्यायोगे त्यांनी पुढील आयुष्यात आणखी गुन्हे करू नयेत, यासाठी ब्रिटन सरकार पूर्वीपासूनच प्रयत्न करीत आहे. गुन्हेगारांना मानसतज्ज्ञांच्या मदतीने चांगल्या मार्गावर आणण्यासाठी भारतातील कारागृहांमध्येही नेहमी प्रयत्न केले जातात. या मंडळींनी अखेर गुन्हा कोणत्या कारणांमुळे केला, याचा शोध घेण्याचा प्रयत्न मानसतज्ज्ञ अहोरात्र करीत असतात. महिनोन्महिने चौकशी आणि अभ्यास केल्यानंतर ते एकाच निष्कर्षाप्रत पोहोचतात. गुन्हेगारांच्या आयुष्यात अशी एखादी घटना घडलेली असते, जी त्यांना गुन्हेगारी विश्वाकडे जाण्यास प्रवृत्त करते. काही घटनांमध्ये असेही पाहायला मिळते, की गंभीर गुन्ह्याबद्दल शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगाराची प्रेयसी त्याला सोडून गेलेली असते आणि म्हणून त्यांच्या हातून गुन्हा घडतो. अनेकांची मनस्थिती इतकी बिघडते की मित्र कोण आणि शत्रू कोण? हेही त्यांना समजेनासे होते.

ब्रिटनमध्ये अनेक देशांमधून पकडलेल्या दहशतवाद्यांना पोलिसांनी एकाच कारागृहात ठेवले. हे गुन्हेगार, दहशतवादी जर तुरुंगात एकमेकांशी बोलत राहिले, तर तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर कदाचित ते गुन्ह्यांपासून दूर राहतील, अशी आशा पोलिसांना होती. अनेक गुन्हेगारांच्या बाबतीत हे खरेही ठरले. अनेक वर्षे कारागृहात राहिल्यानंतर काही दहशतवादी सुधारले, परंतु बहुतांश व्यक्तींच्या बाबतीत तसे घडू शकले नाही. अनुभवातून असे पाहायला मिळाले, की जेव्हा या दहशतवाद्यांना आणि गंभीर गुन्हे करणार्‍यांना एकत्र तुरुंगात ठेवण्यात आले; तेव्हा एकमेकांच्या कहाण्या ऐकून ते अधिक भयंकर गुन्हेगार बनले. आश्चर्याची बाब अशी, की या गंभीर गुन्हेगारांकडे मोबाईल फोन कुठून आले, हे कुणालाच कळले नाही. या मोबाईल फोनच्या माध्यमातून तुरुंगाच्या बाहेर असलेल्या आपल्या साथीदारांच्या ते कायम संपर्कात राहिले आणि आपल्या तथाकथित शत्रूंचा नायनाट करीत राहिले.

भारतातही अनेक वृत्तपत्रांमध्ये नुकतीच अशी बातमी प्रसिद्ध झाली होती, की देशातील अनेक कारागृहांत कैद्यांजवळ मोबाईल फोन आढळून आले. पोलिस आणि कारागृह प्रशासनासाठी ही धक्कादायक बाब ठरली. असे घडलेच कसे, हा प्रश्न सर्वांनाच पडला. एकतर कारागृहातील कर्मचार्‍यांची गुन्हेगारांशी मिलीभगत असली पाहिजे किंवा कैद्यांना भोजन किंवा अन्य साहित्य पुरविणारी एखादी यंत्रणा त्यांच्यापर्यंत मोबाईल फोन पोहोचवत असली पाहिजे. या मोबाईल फोनचा वापर करून ते कारागृहाबाहेरील अशा व्यक्तींचा काटा काढतात, ज्यांना ते आपला शत्रू समजतात. 

भारतातही ब्रिटनप्रमाणेच देशाच्या कानाकोपर्‍यातून आणलेल्या कैद्यांच्या बैठका अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली होतात. देशाच्या विविध भागांमधून आणण्यात आलेल्या कैद्यांचा अशा बैठकांमध्ये ‘ब्रेन वॉश’ केला जातो. निरपराध लोकांची हत्या करून त्यांच्या हाती काहीच लागले नाही, ही बाब धर्मगुरू त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात. उलट त्यामुळे त्यांचीच बदनामी झाली आणि त्यांच्या कुटुंबातील लोकही बदनाम झाले, हे त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला जातो. दहशतवादी आणि गुन्हेगारांचा वर्षानुवर्षे अशा प्रकारे ‘ब्रेन वॉश’ केला जातो. काही कालावधीसाठी या कैद्यांना तुरुंगाबाहेर सोडले तर त्यांच्या हातून गुन्हा घडणार नाही, अशी शक्यता तुरुंगातील अधिकार्‍यांना त्यामुळे वाटू लागते. 

