होमपेज › Crime Diary › अधिक सावध राहण्याची गरज

अधिक सावध राहण्याची गरज

Last Updated: Jan 29 2020 2:03AM
श्रीराम ग. पचिंद्रे, कोल्हापूर

राजधानी दिल्लीमधून तीन संशयित अतिरेक्यांना अटक करण्यात आली, याचा अर्थ एखाद्या दहशतवादी कृत्याचा कट उधळून लावण्यात यश मिळाले आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस संशयित अतिरेक्यांना अटक करतात, तेव्हा एक वर्ग पोलिसांचा उपहास करतो. परंतु 26 जानेवारीसारख्या दिवसाच्या काळात दहशतवादी कृत्य करण्याचे कट रचले जातात, हेही नाकारता येणार नाहीच. सध्या अटकेत असलेले तीन दहशतवादी हे इस्लामिक स्टेट या संघटनेचा प्रभाव असलेल्या तामिळनाडू मॉड्युलचे असल्याचे सांगितले जाते. तिघेजण ख्वॉजा मोईनुद्दीन, सैय्यद नवाझ आणि अब्दुल समद यांची पार्श्वभूमीदेखील धार्मिक गुन्ह्यांची आहे. 2014 मध्ये तिघेही हिंदू मुनानी नेते के.पी. सुरेशकुमार आणि 2017 मध्ये स्थानिक भाजप नेते एम. आर. गांधी यांच्या हत्येच्या कटात सामील होते. साहजिकच त्यांनी सुरुवातीला हिंदू संघटनेच्या नेत्यांना लक्ष्य केले असल्याने भविष्यातही हिंदू संघटनांचे नेते लक्ष्य करण्याचे यांचे मनसुबे असू शकतात, यावर काहीही शंका नाही. सुरेशकुमार हत्या प्रकरणात सशर्त जामीन मिळाल्यानंतर हे तिघेही नेपाळमध्ये पळून गेले होते. 

पोलिसांकडून यांच्याविषयी जी माहिती सांगितली गेली आहे, ती खरी मानल्यास; या दहशतवाद्यांचा एक गट असून त्याचे नेतृत्व मोईनुद्दीन करतो आहे आणि त्याचे लागेबांधे परदेशात आहेत. हे  सर्वजण  खोट्या  कागदपत्रांच्या आधारे काठमांडूला आपले केंद्र करून नेपाळ सीमामार्गावरून उत्तर प्रदेशात दाखल झाले होते. या तिघांना पोलिसांनी चकमकीनंतर पकडले आहे, म्हणजे या लोकांच्या चारित्र्यावर संशय घेण्यात काही शंकाच नाही. आता पोलिस  या तिघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ठिकठिकाणी छापे घालत फिरताहेत. 

या सर्व प्रकरणात पोलिसांनी अत्यंत सतर्कतेने आणि चपळतेने काम करणे अवश्य आहे. जेणेकरून या तिघांचे साथीदार सतर्क होऊन पळून जाण्यात यशस्वी होऊ नयेत. त्याचबरोबर कारवाई करताना निर्दोष लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. पोलिसांनी पकडलेल्या गुन्हेगारांच्या विरोधात पुरावे गोळा करण्याची घाई करावी लागते, अन्यथा ते पुरावे नष्टही केले जाऊ शकतात. त्या पुराव्यांच्या माध्यमातून त्यांच्या इतर साथीदार किंवा त्यांना मदत करणार्‍यांपर्यंत पोहोचण्यात मदत होते. पोलिसांची परिस्थिती अवघडच असते. पण पोलिसांकडून झालेली जराशी चूकही विरोधकांच्या हातात कोलीत देते आणि पोलिस प्रशासनाला ते आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करतात. सध्या देशात विशेषतः दिल्लीमध्ये जी परिस्थिती आहे; ती पाहता पोलिसांनी अधिक सावधान राहणे गरजेचे आहे.