Sun, Jun 07, 2020 02:21होमपेज › Crime Diary › सीरियल किलर्स : जगभरातील...

सीरियल किलर्स : जगभरातील...

Published On: May 15 2019 1:47AM | Last Updated: May 22 2019 1:41AM
प्रसाद पाटील

अशाच एका सीरियल किलरची जगभरात चर्चा आहे. जर्मनीत तब्बल 300 रुग्णांचे हत्याकांड घडवून आणणारा नील होगल नामक या सीरियल किलरवर सध्या शंभराहून अधिक खूनप्रकरणी खटला सुरू आहे. सीरियल किलरनी आताच नाही, तर मागील दशकातही आपल्या क्रौर्याने जगाला हादरवून सोडले आहे. 

आंद्रेई शिकाटिलो नावाच्या सीरियल किलरने रशियात आपल्या विकृतीने दहशत पसरवली होती. अगोदर तो महिलांची हत्या करायचा, त्यानंतर त्यांच्या मृतदेहावर अत्याचार करायचा. माणुसकीला काळीमा फासणार्‍या या सीरियल किलरची कहाणी ही एखाद्या थरारपटापेक्षा कमी नाही. त्याचा जन्म 16 ऑक्टोबर 1936 रोजी सोव्हियत रशियाच्या युक्रेनमध्ये झाला होता. तो शिक्षक होता. मात्र लहानपणीच लैगिंक भावनांनी पिसाट झाला होता. परिणामी तो प्रत्येक वेळी लैगिंक संबंधांबाबतच विचार करायचा. त्याच्या डोक्यात अश्‍लीलतेचे भूत बसले होते. त्यासाठी तो वाट्टेल ते करत होता. या कारणांमुळेच महिलांचा खून करून आपल्या लैगिंक भावना शमवण्याची सवय त्याला लागली. रशियाच्या गुन्हेविषयक आकडेवारीनुसार आंद्रेई शिकाटिलोने 1978 ते 1990 दरम्यान 56 हून अधिक जणांची हत्या केली होती. त्याचे टार्गेट महिलाच असायचे. तो अंमली पदार्थाच्या आमिषाने महिलांना जाळ्यात ओढायचा आणि त्यांचा खून करायचा. त्याचे वेड महिलांच्या जीवावर उठले होते.

खून करण्यापूर्वी तो महिलांना विवस्त्र करायचा. त्यांचे हातपाय बांधायचा. त्यानंतर पीडित महिलेस समजेपर्यंत त्यांचा खून करायचा. त्यानंतर तो मृतदेहावर अत्याचार करायचा. मृतदेहाची विटंबना करण्याच्या त्याच्या या विकृत वेडाने पोलिसही हादरून जात असत. आंद्रेई शिकाटिलो याने पहिली हत्या 1978 रोजी एका 17 वर्षांच्या मुलीची केली होती. आपल्या घृणास्पद कारवायांनी रशियात कुप्रसिद्ध झाला होता. त्यामुळे त्याला बुचर ऑफ रोस्तोव्ह, दी रेड रीपर आणि दी रोस्तोव रीपर या नावाने देखील ओळखले जात होते. कायद्याचे हात लांब असतात आणि गुन्ह्याला पाय नसतात, असे म्हटले जाते. एक दिवस हा माथेफिरू पोलिसांच्या हाती लागलाच. पोलिसांनी 20 नोव्हेंबर 1990 रोजी आंद्रेई शिकाटिलोला पकडले. विशेष म्हणजे त्याने गुन्हा कबूल केला नाही. न्यायालयात त्याच्याविरुद्ध खटला सुरूच होता. अखेरीस14 फेब्रुवारी 1994 रोजी त्याला गुन्ह्याची शिक्षा मिळाली.  डोक्यात गोळी घालून त्याची दहशत संपविली गेली.

सीरियल किलरचा इतिहास इथेच थांबत नाही. जगात कोठे ना कोठे माथेफिरू रक्तरंजित घटना घडवून आणतात. कुख्यात माथेफिरूंचे कृत्य काळीमा फासणारे असतात. सध्या चर्चेत असणारा नील हा उत्तर जर्मनीतील ओल्डनबर्ग शहरातील पुरुष परिचारक जगातील सर्वात धोकादायक सीरियल किलरपैकी एक मानला जातो. 

नील होगल :  

या माथेफिरूवर औषध आणि इंजेक्शन देऊन 300 हून अधिक रुग्णांचा खून केल्याचा आरोप आहे. सध्या जर्मनीच्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगणार्‍या या सीरियल किलरच्या कृत्याचा रुग्णालय प्रशासनाला थांगपत्ताही नव्हता. नील होगलच्या रुग्णाच्या मृत्यूची संख्या पाहूनही कधी रुग्णालयास संशय आला नाही. तसेच त्याच्यापासून कधीही रुग्णांना दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला नाही. ओल्डनबर्गमध्ये काम करण्याअगोदर जेव्हा तो डेल्मनहॉस्टर्र् रुग्णालयात काम करत होता, तेव्हादेखील काही महिन्यातच ब्रिगिटे, हॅन्स, एस. ख्रिस्तोफर आणि जोसेफ जेडचा मृत्यू झाला होता. 42 वर्षांचा होगल हा जर्मनीच्या शांतता काळातील सर्वात धोकादायक सीरियल किलर मानला जातो. 

