Fri, Apr 26, 2019 20:13होमपेज › Crime Diary › गरूडाची नजर

गरूडाची नजर

Published On: Oct 24 2018 1:25AM | Last Updated: Oct 24 2018 1:25AMसंजयने बंगल्याच गेट उघडल्याचा आवाज आला; तशी सविताने बाल्कनीतील लाईट लावली.कार पार्क करून संजयने लॅच कीने दरवाजा उघडून आत आला. आईच्या रूममध्ये डोकावून पाहिलं. आई नेहमीप्रमाणे हातात जपमाळ घेऊन खुर्चीतच झोपलेली. संजयने दरवाजा उघडला...‘आई रात्र खूप झालेय.. अकरा वाजून गेलेत ..बेडवर झोप’ असं म्हणून संजयने आईला हाताला धरून बेडवर झोपवले. सविता पाण्याचा ग्लास घेऊन आली. संजयने अगोदरच फोन करून ‘बाहेर जेवणार’ असा निरोप दिला होता. त्यामुळे सवितालादेखील ‘कधी एकदा अंग टाकते’ असं झालं होतं.

एक दीड तास उलटला असेल... खिडकीची काच सरकावल्याचा  आवाज आल्याने संजयची  झोपमोड  झाली. बाजूला पाहिलं तर सविता गाढ झोपी गेलेली ... मग आवाज कुठून येतोय म्हणून संजय बेडवरच उठून बसला. लाईट चालू करायला उठणारच  तोच तो काळ्या सावल्यानी त्याच्या अंगावर झडप  घातली.काय घडतंय कळायच्या आधीच संजयच्या तोंडात बोळा कोंबला. या झटापटीत सविताची झोपमोड झाली..अंधारात काय चाललंय तिला समजेना..तिने बेडच्या बाजूला असलेल्या नाईट लॅम्पचं बटण दाबलं..आणि त्या प्रकाशात संजयला दोघांनी धरून ठेवलेय आणि त्याच्या मानेवर चाकू ठेवलेला पाहून सविताची बोबडीच वळली..‘मुकाट्याने सर्व दागिने पैसे काढून द्या नाहीतर नवर्‍याला ठार मारू’ अशी धमकी चोरट्यांनी दिली. सविताला काहीच सुचत नव्हतं. संजयने त्याही अवस्थेत दोघांना हिसडा दिला. तसा एकाच्या हातातील चाकू पडला. पण तेवढ्यात दुसर्‍याने सविताला पकडले. तसा संजयच अवसान गळालं...हातानीच इशारा करित ‘हवं ते घ्या..पण पत्नीला सोडा’ अशी हात जोडून त्यांनी विनंती केली. सविताने भरभर कपाटातले, अंगावरचे दागिने काढून चोरट्यांच्या पुढ्यात टाकले. रोख रक्‍कम जेमतेम वीस हजार पाहून चोरटे भडकले. आणखी काय घरात असेल तर काढ नाहीतर दोघांनाही ठार मारतो अशी धमकी दिली. तेव्हा सविताने गयावया करित होतं तेवढं  दिलं, नवर्‍याला सोडा’ अशी विनवणी केली.

एवढ्या मोठ्या बंगल्यात अपेक्षेएवढे काहीच हाताला न लागल्याने चोरट्याचा पारा चढला. त्यांनी संजयला मारहाण करायला सुरूवात केली तशी सविता  चोरट्यांच्या पाया पडू लागली. ‘मारू नका आणखी दागिने देते’ असे म्हणत सविता सासूबाईच्या खोलीकडे आली. पाठोपाठ दोन्ही चोरटे संजयला घेऊन आले. ‘आई दार उघडा...’सविताने दोन तीनवेळा दारावर थाप मारली. संजयच्या आईने दरवाजा उघडला.

