Sat, Sep 21, 2019 06:58होमपेज › Crime Diary › कोण होता जाकीर मुसा?

कोण होता जाकीर मुसा?

Published On: Jun 12 2019 1:16AM | Last Updated: Jun 12 2019 1:16AM
मिलिंद सोलापूरकर

बुरहान वणीनंतर काश्मीर खोर्‍यात मुसा दहशतवादाचा आयकॉन बनलेला आणि काश्मिरी तरुणांमध्ये लोकप्रिय झालेला जाकीर मुसा याला नुकतेच कंठस्नान घालण्यात आले. हे दहशतवादाविरोधी कारवाईतील एक मोठे यश म्हणावे लागेल. या यशाचे परिणाम दूरगामी असतील. मुसा हा काश्मीरमधील इस्लामी जिहादचा एक मोठा चेहरा होता.  मुसाचा खोर्‍यातील प्रभाव किती मोठा याचे उदाहरण म्हणजे गेल्या दोन वर्षांमध्ये दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेतही जाकिर मुसा जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. आतापर्यंत कोणत्याही दहशतवाद्यांची इतकी पोच नव्हती. 

निवडणूक निकाल आणि त्या संदर्भातील घटनांमुळे काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी पार पाडलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या कामगिरीकडे माध्यमांचे दुर्लक्ष झाले असे म्हणावे लागेल. वास्तविक जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये जाकिर मुसासारखा कडवा दहशतवादी मारले जाणे म्हणजे दहशतवादाविरोधी कारवाईतील महत्त्वाचे यश आहे. त्याचे परिणाम दूरगामी होणार आहेत. बुरहान वणी मारल्या गेल्यानंतर जम्मू खोर्‍यात मुसा हा दहशतवाद्यांचा आयकॉन झाला होता. बुरहान वणीसोबतच तो हिज्बुल मुजाहिदीन संघटनेत सहकारी म्हणून कार्यरत होता. 11 जुलै 2016 रोजी  बुरहानला कंठस्नान घातले गेले आणि तेव्हापासून मुसा हा दहशतवाद्यांचा पोस्टरबॉय बनला. हळूहळू तोच तरुणांसमोर मॉडेल ठरला होता. मुसाचा खोर्‍यातील प्रभाव किती मोठा याचे उदाहरण म्हणजे गेल्या दोन वर्षांमध्ये दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेतही जाकिर मुसा जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. आतापर्यंत कोणत्याही दहशतवाद्यांची इतकी पोच नव्हती. 

बुरहान वणीला मारल्यानंतरही काश्मीरमध्ये त्याचा प्रभाव काही काळ टिकून होता. त्याच्या नावाचा जयजययकार होत असे. मुसा त्याच्याही पुढे होता. त्याच्यावर 15 लाखांचे इनाम होेते. जिहादसाठी दहशतवादाला इस्लामी कट्टरतेचे रूप देऊन त्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी गेल्या दीड वर्षात मुसाने मोठी भूमिका निभावली होती. त्यामुळेच बुरहान मारला गेल्यानंतर काश्मीर खोर्‍यात ज्याप्रकारे अशांतता निर्माण झाली होती तशीच परिस्थिती आताही निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा दलांनी मुसाच्या मृत्यूच्या बातमीला फारशी प्रसिद्धी दिली नव्हती. या दरम्यान खोर्‍यातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. मात्र, मुसाला ज्या गावात सुरक्षा दलांनी घेरले होते त्यांना या गोष्टीची खबर लागताच तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही लोक घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरले. जागोजागी पोलिसांशी संघर्ष निर्माण होऊ लागला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने त्राल आणि त्याच्या जवळपासच्या परिसरात निर्बंध लावत सावधानतेचा इशारा दिला. पुढील आदेश येईपर्यंत शाळा महाविद्यालये बंद ठेवली गेली. तसेच काश्मीरमधील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली. संवेदनशील परिसरात पोलिस आणि केंद्रीय सशस्त्र दलांच्या अतिरिक्‍त तुकड्या तैनात करण्यात आल्या. 