तथापि, सरडा ज्याप्रमाणे आपले रंग बदलतो त्याप्रमाणे हे गुन्हेगार काही वर्षे कारागृहात अधिकार्‍यांसमोर आपल्याभोवती एक विशिष्ट आवरण चढवून वावरतात आणि अधिकार्‍यांना फसवत राहतात. त्यांच्या डोळ्यात धूळफेक करत राहतात. अशीच घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. एक गंभीर गुन्हेगार कारागृहात देवाचे नामस्मरण करीत राहिला आणि येशूचे गोडवे गात राहिला. कारागृहातील अधिकार्‍यांचा त्यामुळे त्याच्यावर विश्वास बसला. हा विश्वास दिवसेंदिवस वाढतच राहिला. गुन्हा करणे निंदनीय असून, तुरुंगातून बाहेर पडल्यावर समाजसेवा करावी, असा सल्लाही तो इतर कैद्यांना देत असे. 

त्याची शांत आणि सभ्य वर्तणूक पाहून कारागृह प्रशासनाने त्याच्या शिक्षेत कपात केली. तसे पाहायला गेल्यास या कैद्याला 14 वर्षांसाठी तुरुंगात पाठविण्यात आले होते. परंतु दोन वर्षांतच कारागृहातील अधिकार्‍यांनी त्याला बाहेर जाऊन समाजसेवा करण्याची परवानगी दिली. मिस्टर खान नावाचा हा गुन्हेगार त्याच्या साथीदारांमध्ये खूपच लोकप्रिय होता. काही काळासाठी का होईना, त्याला कारागृहाबाहेर सोडण्यात आले, तर तो गुन्हेगारीकडे किंवा दहशतवादाकडे वळणार नाही; उलट तो समाजात एक आदर्श उभा करेल, अशी अधिकार्‍यांची खात्री पटली होती. कारागृहातील अधिकार्‍यांना त्याने वचन दिले होते, की बाहेर पडताच तो एक स्वयंसेवी संस्था स्थापन करेल आणि दहशतवाद तसेच गुन्हेगारी किती वाईट आहे, हे संपूर्ण देशाला पटवून सांगेल.

परंतु त्याला कारागृहातून बाहेर सोडताच भलतेच घडले. त्याने आपल्या दोन्ही हातात दोन चाकू लपवून ठेवले होते. ते त्याने कुठून मिळविले हे कुणालाच कळले नाही. तुरुंगाबाहेर जे अधिकारी सुटलेल्या कैद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवतात, त्यातील दोन अधिकार्‍यांना या खानने चाकूने भोसकून ठार केले. त्याच्या या कृत्यामुळे सर्वजण अवाक झाले आणि अखेरीस पोलिसांनी गोळी घालून त्याला ठार केले. बोरिश जॉन्सन हे पंतप्रधानपदाच्या निवडणुकीसाठी प्रचार करीत असतानाच ही घटना घडली. टीव्हीवर या घटनेचे वार्तांकन पाहून त्यांनी घोषित करून टाकले, की पंतप्रधानपदी निवड झालीच तर दहशतवाद्यांना मुदतीपूर्वी तुरुंगातून बाहेर सोडले जाऊ नये, असा निर्णय मी सर्वप्रथम घेईन. तुरुंगात त्यांनी ईश्वराचे कितीही नामस्मरण केले तरी त्यांच्यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे. जो गुन्हेगार कारागृहात अत्यंत साधासुधा आणि मवाळ दिसत होता, त्याने इतका गंभीर गुन्हा कारागृहाबाहेर पडताच का केला? याचा शोध घ्यायला मानसतज्ज्ञांनी लगेच सुरुवात केली. त्याच्याकडे मोबाईल फोन आणि दोन चाकू आले कुठून? हाही संशोधनाचाच विषय ठरला.

बोरिश जॉन्सन आता पंतप्रधान बनले आहेत. ते आता कारागृह सुधारणांसाठी व्यापक कार्यक्रम राबवतील आणि दहशतवादी, गुन्हेगार आणखी गुन्हे करण्यास प्रवृत्त होणार नाहीत याची तजवीज करतील, अशी अपेक्षा आहे. सर्व अनुभवी मानसतज्ज्ञांचे असे मत आहे, की कारागृहात गुन्हेगारांना वेगवेगळे ठेवले जावे आणि त्यांच्या मनस्थितीचा अभ्यास करून, त्यांना गुन्हेगारीस प्रवृत्त करणारी अशी कोणती घटना घडली, याचा शोध घेतला जावा. गुन्हेगारी जगताकडे त्यांची पावले कोणत्या कारणांमुळे वळली, त्यांच्या मनात ती इच्छा कशी आली, याचा अभ्यास ते महत्त्वाचा मानतात. गुन्हेगारांना सुधारण्याचा प्रयत्न करायलाच हवा; मात्र कोणत्याही गुन्हेगारावर पूर्णपणे विश्वास ठेवू नये, असेही ते सुचवितात.