‘काय ग...काय झालेय एवढी घाबरलीस का?’ परंतु तोंडातून शब्द फुटण्याऐवजी सविताला रडू कोसळलं. संजयच्या मानेवर चाकू पाहून आईला भोवळच आली. ‘घाई कर..पटापट दागिने आण’ तशी सविताने सासूबाईच्या गळ्यातील मोहन माळ, कानातले आणि चेन दिली. चोरट्यांचे लक्ष देव्हार्‍यातील चांदीच्या देवाकडे गेले. ‘देव्हारा पण रिकामा कर.’ तसं सविताने मुकाट्याने सगळे चांदीचे देव आणून दिले. सविता सासूबाईच्या तोंडावर पाणी मारत होती. परंतु त्यांना शुद्ध नव्हती..चोरट्यांनी बंगल्याचा दरवाजा उघडला; तसे बाहेर थांबलेले आणखी तिघे आत आले. एवढंच हाताला लागलंय..दोघांनी लुटलेला माल दाखवला..तसं बाहेरून आत आलेल्या म्होरक्यांनी तुम्ही तिघं बंगल्यात थांबा ...(संजयकडे पाहत) ...मी याला घेऊन जातो एटीएममध्ये कॅश असेलच.’ तशी चोरट्यांच्या डोळ्यात चमक आली..एकाने संजयच्या तोंडातला बोळा काढला..‘काय गडबड केलीस तर आई आणि बायकोचा मुडदा बघायला मिळेल..’ म्होरक्याने संजयला त्याची कार घ्यायला सांगितली.‘आहेत तेवढे एटीएम कार्ड घे...’

रात्रीचे दोन वाजता संजयच्या बंगल्यातून कार बाहेर पडली. संजय सोबत म्होरक्या आणि मागच्या सीटवर साथीदार होता. कार चालवतानादेखील संजयचे लक्ष घरी लागले होते. संजयने एटीएम समोर कार थांबवली...‘तू एकटा जा...चालाकी करू नकोस...’ दोघंही कारमधून संजयच्या हालचाली पाहत होते. संजयने दोनवेळा कार्ड टाकले..पैसे काढले...तिसर्‍या वेळी मात्र पैसे आले नाहीत...संजय कारमध्ये येऊन बसला..‘पन्‍नास हजार निघालेत..एटीएममधली कॅश संपली.’ म्होरक्यांनी आणि साथीदारांनी एकमेकाकडे पाहिलं..जास्त वेळ घालवण्यात अर्थ नव्हता..संजयच्या हातातील कॅश घेत कार पुन्हा बंगल्याकडे घेण्यास सांगितले. कार बंगल्याच्या आवारात शिरताच म्होरक्यांनी इशारा केला, तसे तीन साथीदार पटापट बाहेर आले..‘काम फत्ते झालेय’ असं म्हणत पाचही जण अंधारात गडप झाले.

संजय बंगल्यात धावला. आई जेमतेम शुद्धीवर आलेली..संजयला पाहून तिला रडू कोसळलं. सविताला आणि आईला धीर देत संजयने ‘सर्व जाऊदे आपण सुखरूप आहोत ना ही देवाची कृपा आहे.’ संजयने बेडरूममध्ये जाऊन मोबाईल आणला. जवळच्या पोलिस ठाण्यात फोन लावला. घडलेला प्रकार सांगितला. दहा मिनिटांत पोलिस इन्स्पेक्टर सोनम शेळके स्टाफसह हजर झाला. संजयच्या आजूबाजूला बंगल्यात घडलेल्या प्रकाराची कल्पना नव्हती. इन्स्पेक्टर शेळकेनी बरोबरच्या स्टाफला ‘प्रत्येक बंगल्यात जाऊन खबर द्या.. तपासणी करा..चोरटे लपून बसण्याची शक्यता आहे’ असे आदेश दिले. गस्तीवर असलेल्या जीपलादेखील वायरलेस मेसेज पाठवला. संजय राहत असलेला परिसर उच्चभ्रू होता. दरोड्याचा प्रकार समजताच सर्वांची झोप उडाली.  पहाट झाली..परंतु चोरट्यांचा काही तपास लागला नाही. जवळपास दहा लाखांचा धाडसी दरोडा पडल्याचे सर्वत्र पसरले. सकाळपासून श्वान पथक आणि पोलिसांची विशेष टीमदेखील तपासात गुंतली. चोरट्यांनी बंगल्याच्या खिडकीला ग्रील नसल्याचे हेरले होते. आणि जास्त कष्ट न घेता बंगल्यात प्रवेश केला होता. आसपासचे सीसीटीव्ही फुटेज,एटीएमजवळील सीसी टीव्ही कुठेच दिसणार नाही याची चोरट्यांनी खबरदारी घेतली होती. पोलिसांना चोरट्यांनी आव्हान दिलं होतं. घरात कुठेही हाताचा ठसा राहणार नाही याचीदेखील काळजी घेतली होती. 