गेल्या काही महिन्यांमध्ये काश्मीरमध्ये ज्याप्रकारे लष्करी कारवाया झाल्या आहेत त्या लक्षात घेता खूप जास्त हिंसाचार होण्याची शक्यता नव्हती. पण तरीही सावधगिरीनेच पावले उचलली गेली. हुरियत नेत्यांच्या विरोधात कारवाई करण्यापासून ते जमात ए इस्लामी जम्मू काश्मीर या संघटनेवर निर्बंध तसेच त्यातील प्रमुख नेत्यांना अटक केल्यामुळे पूर्वीसारखा भडका उडणे शक्य नाही; अन्यथा मुसाच्या मृत्यूनंतर आतापर्यंत काश्मीरमध्ये मृत्यूने थैमान घातले असते. पण असे काहीच घडले नाही. त्यानंतर सर्व निर्बंध हटवण्यात आले. काश्मीरच्या वातावरणात आलेले हे परिवर्तन खूप काही गोष्टी सांगते आहे. 

जाकिर मुसाने स्वातंत्र्य किंवा काश्मीर पाकिस्तानमध्ये सामील करण्याच्या मागणीऐवजी इस्लामी राजवट स्थापन करण्याची सरळ सरळ घोषणा केली होती. मुसाची अंसार-उल-गजवात-ए-हिंद ही संघटना अल कायदाशी जोडलेली होती. बुरहान वाणीच्या मृत्यूनंतर मुसाला हिंजबुल मुजाहिदीनचे कमांडर नियुक्‍त करण्यात आले होते. पण  काही महिन्यांत तो हिजबुलमधील प्रमुख दहशतवादी म्हणून तो गणला जाऊ लागला. बुरहानच्या गटातील जिवंत पकडल्या गेलेल्या तारिक पंडित या दहशतवाद्याने पोलिसांना जी माहिती दिली त्यानुसार जाकिर मुसाचे विचार हिजबुलच्या विचारांशी जुळत नाहीत. सप्टेंबर 2015 मध्ये बुरहान वणीने आपल्या व्हिडीओमध्ये हिजबुलच्या धोरणांविरोधात जात काश्मीरमध्ये खिलाफत म्हणजेच स्वातंत्र्यासाठी लढण्याची भाषा केली होती, तो मुसाचा त्याच्यावरील प्रभाव होता. मुसानेच वणीला खलिफा राजलटीच्या विचासरणीचा परिचय करून दिली होता.  

बुरहानच्या मृत्यूनंतर काही काळातच मुसाने हिजबुलच्या नेतृत्वांतर्गत हुरियत कॉन्फरन्ससह विविध फुटीरतावादी संघटनांना खुले आव्हान दिले होते.पाकिस्तान स्वतःच्या फायद्यासाठी काश्मिरी जनतेला स्वातंत्र्याचे स्वप्न दाखवून त्यांच्या हाती बंदूक देतो आहे पण आमचे उद्दिष्ट आहे ते इथे फक्‍त निजमा आणि इस्लाम यांचे राज्य आहे. राष्ट्रवाद इस्लामविरोधी आहे. जर हुरियतचे नेते सुधारले नाहीत तर त्यांना लाल चौकात लटकून दिले जाईल, असे मुसा म्हणाला होता. जाकिरचे हे वक्‍तव्य काश्मीरमध्ये दहशतवाद प्रायोजित करणार्‍या ढाच्याला खुले आव्हान होतेच; परंतु इतरही दहशतवादी संघटना याच्याविरोधात होत्या. 

एप्रिल 2017 मध्ये मुसाने स्वतःच घोषणा करून हिजबुलला सोडचिठ्ठी दिली आणि जुलै 2017 मध्ये त्याने अंसार उल गजवात - ए- हिंद नावाची संघटना सुरू केली. मुसाचे जे काही फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले ते अल कायदाच्या कमांडरकडून प्रसिद्ध केल्या जाणार्‍या व्हिडीओ फोटोंप्रमाणे होते. काश्मीरमधील दहशतवादाचा हा वेगळाच मार्ग झाला.

