Mon, Nov 20, 2017 17:18होमपेज › Crime Diary › ड्रॉईंग पेपर

ड्रॉईंग पेपर

Published On: Nov 15 2017 1:59AM | Last Updated: Nov 14 2017 8:36PM

बुकमार्क करा

नाना भिजतच गावातल्या मंदिरात आला. मंदिरात एका बाजूने  पावसाचे पाणी आत येत होते. ते पावळणीचे गळणारं पाणी नानानं बंद केलं. अन् ते मागच्या बाजूला आले. अन् दचकले. देवळाच्या मागच्या बाजूला एक लहान मुलगी निपचित पडल्याचं त्यांना दिसले. तसे ते पुढे गेले. ती निपचित  पडल्याचे त्यांना दिसले. अन् ते धावतच पोलिसपाटलांच्या घरी आले. 

पोलिसपाटीलही काहीजणांच्या सोबत भिजतंच देवळात आले. तर खरेच बाजूला एक लहान मुलगी मरून पडली होती. पाटलांनी लागलीच पोलिसांना खबर दिली. घटनेची खबर मिळताच फौजदार ओंकार पाटील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा सुरू केला. नानांचा जबाब नोंदवला. सार्‍या वाडीभर बातमी कळल्याने सारा गाव गोळा झाला होता. परंतु, मयत मुलीची ओळख लागत नव्हती. साधारणतः 14 ते 15 वर्षे मुलीचे वय होते. पंचनामा करून प्रेत पोस्टमार्टमला पाठविण्यात आले. जवळपासच्या सर्वच वाड्यांमध्ये पोलिस ओळख पटविण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, मयत मुलीची ओळख पटत नव्हती. एव्हाना दिवस मावळायला सुरुवात झाली होती. दिवस मावळत जाईल तसा पावसाचा जोर पुन्हा वाढत होता. दुसर्‍या दिवशी पुन्हा वाडी-वस्तीवर ओळख परेड राबविली.  अन् एक लहान मुलगी अनपेक्षितपणे नानांच्या पडवीत शिरली. तिला पाहून नाना भांबावले. 

‘नाना, मी सुधा, तुम्हाला कायतरी सांगायचंय?’ असे म्हणत ती नानांच्या शेजारी बसली. ‘नाना, मेलेली ती मुलगी माझ्याच वर्गात दहावीला शिकत होती. सुमेधा नाव तिचं. मात्र, तिचं गाव मला माहीत नाही. ती पाहुण्यांच्याकडे थोरातवाडीत राहते; पण इकडे कशी आली मला माहीत नाही!’ तिचे ऐकून नाना उठले. अन् पाटलांच्या घरी आले. मग दोघेही त्या शाळेत आले. शाळेत सुमेधा दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समजले. तिचे नातेवाईक मुंबईला गेले होते. त्यांना बोलावून घेण्यात आले. सुमेधाला आईवडील कोणीच नव्हते. ती अनाथ म्हणूनच तिचा गणपतराव देशमुखांनी सांभाळ केला होता. पोलिस तपास सुरू असताना वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला अन् फौजदार पाटील चक्रावून गेले. सुमेधा चार महिन्यांची गरोदर होती. 

सुमेधाचा खून गळा आवळून करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. खुनी हा सुमेधाच्या परिचयाचा होता हा अंदाज पोलिसांनी बांधला. पोलिसांनी तिच्या मित्र-मैत्रिणींकडे तपास केला. सुमेधा साधी सरळ मुलगी असल्याचे चौकशीत आढळून आले. शाळेमध्ये  ती फारशी कोणाशी बोलतच नव्हती. तिच्या खास मैत्रिणीकडे चौकशी केली; पण पोलिसांना स्पष्ट तपासाचा धागा मिळत नव्हता. अखंड दहा वाड्यांमध्ये एकच हायस्कूल होते. तिच्या वर्गात 30 मुले होती. त्यांची चौकशी करण्यात आली. तिथे असणार्‍या सर्व शिक्षकांचीही चौकशी करण्यात आली. तर देऊळ दोन दिवसांपासून सील करण्यात आले होते. पोलिसांनी देऊळ पुन्हा उघडले. तिथे चौकशी करत काही सापडते का पाहत असताना एक ड्रॉईंग पेपर पोलिसांना आढळून आला. त्या पेपरवर एक तरुण-तरुणी एकमेकांना हार घालून लग्‍न करत आहेत असे चित्र होते. त्याखाली नावे होती. अन् फौजदार ओंकार पाटील यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. ते शाळेत आले. नुकतीच प्रार्थना झाली होती.  दहावीचा वर्ग  शांत होता. तिथे पहिला तास ड्रॉईंगचा होता. मोहिते सर सुन्‍नपणे खुर्चीत बसून होते. पोलिसांना पाहून ते झटकन खुर्चीतून उठले. त्याबरोबर ‘मोहिते सर तुम्ही पोलिस स्टेशनला चला’ म्हणून त्यांना गाडीत घातले.

‘बोला सर का मारलं सुमेधाला, बोला लवकर अन्यथा अन्य मार्गांचा अवलंब करावा लागेल,’ असं म्हणत फौजदार पाटील यांनी मोहिते सरांच्या खांद्यावर हात ठेवला. ‘साहेब, सुमेधाला मीच मारलं कारण ती माझ्या संसारात येऊ पाहत होती. आधीच मला दोन मुले आहेत अन् पुन्हा दुसरी पत्नी... मी घाबरलो. गेल्या दोन वर्षांपासून आमचे अफेअर सुरू होते. खोलीवर मी एकटाच राहायचो. ती अभ्यासाच्या निमित्ताने घरी यायची. त्यामध्ये आमचे संबंध आले. ‘गरोदर आहे, आपण लग्‍न करू,’ असा तगादा तिने लावला होता. त्या दिवशी तिला मी त्या वाडीतून या वाडीत घेऊन आलो होतो. मी तिला देवळाजवळ आणले. तिथे बराच वेळ आमचा वाद सुरू होता. मी गर्भपात करूया म्हणत होतो. ती ऐकण्यास तयार नव्हती. माझा राग अनावर झाला अन् मी तिचा गळा दाबला.’ 
मोहिते गुरुजींना जन्मठेपेची शिक्षा झाली. 

डी. एच. पाटील, म्हाकवे, कोल्हापूर