होमपेज › Crime Diary › खुनाचा बदला

खुनाचा बदला

Published On: Jul 04 2018 2:11AM | Last Updated: Jul 04 2018 2:11AMआर्थिक देवाणघेवाण, कौटुंबिक वाद, मालमत्तेच्या वाटणीवरून, जमिनीच्या बांधावरून संघर्षाच्या घटना या नित्याच्या बनत चाललेल्या आहेत. यात एखादा विकोपाला गेलेला वाद मिटविणे, परस्परामध्ये सलोखा घडवून आणणे हेही काम तसे जिकिरीचे असते. कारण, दोन्ही बाजूच्या व्यतींनी कमी-जास्त प्रमाणात पडती अथवा सामंजस्याची तयारी घेणे गरजेचे असते. पण, कोणाचेही न ऐकता माझेच खरे, ही मानसिकता ठेवल्याने कौटुंबिक वादाचे पर्यवसान दुहेरी खुनात होऊन दोन्ही कुटुंबीयांची कशी वाताहत झाली, याची ही कथा!

जत शहरापासून 20-25 कि. मी. अंतरावरच्या एका गावात दोन ते अडीच वर्षांपूर्वी घडलेली ही घटना आहे. भीमाप्पा-राचाप्पा हे दोघे नात्याने तसे सख्खे चुलत भाऊ होते. दोघेही शेजारी शेजारी राहत होते. परंतु, राहते घर, शेतजमीन व अन्य मालमत्तेची समान वाटणी न झाल्याने काही वर्षांपासून त्यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. दोघेही स्वभावाने तापट असल्याने दोघांच्या वादात पै-पाहुणे आणि नातेवाईकांनी खतपाणी घातल्याने दोघा चुलत भावांमधील वाद विकोपाला गेला होता. दोघांनीही एकमेकांना बघून घेण्याची भाषा केली होती. या वादामध्ये भीमाप्पा व राचाप्पा यांच्या मुलांनीही सहभाग घेतल्याने विकोपाला गेलेला वाद मिटविण्यासाठी गावातील प्रतिष्ठित लोकांनी मध्यस्थी केली; पण पालत्या घड्यावर पाणीच झाले. दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

एकेदिवशी राचाप्पाचा काठ्या-कुर्‍हाडीने वार करून भीमाप्पाच्या  तीन मुलांनी आपल्या साथीदाराच्या मदतीने खून केल्याची बातमी गावात वार्‍यासारखी पसरली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काहीजणांनी मग ही माहिती दूरध्वनीवरून जत पोलीस ठाण्यास कळविली. पो. नि. श्रीकांत पिंगळे पोलीस फाट्यासह घटनास्थळी पोहोचण्यास पाऊण तासांचा अवधी लागला. नेमकी ही संधी साधून आरोपी पसार झाले. 

सकाळी राचाप्पाची मुले कामानिमित्त गावापासून काही अंतरावर डोंगराचा भाग असलेल्या ठिकाणी गेली होती. त्यांना ही माहिती समजली. इरेला पेटलेल्या राचाप्पाच्या तिन्ही मुलांनी भीमाप्पाच्या मुलांनी आपल्या वडिलांना ज्या पद्धतीने संपविले अगदी त्याच पद्धतीने बदला घेण्याचा विडा उचलला. त्यांनी भीमाप्पा आणि त्यांच्या मुलांची शोधाशोध सुरू केली. काहीजणांकडे चौकशी केली. त्यावेळी भीमाप्पा शेजारच्या डोंगरभागात गेल्याचे त्यांना समजले. भीमाप्पाला याची सुतरामही कल्पना नव्हती. दुपारच्या सुमारास डोंगरभागातून परत येत असताना त्याच्यावर दबा धरून बसलेल्या राचाप्पाच्या तिन्ही मुलांनी आपल्या साथीदाराच्या मदतीने कुर्‍हाडीने हल्ला चढविला. भीमाप्पाने प्रतिकार केला; पण त्याचा प्रतिकार जास्त काळ टिकू शकला नाही. तो जागीच गतप्राण झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पलायन केले.

भरदिवसा एकाच दिवशी घडलेल्या या दुहेरी खुनाची बातमी पंचक्रोशीत  पसरली. सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्‍त समितीचे अध्यक्ष, काही प्रतिष्ठीत व्यक्‍तींच्या उपस्थितीमध्ये घटनास्थळाचा पंचनामा करून राचाप्पा व भीमाप्पाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नजीकच्या रुग्णालयात पाठविण्यात आले. अडीच-तीन तासाच्या अंतराने  हे खून झाले होते. या दुहेरी खुनाचा तपास करणे पो. नि. पिंगळे यांच्या दृष्टीने तसे आव्हानात्मक असले तरी खून झालेले दोघे आणि खून करणारे आरोपी परस्परांचे नातेवाईक असल्याने दोन्ही बाजूंना तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. कोणत्याही स्थितीत खुनातील प्रमुख आरोपी आणि त्यांच्या साथीदारांना वेळ न दवडता गजाआड करण्याचा त्यांनी निर्धार केला. पिंगळे साहेबांनी गावातील प्रतिष्ठित व्यक्‍तींची भेट घेत त्याबाबत चौकशी केली. काही नातेवाईकांनाही विश्‍वासात घेतले. त्यात दोघांच्या भांडणात तेल ओतण्याचे काम करणार्‍या काहींनी आम्हाला जणू काही माहीतच नाही, असा पवित्रा घेतला. 

रात्री साडेआठ-नऊच्या सुमारास गावातील काही प्रतिष्ठीत व्यक्‍ती, मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत भीमाप्पा व राचाप्पाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारानंतर पो. नि. पिंगळे यांनी आपला मोर्चा आरोपींच्या घराकडे वळविला. आरोपींच्या रोजच्या ठावठिकाण्याविषयी त्यांनी नातेवाईकांकडून माहिती मिळविली. त्यावेळी ते शेतातील वस्त्यांच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. पोलिसांनी अचानक रात्री 12 ते 1 च्या दरम्यान शोधमोहीम राबविली असता गावापासून काही अंतरावरील एका घरात राचाप्पाची तीन मुले व त्यांचे साथीदार, तर त्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका घरामध्ये भीमाप्पाची तिन्ही मुले व त्यांचे साथीदार खुनात वापरलेल्या काठ्या-कुर्‍हाडीसह झोपलेल्या स्थितीत आढळून आले. पोलिसांनी त्या घरांना घेराव घालून दोन्ही खुनातील आरोपी व त्यांच्या साथीदारांना मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले.अचानक पोलिसांच्या तावडीत सापडल्याने आरोपींना प्रतिकारास जागा उरली नाही. आरोपी व त्यांच्या साथीदारांना वापरलेल्या शस्त्रांसह ताब्यात घेतले आणि पोलिस ठाण्यात आणले. त्यांनी खुनाची कबुली दिली. त्या सर्व आरोपींची रवानगी कारागृहात करण्यात आली. पोलिसांनी वापरलेल्या तत्परतेमुळे दुहेरी खुनाचा छडा लावण्यात यश आले आणि पुढील होणारा अनर्थ टळला.

- सचिन ढोले, सांगली.