मुसा काश्मीरमधील दहशतवादाचा सद्यपरिस्थितीतील महत्त्वाचा चेहरा होता. मे 2017 मध्ये त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये त्याने इस्लामिक शरियानुसार खलिफा राज्य स्थापन करण्याची भाषा केली होती. आपल्या व्हिडीओ संदेशात मुसा म्हणतो की, काश्मीर हा काही स्वातंत्र्यलढ्याचा भाग नाही तर तो इस्लामिक लढा आहे. मुसाने काश्मीरमध्ये गेल्या 30 वर्षांपासून सुरू असलेल्या दहशतवादी हिंसेला पहिल्यांदाच खुलेपणाने धार्मिक विचारधारा असल्याचे सांगून हा संघर्ष वैश्‍विक जिहादशी जोडला. त्यामुळे दहशतवादाचा रोखच बदलून गेला. हुरियत किंवा इतर दहशतवाद्यांमध्ये असलेल्या संघर्षाला इस्लामची प्रेरणा नव्हती असे नाही. पाकिस्तानही इस्लामच्या नावावरच तर दहशतवाद्यांची भरती करतो आहे. पाकिस्तानातही गजवात-ए-हिंद च्या गप्पा होत राहतात. पण काश्मीरच्या बाबतीत कोणतीही संघटना खुलेआम विस्तृत आणि स्वच्छपणे धर्मांध विचारधारेसह समोर आलेली नाही. हुरियतचा पाकिस्तान समर्थक नेतेदेखील धर्मोच्या नावानेच काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याच्या बाता करतात; पण त्यावर ते उदारमतवादाचे पांघरूण घालतात. इस्लामच मुख्य प्रेरणा असली तरीही ती स्पष्टपणे घोषित न करण्याची रणनीती ते अवलंबतात. 

जाकिर मुसाने या सर्वांच्या चेहर्‍यावरील मुखवटा फाडण्याचा प्रयत्न केला आणि खुलेआम काश्मीर हे इस्लामिक राज्यात परिवर्तित करण्याची घोषणा करून टाकली. त्यामुळेच मुसा हा पहिला असा दहशतवादी होता ज्याने काश्मीरमध्ये सुरू असलेल्या धर्मांध जिहादवर चढवलेल्या स्वातंत्र्याचा मुखवटा उतरवून स्वच्छ शब्दांत स्पष्ट केले की खोर्‍यात कोणीही स्वातंत्र्याच्या नावाखाली बंदूक हाती घेत नाही तर सर्वच जण इस्लामच्या नावाखाली शस्त्र हाती घेतात. काश्मीर तर गजवात - ए- हिंद चा दरवाजा आहे. त्यामुळेच तरुणांचा प्रतिसाद मिळतो आहे. अबू दुजाना, आरिफ ललहारीसारखे कुख्यात दहशतवादीही मुसासमवेत गेले होते. त्यामुळे साहाजिकच मुसाच्या वर्तणुकीमुळे पाकिस्तानही वैतागला होता आणि हुरियतही. कारण त्यांना जगासमोर काश्मीरच्या नावाने गळा काढण्यात अडचणी येऊ लागल्या होत्या. या सर्व पार्श्‍वभूमीवर मुसाचा खात्मा किती महत्त्वाचा होता हे लक्षात येते. 

मुसासारखा दहशतवादी यापूर्वी खोर्‍यात झालेला नाही. अर्थात मरण्यापूर्वी त्याने काश्मीर खोर्‍यात जे बीज रोवले ते धोकादायक होते. या वर्षात आतापर्यंत 100 दहशतवादी मारले गेले आहेत. उर्वरित दहशतवाद्यांचाही सफाया होईल आणि धार्मिक कट्टरतावाद कमी करता येईल.