होमपेज › Crime Diary › मटणाची पार्टी

मटणाची पार्टी

Published On: Feb 07 2018 1:40AM | Last Updated: Feb 07 2018 1:40AMआभाळ भरून आलं होतं. हवेत प्रचंड उष्मा वाढला होता. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवाची घालमेल सुरू होती.  वार्‍याचा मागसूम नव्हता. आता काळे ढग गर्दी करू लागले होते. विजांचीही चमचम सुरू झाली. आपल्या खोपी शेजारी बसून जानबा उसाची खोडवी रचत होता. ‘पावसाळ्यात कुठलं आणायचं जळण-काटूक’ म्हणून तो अगदी पद्धतशीरपणे खोडवी रचत होता. जवळच्या रानात जानबाचीच शेरडं चरत होती. जानबाची खोप तशी जंगलाशेजारीच होती.  शेरडांकडं वारंवार लक्ष ठेवणं लागत होतं.

जानबानं एकवार आभाळाकडे पाहिले. ढगांनी आभाळ व्यापलं होतं. विजेनं जोरदार आरोळी दिली. तसं जंगलातल्या मोरांनी जोराचा केकाट सुरू केला. जानबा उठला. खोडव्यावर उसाचा पाला टाकला. अन् शेरडांच्याकडे वळला. त्यात काळी पांढरी शेळी दिसत नव्हती.  आता जोराचा वारा सुटून गारा पडू लागल्या होत्या. जानबा गारांचा मार खात शेळीला शोधत होता. शेळीचा पत्ताच नव्हता. तो पुढे झाला अन् दचकला, एक तरुणी निपचित पडली होती. जानबा घाबरला.

धाडस करत जवळ जाऊन त्याने पाहिले. एक 17/18 वर्षांची ती मुलगी होती. जानबानं तिच्या नाकाजवळ हात नेला. तरुणी मयत झाली होती. गळ्याभोवती काळे निळे व्रण दिसत होते. तरुणीच्या तोंडातून फेस बाहेर आल्याचे दिसत होते.  जानबा घाबरून खोपीकडे माघारी आला. आपली शेरडं त्यानं खोपीत बांधली. अन् त्यानं आपलं घर गाठलं.  गावात येऊन त्याने सरपंचांना खबर दिली. खबर मिळताच सरपंचांनी भर पावसात ते ठिकाण गाठलं अन्, शहानिशा केली.

घटनेची खबर मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेहा शेजारीच जानबाच्या काळ्या-पांढर्‍या शेळीचे पाय तुटलेल्या अवस्थेत पडलेले होते. 

पंचनामा करून मृतदेह पी.एम. साठी पाठविण्यात आला. घटनास्थळी पोलिसांनी तपास केला. मात्र, कोणताही धागा पोलिसांना मिळाला नाही. मृतदेह चार तासांपूर्वीच तिथे टाकण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी काढला. तसेच मयत तरुणी अन् जानबाची शेळी यांचाही काहीतरी संबंध असावा असा अंदाज फौजदार मनीश्‍वर यांनी केला.

फौजदार मनीश्‍वर प्रथमच अशा घटनेचा तपास करत होते. पोलिसांनी जानबाच्या गावात कोण मुलगी बेपत्ता आहे का? याची चौकशी केली. मात्र, गावातील मुलगी नव्हतीच ती.  शेजारच्या चार-पाच गावांमध्येही शोध घेऊनही त्या तरुणीचा ओळख-पत्ता लागत नव्हता. त्यामुळे मयताची ओळख पटल्याशिवाय गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊ शकत नव्हता. 

पोलिसांनी दोन दिवस आसपासची गावे पिंजून काढली. चार दिवसांनंतर कर्नाटकातील एका पोलिस स्टेशनला संबंधित वर्णनाची तरुणी बेपत्ता असल्यााची माहिती पोलिसांना मिळाली. हा सीमाभाग असल्याने पोलिसांनी कर्नाटक पोलिसांच्या मदतीने मयत तरुणीचे घर गाठले. घरामध्ये एक विधवा स्त्री होती. पोलिसांची माहिती ऐकून तिने हंबरडा फोडला.