दोन दिवस उलटून सुद्धा तपासाला दिशा मिळत नव्हती आणि वाढता दबाव यामुळे पोलिस हतबल झाले होते.  इन्स्पेक्टर शेळके यांच्या मदतीला विशेष पथक पाठविण्यात आले. इन्स्पेक्टर  रहिम मुल्ला यांच्या तपासाची पद्धत सर्वांना माहीत होती. ‘मुडद्यालासुद्धा बोलायला लावतील’ असा नावलौकिक होता. मुल्लांनी त्यांचे खबरे कामाला लावले. बंगल्यापासून मुख्य रस्त्यावरील दुकाने,हॉटेलमध्ये आठवडाभरात नवीन व्यक्‍ती पाहिल्याची माहिती खबरे गोळा करीत होते आणि अचानक तपासाला दिशा मिळाली. संजयच्या बंगल्याच्या मार्गावर लग्नाचा हॉल होता. तिथला वॉचमन पंढरीनाथ बढेकर याने तपासाला दिशा दिली. ‘साहेब, एक रिक्षा सतत दोन दिवस येत होती..दुपारी आली की संध्याकाळी उशिरा जायची..’ इन्स्पेक्टर मुल्लांच्या डोळ्यात चमक आली...‘गुन्हेगारापर्यंत रिक्षा पोहोचवू शकते’ असा विचार त्यांच्या मनात आला.

‘रिक्षाचा नंबर आहे का?’ मुल्लांनी प्रश्न केला.‘हो साहेब, मला सवय आहे डायरीत नंबर लिहून ठेवायची...आणि हो साहेब, समोर काचेवरदेखील सैराट लिहिलं होतं.’  महत्त्वाची माहिती होती. मुल्लांनी सहका-यांना पटापट रिक्षा शोधून काढण्याचे आदेश दिले. संजयपासून सहा किलोमीटर गावातली रिक्षा होती. पोलिस हवालदार संदीप पाटील आणि सुभाष चव्हाण साध्या वेशात गावात पोहचले. रिक्षा मालक विनोद घोसाळकर असल्याची माहिती मिळाली होती. विनोदची बायको कपडे वाळत घालत होती.‘विनोदला उठवा भाडं आहे...’ चव्हाण बोलले.‘नाय उठणार ते, जागरण झालंय...’ तसा हवालदार संदीप घरात घुसला.

‘अहो काय करताय? नाय उठणार ..समजत नाही का?’ तसं सुभाषने ‘पोलिस आहोत’ असे सांगताच विनोदची बायको गांगरली.‘विनोद चल..तळोजाचं भाडं आहे’ असं म्हणत हवालदारांनी विनोदच्या अंगावरची चादर ओढली. तसा विनोद गडबडला. ‘पोलिस आहोत.. चल चौकशीला बोलावलंय..’ विनोदची तर झोप उडाली. ‘साहेब, मी काय केलंय..मला कशाला नेताय.’ ‘चल गेल्यावर समजेल.’ मुल्लासाहेबांच्या समोर खुर्चीत विनोदची लुडबूड सुरू होती. ‘साहेब, माझा काय संबंध नाही..मला उगाच गोवताय चोरीत...’ अर्धा तासानंतरही विनोदचं पालपुद सुरू होतं.. अखेर मुल्ला यांनी दोन झापडीचा प्रसाद दाखवताच विनोद पोपटासारखा बोलू लागला. ‘साहेब, मी फक्‍त टिप दिली आणि चोरी करणारे दुसरे होते.’ विनोद भराभर सर्व ओकला...विनोदने दिलेल्या माहितीवरून एका टोळीचा छडा लागला. चोवीस तासांत सर्वांच्या मुसक्या आवळल्या. सोनाराला विकलेलं सोनं आणि रक्‍कम हाती लागली. पण खरी मोलाची मदत झाली ती वॉचमन पंढरीनाथची...ज्यानं नजरेने रिक्षा टिपली होती! त्याच्या गरूडाच्या नजरेनेच सारी किमया केली होती..!