Wed, Feb 20, 2019 14:49होमपेज › Crime Diary › संशयाचे भूत 

संशयाचे भूत 

Published On: Jul 04 2018 2:11AM | Last Updated: Jul 04 2018 2:11AMगोदापात्रात पंचवीशीतील तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. नागरिकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मृतदेहाची ओळख पटवून मारेकर्‍यांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. सुरुवातीस काही तरुणांना अटकही केली; मात्र त्यातून मारेकरी सापडेनात. अखेर मृत युवकाची पार्श्‍वभूमी तपासल्यानंतर पोलिसांना खरे मारेकरी सापडले.  नेहमीप्रमाणे पोलीस ठाण्यात दैंनदिन कामकाज सुरू होते. त्याचवेळी फोन खणाणला. ‘साहेब, नदीपात्रात मृतदेह तरंगत आहे,’ अशी माहिती मिळाल्यानंतर कोणी आत्महत्या केली असेल, असा विचार करून पोलीस घटनास्थळी रवाना झाले...

नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढल्यानंतरमृतदेहावर अनेक गंभीर जखमा आढळून आल्याने पोलीस चक्रावले. हा आत्महत्या किंवा अपघात नसून घातपात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाचे फोटो काढून तपासास सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्‍ताने माखलेले गोणपाट जप्त केले. तसेच, परिसरात ठिकठिकाणी रक्‍ताचे  डाग आढळून आले. पोलिसांनी रक्‍त आणि रक्‍तमिश्रित मातीचे नमूने गोळा केले. घटनास्थळावरील पाहणीनंतर पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार युवकाचा खून दुसरीकडे केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी नदीपात्रालगतचा परिसर निवडल्याचा संशय होता. 

काही वेळातच मृतदेहाची ओळख पटली. तो मृतदेह सराईत गुन्हेगार सुरेशचा होता. पोलिसांनी लागलीच त्याच्या घरच्यांना ही बाब कळवून मृतदेहाची ओळख परेड करून अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सुरेशच्या नातलगांकडे तपास केला, त्यावेळी तीन-चार दिवसांपूर्वी सुरेश त्याच्या मित्रांसोबत रिक्षात बसून कुठेतरी गेल्याचे समजले. त्यानंतर तो घरी आलाच नाही किंवा संपर्कही केला नसल्याचे नातलगांनी सांगितले. पोलिसांनी रिक्षासह रिक्षातील युवकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांना ठोस माहिती मिळत नव्हती. सुरेश हा सराईत गुन्हेगार असल्याने त्याचे मित्रही गुन्हेगारी जगतातीलच होते. तसेच, तो सहसा घरात किंवा घराजवळील परिसरात राहत नसल्याने त्याच्या मित्रपरिवाराची माहिती कोणालाही नव्हती. 

अखेर खबर्‍यांच्या माहितीनुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी सुरुवातीस सुरेशला ओळखत नसल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी तीन दिवसांपूर्वी पार्टी केल्यानंतर सुरेशला शहरातील बसस्थानकाजवळ सोडल्याची कबुली दिली. मात्र, त्याचा खून आम्ही केला नसल्याचेही युवकांनी सांगितले. त्यामुळे पोलीस चक्रावले होते. तपास भरकटल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. तसेच खबर्‍यांमार्फत माहिती काढण्याचा प्रयत्न केला. त्यात शहरातील सराईत गुन्हेगार संदीपचे नाव समोर आले. घटनेच्या रात्री संदीप आणि सुरेश दोघेही समोर असल्याचे काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले. त्यानुसार पोलिसांनी संदीपचा शोध घेण्यास सुुरुवात केली. मात्र, तो काही केल्या सापडत नव्हता. अखेर काही दिवसांनी पोलिसांनी संदीपला अटक केली. सराईत असल्याने तो गुन्हा कबूल करतच नव्हता.

मात्र, पोलिसांसमोर त्याने हार मानत गुन्हा कबूल केला. सुरेश आणि संदीप दोघेही मित्र होते. दोघेही वेगवेगळ्या टोळींसाठी काम करीत होते. सुरेश आपल्या टोळीची ‘टीप’ दुसर्‍या टोळीतील गुंडांना देतो, असा संशय संदीपला होता. घटनेच्या दिवशी सुरेश मद्याच्या नशेत बसस्थानकाजवळ भेटल्यानंतर संदीपने त्याच्या टोळीतील इतर गुंडांसोबत सुरेशला पुन्हा दारू पाजली. त्यानंतर त्यांच्यात टोळीची टीप प्रतिस्पर्धी टोळीला देण्यावरून वाद झाले. या वादात संदीप व त्याच्या साथीदारांनी सुरेशवर कारमध्येच धारदार शस्त्राने वार केले. त्यातच सुरेशचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी त्याचा मृतदेह नदीपात्रात टाकून पळ काढला होता. पोलिसांनी सर्व पुरावे जमा करून घटनाक्रम जुळवला. तसेच, या खून प्रकरणातील इतर तिन्ही आरोपींना परजिल्ह्यातून अटक करून, सर्वांना जेलमध्ये टाकले. 


- गौरव अहिरे, नाशिक