मयत तरुणीचे नाव शामला होते. ती 12 वी च्या वर्गात शिकत होती. पोलिसांनी तिचे महाविद्यालय गाठले. त्यामध्ये तिच्या मित्र-मैत्रीणींकडे चौकशी केली. मात्र, तिथे कशी पोहोचली, हे कुणालाच माहीत नव्हते. तिचे प्रेमप्रकरण अथवा एकतर्फी प्रेमातून तिची हत्या झाली असावी याचीही चौकशी पोलिसांनी केली. मात्र, कोणताच धागा पोलिसांना लागत नव्हता.

मयत तरुणीविषयी पोलिस अधिक माहिती गोळा करत होते. त्यावेळी जानबाच्या गावामध्येही पोलिसांचे खबरे काम करत होते. एका खबर्‍याने घटना घडली त्या रात्री गावात एका चौघा मित्रांच्या टोळक्याने पार्टी केल्याची खबर दिली. चौघांची नावे मिळताच पोलिसांनी चौघांना गाठले. मात्र, आम्ही जानबाची शेळी चोरलेली नाही. आम्ही मटण आणून पार्टी केली होती, असे सांगितले. मात्र, त्यातून एक धक्‍कादायक माहिती बाहेर आली. चौघांपैकी दिनेश हा शामलीचा चुलत भाऊ होता. शामली व तिची आई त्यांच्या वडिलांच्या भांडणाला वैतागून माहेरी राहत होती. शामलीचे वडील 15/16 वर्षांपूर्वीच वारले होते.

आता मात्र रितेशवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. ज्या ठिकाणी पार्टी झाली, तिथे पोलिसांनी गुप्‍तपणे चौकशी केली. रितेशच्या शेतामध्ये पोलिसांना हाडांचे अवशेष सापडले. पोलिसांनी मग रितेशचा एक मित्र वामनला उचलले. चांगला पाहुणचार दिला. अन् मग मात्र या खुनाचे रहस्य बाहेर आले.

त्या दिवशी शामली कॉलेजवरून रितेशबरोबर इकडे आली होती. जंगलाच्या बाजूला असलेली आपली वडिलार्जित शेती बघायला चल म्हणून रितेश शामलीला घेऊन गेला. पुढे काय झालं माहीत नाही असं म्हणून वामन रडू लागला.

रितेशला चांगलाच झोडपला. मग मात्र त्याने आपणच शामलीचा खून केल्याचे सांगितले. “शामलीचे वडील कामानिमित्त मुंबईला होते. त्यांना एड्सची लागण झाली आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. सगळे पाहुणे, गावात त्यांच्या मृत्यूचे कारण समजले. त्यामुळे रागाने शामलीच्या आईला रितेशच्या वडिलांनी पंधरा वर्षांपूर्वी घराबाहेर काढले. अशीच वर्षे निघून गेली. शामली हुषार असल्याने सरकारी शिष्यवृत्ती मार्फत ती शहरात शिक्षण घेत होती. रितेश चुलतबहीण शामलीला भेटायचा. तो उपवर झालेनंतर त्याचे लग्‍न ठरेना. नंतर तो निराशेच्या गर्तेत गेला. त्याला वाटले आपला चुलता एड्सने मृत्यू पावल्यामुळेच आपले लग्‍न ठरेना तो शामलीला टाळू लागला. नंतर त्याची खात्रीच झाली. अन् त्याने मायलेकींना संपविण्याचा निर्णय घेतला.

त्याने शामलीला बोलावून घेतलं. शेतामध्ये फिरत असताना तिचा गळा आवळला. अन् जंगलात प्रेत टाकून दिले. त्यानंतर तो शामलीच्या आईलाही संपवणार होता; पण पुढे काय करायचे हे कळेना म्हणून त्याने मित्रांना बोलावून घेतले. ही घटना त्यांना सांगितली. त्यांनी ही बाब लपविण्यासाठी  मटणाची पार्टी मागितली. त्यासाठी त्याने जानबाची चरत असलेली शेळी चोरली. येताना रितेशने प्रेताची अवस्था काय आहे हे पाहण्यासाठी चोरलेले शेळीचे पाय प्रेताजवळ आणून टाकले.  आणि भरकटलेल्या शेळ्या मृतदेहाच्या आसपास ढकलल्या. रितेशला मित्रांसह अटक झाली. सध्या तो जेलची हवा खात आहे. 

-डी. एच. पाटील
म्हाकवे (कोल्हापूर)