Thu, Apr 25, 2019 11:37होमपेज › Crime Diary › कहाणी शिरविरहित धडाची!

कहाणी शिरविरहित धडाची!

Published On: Aug 08 2018 1:52AM | Last Updated: Aug 07 2018 6:48PMपहाटे पहाटे ती बातमी सार्‍या शहरात पसरली.  तो मृतदेह तसा दिसतच होता भेसूर आणि भयानक! एखाद्या धारदार शस्त्राने शिर तोडून फक्‍त धड टाकण्यात आले होते. पाहणार्‍यांच्या हृदयाचा ठोका चुकत होता. अवतीभवती रक्‍ताचे थारोळे पसरलेले... त्यात पडलेला भयानक दिसणारा हा मृतदेह... सगळे अंगावर काटा आणणारे होते... 

पहाटे पहाटे मोबाईल खणखणल्याने  फौजदार नितीन देसाई यांनी त्रासलेल्या आवाजातच फोन उचलला.  मात्र मोबाईलवर कॉन्स्टेबलचा निरोप घेताच त्यांची झोप पळून गेली. अवघ्या काही मिनिटांत आवरून त्यांनी जिप्सी बाहेर काढली. भरधाव वेगाने ते घटनास्थळी आले. खाडकन्  सॅल्यूट करत तो कॉन्स्टेबल पुढे आला. शाळेच्या व्हरांड्यात पडलेले धड पाहताच क्षणभर देसाईदेखील चरकले. पटाशीसारख्या धारदार शस्त्राने शिर तोडून केवळ मृतदेह या ठिकाणी टाकण्यात आला होता. पडलेले धड, अंगावर शर्ट, फूल पँट. बाकी काही नाही. खिशात ओळख पटेल असे काही. मात्र त्यांचा पोलिसी मेंदू लगेच काम करू लागला. 

घटनास्थळी साकळलेले रक्‍ताचे डाग ही घटना काही तासांपूर्वी झाली असावी हे सांगत होते.  मात्र दुसरा  मागसूम या ठिकाणी नव्हता. लगेचच त्यांनी आपल्या ग्रुपला मृतदेह कॉटेज हॉस्पिटलमध्ये हलवायला सांगितला. घटनास्थळावरील जागेचा पंचनामा करून, अन्य सर्व सोपस्कार संपवून विचार करतच ते ठाण्यात परत आले. 

एव्हाना  शिर तोडून तरुणाचा खून केल्याच्या या घटनेची बातमी सर्वत्र पसरली होती. एखादी खुनाची घटना घडणे, आणि ती  देखील कमालीच्या थंडपणाने, शिर तोडून गेम करणे...!  खुन्याचा छडा लावणे पोलिसांसाठी एक आव्हानच ठरले होते. वरिष्ठांचे तर  सारखे फोन सुरू झाले होते.  त्यांना उत्तरे देता देता अधिकार्‍यांची  दमछाक होत होती. 

आता दुपारचे एक वाजत आले होते. सकाळपासून  काहीच खायला झाले नव्हते. बंगल्यावर फोन करून त्यांनी जेवणाचा डबा पोलिस ठाण्यातच पाठवून देण्याचा निरोप दिला. तीनच्या सुमारास  एस. पी. यांनी भेट देऊन या घटनेची माहिती घेतली. खुनी राहू दे पण किमान मृत तरुण तरी कोण? याचा अजून  छडा लागलेला नव्हता. घटनास्थळी काही झटापटीच्या खुणा सापडल्या नव्हत्या. याचा अर्थ काही अंतरावर बाजूला घटना घडली असावी आणि खून करून  मृतदेह ओढत आणून व्हरांड्यात टाकला असावा. हे लक्षात येताच जेवणाच्या डब्याची वाट न पाहता लगेचच त्यांनी गाडी बाहेर काढण्याची ऑर्डर दिली. 

दुसर्‍याच क्षणी त्यांची जीप पुन्हा त्या शाळेकडे भरधाव सोडली. त्यांनी पुन्हा एकदा घटनास्थळ गाठले.  काही खाणाखुणा आढळतात का हे पाहण्यास सुरुवात केली.  बाजूला काहीतरी ओढत आणल्याचे मातीत दिसत होते. त्याचा माग घेत घेत ते चालू लागले. शाळेभोवती असलेल्या तारेच्या कंपौंडची तार तोडून एके ठिकाणी वाट केली होती. तिथपर्यंत खुणा दिसत होत्या. याचा अर्थ या कंपौंडच्या तोडलेल्या तारेतून शाळेच्या आवारात हल्लेखोर आणि मृत तरुण आला असावा हे त्यांनी ताडले. थोडे बाजूला जात त्यांनी पाहिले तर त्या ठिकाणी  तळलेल्या चिकनचे काही तुकडे मिळाले. लगेच त्यांनी मोबाईलवरून डॉग स्क्‍वॉड बोलावून घेतले. काही वेळातच दाखल झालेल्या त्या तल्लख श्‍वानाला त्या चिकनच्या  तुकड्यांचा वास देताच ते श्‍वान सुसाट पळू लागले.  शाळेपासून काही अंतरावर असलेल्या चौकात खालच्या बाजूस ते उभे राहिले. पाठोपाठ काही शिपायांसह स्वत: फौजदार देसाई त्या ठिकाणी आले. श्‍वान उभे राहिलेल्या ठिकाणी रोज सायंकाळी चिकनचा गाडा रात्री उशिरापर्यंत उभा राहत असल्याची माहिती मिळाली.  थोडा क्ल्यू मिळताच त्यांना हायसे वाटले. रात्री त्या चिकनचा गाडा लावणार्‍याला बोलवून आणण्याचा आदेश देत त्यांनी आपला मोर्चा ठाण्याकडे वळविला.  