तपास अधिकार्‍यांच्या मते, 2000 पासून अटक होईपर्यंत 300 हून अधिक रुग्णांचा त्याने खून केला असण्याची शक्यता आहे. एवढ्या मोठ्या संख्येने हत्याकांड घडवून आणूनही त्याचे खरे रूप जगासमोर येण्यासाठी दहा वर्षांचा काळ लागला. आतापर्यंत होगलच्या विकृतीला बळी पडलेले 130 हून अधिक मृतदेह जर्मनी, तुर्कस्तान, पोलंड येथे सापडले आहेत. होगलने स्वत: 43 जणांचा खून केल्याची कबुली दिली आहे. 52 लोकांच्या हत्येचा आरोप त्याने फेटाळलाही नाही आणि मान्यही केला नाही. त्याचबरोबर पाच जणांचा खून केलाच नसल्याचा दावा त्याने केला आहे. ज्या संख्येने होगलने अतिशय थंड डोक्यांनी हत्याकांड घडवून आणले आणि त्याचा सुगावाही कोणाला लागला नाही. एवढ्या प्रमाणात नागरिक मारले जात असताना जर्मनीच्या आरोग्य यंत्रणेला थोडाही संशय येत नाही, याबाबत प्रश्‍न उपस्थित केले जात आहे. सध्या तुरुंगात असलेल्या होगलवर शंभराहून अधिक हत्या केल्याप्रकरणी खटला सुरू आहे. 
इतिहासातील सर्वांत खतरनाक सीरियल किलर्स

ठग बहराम पुरी : सीरियल किलरच्या रूपाने ठग बहराम पुरी जगभरात कुख्यात आहे. त्याचा जन्म 1765 मध्ये झाला होता. 50 वर्षांच्या काळात ठगने रुमालाच्या मदतीने गळा आवळून 900 हून अधिक नागरिकांची हत्या केली होती. त्याला 75 व्या वर्षी अटक केली आणि 1840 रोजी त्याला फाशीची शिक्षा दिली. 

चार्ल्स मेेन्शन : वेगळ्या प्रकारचा धार्मिक पंथ चालवणार्‍या सीरियल किलर चार्ल्स मेन्शनचा जन्मठेपेची शिक्षा पूर्ण करत असतानाच मृत्यू झाला. 1960 च्या दशकात त्याने घडवून आणलेल्या हत्याकांडाने दहशत निर्माण केली होती. चार्ल्सच्या हल्ल्याला अभिनेत्री शेरॉन टेट, निर्माते रोमन पोलन्सी यांची गर्भवती पत्नी बळी पडल्या. चार्ल्सच्या पंथातील लोकांनी त्यांची चाकूने हत्या केली होती. 

जेफ्री डामर : अमेरिकेच्या मिलवॉकी हत्याकांडाचा मुख्य आरोपी जेफ्री हा एक कुप्रसिद्ध सीरियल किलर होता. तो अत्याचारानंतर हत्या करायचा. मृतदेहाची विटंबना करायचा. याच पद्धतीने त्याने 17 पुरुषांना ठार केले होते. त्याला जेव्हा अटक झाली तेव्हा तो अनेक प्रकारच्या पर्सनालिटी डिसऑर्डरना बळी पडलेला आढळून आला.

टेड बंडी : 1970 च्या दशकातील कुख्यात सीरियल किलर टेड बंडी हा अमेरिकेतील अनेक शहरात राहणार्‍या सुंदर महिलांवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यासाठी कुप्रसिद्ध होंता. त्याने 36 महिलांची एका पद्धतीने हत्या केली होती. 

डॉ. हेरॉल्ड शिपमन : या विकृत डॉक्टरला 200 हून अधिक हत्येप्रकरणी दोषी मानले आहे. त्याच्यावर कोणालाही हत्येचा संशय आला नाही. रुग्णाच्या मृत्यूनंतर तो अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नातेवाईकांच्या हवाली करायचा. मात्र त्याच्यावर कधीही संशय कोणीही घेतला नाही. अनेक वर्षे हा प्रकार सुरू होता. एकदा त्याने मोठ्या प्रमाणात मृत्यू प्रमाणपत्रावर सह्या करून ठेवलेले आढळून आले. तेव्हा त्याच्यावर संशय बळावला. त्याने 15 जणांची हत्या केली होती. तुरुंगात असताना त्याने आत्महत्या केली. 

जॅक द रिपर : 1800 च्या दशकात जॅक द रिपर नावाचा कुख्यात गुन्हेगाराने हत्याकांडातून लंडनमध्ये दहशत निर्माण केली होती. या व्यक्तीने केवळ वेश्यांना लक्ष्य केले होते. अर्थात या गुन्हेगाराचे खरे नाव कधीही समोर आले नाही. त्याच्या कार्याच्या पद्धतीने त्याला जॅक द रिपर असे नाव पडले. तो एवढा कू्रर होता की त्याच्या नावाने अनेक हॉरर व्हिडिओ गेमदेखील बाजारात आले आणि लोकप्रिय ठरले.