Sat, Sep 21, 2019 06:12होमपेज › Crime Diary › अरेरे... नेम चुकला...!

अरेरे... नेम चुकला...!

Published On: Jun 12 2019 1:16AM | Last Updated: Jun 19 2019 1:38AM
सायली रावले,अलिबाग 
 

राजन आणि रुपेश.. दोघेही सख्खे भाऊ... लहानपणापासूनच मोठा राजन खूप महत्त्वाकांक्षी असल्याने त्याला कायमच मोठ्ठं काहीतरी करून श्रीमंत होण्याचा ध्यास होता. तर लहान भाऊ रुपेशही तसा महत्त्वाकांक्षी; पण आहे त्यातही तो समाधानी होता.. दोघांचही चांगलं सुरू होतं.. पण अचानक काय झालं कोण जाणे.. राजनने त्याच्या कुटुंबाच्या वडिलोपार्जित जमिनीसाठी तगादा लावला.. पण ती जमीन राजन आणि रुपेश दोघांना समान मिळणे अपेक्षीत होते. त्याच्या वडिलांनी याबाबत राजनला समजावलं.. पण तो एकायला तयार नव्हता... त्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला.. वेगळी चूल मांडली.. रुपेशला खूप वाईट वाटलं.. पण राजनची मागणी चुकीची होती.. त्यामुळे त्याने राजनला अडवलं नाही.. दोन सख्खे भाऊ वेगळे झाले...

त्यानंतर राजनने रुपेशशी बोलणं कमी केलं... रुपेशने विचार केला की, राजनचा राग शांत झाल्यावर होईल सगळं ठीक.. पण राजनच्या डोक्यात मात्र वेगळंच काही शिजत होतं... एके दिवशी रात्री रुपेश त्याला त्याच्या व्यवहारात फायदा झाला म्हणून मित्रांना पार्टी देण्यासाठी गावाजवळच्याच एका टेकडीवर गेला... मित्रांसोबत रुपेशची मजामस्ती सुरू होती. फार उशीर झाल्याने सर्वांनी निघायचं ठरवलं... रुपेशचा एक मित्र समीरला काय लहर आली कोण जाणे.. त्याने रुपेशची गाडी चालवायचा हट्ट केला.. रुपेशनेही दिली त्याला गाडी.. सगळे मजामस्ती करीत परतीच्या वाटेला निघाले... आणि थोडं पुढे गेल्यावर अचानक विरुद्ध दिशेने एका बाईकवरून तिघे जण आले... समीरच्या गाडीसमोर येऊन त्यांनी गोळ्या झाडल्या... आणि ते पळून गेले!

एका क्षणात काय झालं.. कोणाला काही कळेनाच...पण समीरला आधी रुग्णालयात नेणं महत्त्वाचं होतं.. सर्वांनी कसंबसं स्वतःला सावरुन समीरला रुग्णालयात नेलं... पण उशीर झाला होता.. समीरचा जागीच मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी पोलिसांना कळवलं... फायरिंग झाल्याचं गांभिर्य लक्षात घेऊन इन्स्पेक्टर बेदी रुग्णालयात दाखल झाले. रुपेशने त्यांना सामोरे जात सर्व हकीकत सांगितली... इन्स्पेक्टर बेदींनी समीरची सगळी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.. रुपेश आणि त्याच्या मित्रांनी सांगितलेल्या वर्णनावरून आरोपींचं स्केच तयार करून घेतलं.. समीरबद्दल मिळालेल्या माहितीवरून त्याचं कोणाशी वैर वगैरे असेल असं काही आढळलं नाही.. पण मग समीरला मारण्याचं कारण नक्‍की काय असू शकतं?

इन्स्पेक्टर बेदी विचारात पडले. ‘सावंत.. समीरच्या मित्रांचा जबाब घेतला ती फाईल आणा जरा..’ सावंत फाईल घेऊन आले.. ‘करेक्ट..सावंत आपण या मुद्द्याकडे लक्षच दिलं नाही.. चला माझ्यासोबत..’ असं म्हणत इन्स्पेक्टर बेदी रुपेशच्या घरी पोहोचले.. त्यांनी रुपेशला त्याच्याबद्दलची सर्व माहिती विचारली... त्याचं कोणाशी वैर, भांडण वगैरे... रुपेश तसा सरळ मार्गी माणूस.. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा मोठा भाऊ राजनने जमिनीसाठी त्याच्याशी वारंवार वाद घालत असल्याचे सांगितले.. पण इन्स्पेक्टर बेदी रुपेशची इतकी चौकशी का करत होते, याबाबत मात्र रुपेशला शंका आली.. त्यांनी त्याबद्दल विचारणाही केली.. पण इन्स्पेक्टर बेदींनी त्याला, ‘आरोपींना पकडल्यावर समजेल’ असं सांगून वेळ मारून नेली... 

पुढचा जवळपास दीड महिना पोलिस समीरच्या मारेकर्‍यांना शोधत होते.. तिघेही वारंवार ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना त्यांना पकडणे कठीण होत होते... अखेर एके दिवशी एका टीपरने इन्स्पेक्टर बेदींना फोन करून हे तिघेही कर्नाटकातल्या एका खेडेगावात राहत असल्याचे सांगितले.. इन्स्पेक्टर बेदींनी तत्काळ सुत्रे हलवून कर्नाटकातून त्या तिघांनाही ताब्यात घेतलं... इन्स्पेक्टर बेदींनी रुपेश आणि राजनलाही पोलिस स्टेशनमध्ये बोलावून घेतलं होतं.. विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरं देण्यात आधी तिघेही आढेवेढे घेत होते... पण हवालदार सावंतांनी त्यांचा हिसका दाखविल्यावर तिघेही पोपटासारखे बोलायला लागले... ‘साहेब, आम्हाला रुपेशला मारायची सुपारी दिली होती.. आणि त्याच्या गाडीचा नंबर दिला होता.. पण रुपेशची गाडी समीर चालवत होता हे आम्हाला नंतर समजलं.. तोपर्यंत समीर मेला होता.. आम्ही घाबरलो आणि पळालो..’...‘ते सगळं माहितीये मला.. रुपेशला मारायची सुपारी कोणी दिली तेव्हढंच सांगा....’ इन्स्पेक्टर बेदी. असं म्हणल्यावर तिघांनीही राजनकडे बोट दाखविलं.. आणि राजनची बोबडीच वळली... 

त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ ठरला... ‘काय राजन भाऊ.. आता सगळं खरं सांगताय.. की...’ इन्स्पेक्टर बेदी. ‘सांगतो साहेब.. सगळं सांगतो...अहो मला आमची वडिलोपार्जित जमीन हवी होती. पण आमचे बाबा ती मला एकट्याला द्यायला तयार नव्हते... रुपेश पण काही बोलत नव्हता... तो जोपर्यंत जिवंत असेपर्यंत मला जमीन मिळायची नाही.. म्हणून मी त्याला माराची सुपारी दिली... पण या मुर्खांनी त्याला सोडून समीरलाच मारलं! आणि माझा प्लॅन फसला...’ राजन बोलत असताना रुपेश आणि त्याच्या घरचे आश्‍चर्याने बघत होते.. फक्‍त एका जमिनीच्या तुकड्यासाठी राजन त्याच्या सख्ख्या भावाच्या जीवावर उठला होता!