रात्री साडेसातच्या  सुमारास चिकनचा गाडीवाला पोलिस ठाण्यात आला.  त्याला विश्‍वासात घेत देसाई यांनी त्याच्याकडे विचारणा सुरू केली.  काहीसा घाबरलेला चिकनवाला नंतर मात्र बोलू लागला. रात्री साडेदहा-अकराच्या सुमारास दोघे पोरसवदा तरुण गाड्यावर चिकन खायला आले होते. आणि त्यांच्यात काहीतरी वाद सुरू होता, अशी त्याने माहिती दिली. लगेचच त्यांनी  विचारले की, ‘त्या तरुणांना तू ओळखू शकतोस का? तो ‘होय’ म्हणाला. आणि एवढ्यावरच न थांबता त्याने त्यातील एका तरुणाचे घरदेखील माहिती असल्याचे सांगितले. 

पोलिसांनी  लगेच त्या घराकडे मोर्चा वळविला. मात्र त्या  घराच्या दरवाजाला कुलूप होते. आता पुन्हा तपासाची चक्रे थांबली. मात्र याचवेळी शेजारच्याच एका घरातील एक तरुण गायब असल्याची त्यांना बातमी लागली. मनात संशयाची पाल चुकचुकत असतानाच त्यांनी त्या घरात चौकशी केली असता तो दुसरा तरुण देखील रात्रीपासून घरात न आल्याचे त्यांना कळाले. देसाई यांना यात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आला. त्यांनी लगेचच त्या तरुणाचा त्याचे नातेवाईक, मित्र यांच्या घरी शोध घेण्याचे आदेश सोडले.  

कितीही मोठा आणि चतुर गुन्हेगार असला तरी तो गुन्हा करताना काहीतरी चूक करतोच, एखादा माग सोडतोच, असे एक सूत्र मानले जाते. आपल्या घरापासून जवळच असलेल्या एका मित्राच्या घरी तो दुसरा तरुण रात्री अकराच्या सुमारास पोलिसांना सापडला.स्वत: देसाई यांनी चौकशी सुरू केली. दरडावून विचारणा करताच काही मिनिटांतच त्याने देसाईसाहेबांच्या  पायावर लोळणच घेतली. ‘साहेब, मला वाचवा, मीच त्याचा खून केला.’ 

काहीच कल्पना नसताना तरुणाने एकदम कबुली दिल्याने देसाई यांना  नवल वाटले.  मनाने पूर्णपणे खचलेला  तो तरुण जी माहिती देत होता त्याने फौजदार देसाई  देखील काहीकाळ हादरून गेले.  मृत तरुण(विजय) आणि हा तरुण (संजय) यांची खास मैत्री होती. दोघेही सेंट्रिंगचे काम करत होते. विजयचे वडील खूप वर्षांपूर्वी पोटापाण्यासाठी या शहरात आले होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले होते. आई, लहान भाऊ आणि एक बहीण यांच्यासह विजय राहत होता. सेंट्रिंगचे काम करत असतानाच त्याची संजयशी दोस्ती झाली होती. कामावरून आल्यावर रोज रात्री चिकन खायला जायचे आणि  क्‍वार्टर मारायची हा त्यांंचा रोजचा नेम बनला होता. काही दिवसांपूर्वी संजयने विजयकडून दोनशे रुपये उसने घेतले होते. आणि ते देण्यास तो टाळाटाळ करत असल्याचे लक्षात आल्याने  विजय काहीसा चिडून होता. 

तीन दिवसांपूर्वी विजयची आई आपल्या मूळ गावाकडे काही कामानिमित्त गेली होती. त्यादिवशी दोघे  नेहमीप्रमाणे चिकन खाण्यासाठी चौकातील त्या नेहमीच्या गाड्यावर गेले होते. खाता खाताच विजयने पुन्हा  पैशाचा विषय काढला. चिकन खाण्यात मग्न असलेल्या संजयचा पारा मात्र चांगलाच चढला. चिकन खाता खाताच त्याने ‘चल, शाळेच्या पटांगणाकडे जाऊन चिकन खाऊया, तेथेच तुझे पैसे  देतो’ असे सांगितले. बर्‍यापैकी क्‍वार्टरचा कैफ चढलेल्या विजयने त्याला होकार दिला. दोघेही शाळेकडे आले. पटांगणात बसलेल्या ठिकाणीच चिकन खाता खाताच विजयचा डोळा लागला. सारखा पैशाचा विषय काढतो म्हणून खवळलेल्या संजयने त्याचा काटा काढण्याचा निश्‍चय केला. कायम जवळ असलेल्या पटाशीने त्याने पूर्णपणे निद्राधीन झालेल्या विजयची चक्‍क मान तोडण्यास सुरुवात केली. काहीकाळ विजयने  धडपड केली, पण नंतर मात्र त्याची कायमचीच झोप लागली. 

हातातील पटाशीने संजयने विजयचे शिर तोडून बाजूला काढले. ते चिकनच्याच पिशवीत  ठेवले. मुंडकेविरहित धड त्याने ओढत शाळेच्या व्हरांड्यात आणून टाकले. मुंडके असलेली  पिशवी त्याने लांबच्या एका पडक्या विहिरीत टाकली आणि घरात येऊन निवांत झोपला.

सारा घटनाक्रम ऐकून फौजदार देसाई  मनोमन हादरून गेले. केवळ दोनशे रुपयांसाठी दोस्ताचे मुंडके तोडून खून करण्याच्या या खळबळजनक घटनेची अनेक दिवस चर्चा सुरू होती. पुढे कायद्याने आपले काम चोख बजावले. दोस्ताचा खून करणार्‍या संजयला जन्मठेप झाली.   

विवेक दाभोळे,सांगली