Sat, Sep 21, 2019 05:52होमपेज › Crime Diary › चाणाक्ष नजर

चाणाक्ष नजर

Published On: Jun 12 2019 1:16AM | Last Updated: Jun 19 2019 1:38AM
गौरव अहिरे, नाशिक
 

सतत हसतमुख आणि खोडकर स्वभावाची राणी सर्वांच्या मनात घर करून होती. अवघ्या सहा वर्षांची असली तरी हुशार आणि सर्वांना आपलेसे करून घेण्याच्या खुबीमुळे राणी सर्वांना आवडत होती. मात्र, अचानक ती बेपत्ता झाली. शोध घेऊनही ती सापडत नसल्याने सर्वांच्या चेहर्‍यावर काळजी होती. मात्र, एका कुटुंबीयांच्या वर्तणुकीत काळजीऐवजी चिंता दिसत होती. त्यामुळे पोलिसांनी या चिंतेचे कारण शोधत पोलिसांनी तपास केला... 

विसेपूरसारख्या छोट्याशा गावात लोक गुण्यागोविंदाने राहत होते. त्यातच सर्वांच्या आवडीची राणीही विसेपूरच्या गावात लहानाची मोठी होत होती. हुशार, सतत आनंदी राहणारी आणि खोडकर स्वभाव असल्यामुळे राणी सर्वांच्याच मनात घर करून होती. गाव छोटेसे असल्याने आणि सर्व एकमेकांच्या परिचित असल्याने राणी दिवसभर शेजापाजार्‍यांच्या घरात वावर करीत होती. तिचे आई-वडीलही तिला मिळणारे प्रेम पाहून भारावून जात होते. मात्र, एक दिवस राणी अचानक दिसेनाशी झाली. तिच्या घरच्यांनी सर्व गावात शोध घेतला. कोणी गावाबाहेर गेले आहे का याचीही चौकशी करून राणी तर त्यांच्यासोबत नाही ना अशीही खातरजमा घरचे करीत होते. मात्र, तसे काहीच आढळून आले नाही. सर्व गावकरी गावातच होते. त्यामुळे राणी गेली तरी कोठे असा सवाल सर्वांच्या तोंडी होता. 

राणीच्या घरच्यांनी गांभीर्य ओळखून लगेचच पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी गावात येऊन चौकशी आणि पाहणी केली. राणीला शेवटी तिच्याच घराबाहेरील जागेत खेळताना गावकर्‍यांनी पाहिले होते. त्यामुळे राणी घराजवळून गेली कोठे याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी रात्रभर गाव आणि गावाजवळील निर्जन परिसर पिंजून काढला, मात्र राणीचा शोध लागला नाही. दुसर्‍या दिवशीही शोध सुरूच होता. गावातील प्रत्येक जण पोलिसांकडे आणि राणीच्या पालकांकडे राणीबाबत चौकशी करून काळजी व्यक्‍त करीत होते. पोलिसांनी राणीच्या आईकडे चौकशी करीत गावातील कोणावर संशय आहे का याचीही चौकशी केली. मात्र, आईने कोणाबद्दलच तक्रार केली नाही. त्यामुळे राणीचा शोध कसा घ्यावा, असा प्रश्‍न पोलिसांना पडला होता.

राणीच्या घरातून बाहेर पडताना सखुबाई राणीच्याच घराकडे पाहत असल्याचे पोलिसांना दिसले. त्यामुळे पोलिसांनी सखुबाईकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस आपल्याकडे येत असल्याचे पाहून ती घरात निघून गेली. घाबरल्याने सखुबाई घरात गेली असावी, असा अंदाज पोलिसांना आला त्यामुळे ते निघून गेले. दुसर्‍या दिवशी पुन्हा पोलिस राणीच्या घराजवळ आले. त्यांना कोणताच पुरावा मिळत नव्हता. त्यावेळी सखुबाईचे पती आप्पा पोलिसांना दिसले. त्यांनी आप्पाकडे राणीबाबत विचारपूस केली, त्यावेळी आप्पाने पोलिसांच्या प्रश्‍नांना उत्तरे देण्याऐवजी तपासाबाबत प्रश्‍न जास्त विचारले. तपासाची दिशा कोठे आहे याची माहिती जाणून घेण्यातच आप्पाला रस असल्याचे पोलिसांना लक्षात आले. राणीबाबत त्याने जास्त काळजी व्यक्‍त केली नाही किंवा तसे दाखवलेही नाही, मात्र त्याच्या चेहर्‍यावर चिंता दिसत होती. पोलिसांना ही गोष्ट खटकली. त्यांनी आप्पावर पाळत ठेवली. आप्पासह त्याच्या दोन्ही मुले आणि पत्नीचा दैनंदिन राहणीमानात बदल झाल्याचे पोलिसांना जाणवले. त्यामुळे पोलिसांनी आप्पाकडेच चौकशीचा मोर्चा वळवला. सुरुवातीस उडवाउडवीचे उत्तर दिल्यानंतर पोलिसांच्या प्रश्‍नांना आप्पा काहीच बोलेनासा झाला. त्यामुळे पोलिसांनी संशयावरून आप्पाला ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात नेत आप्पाकडे चौकशी सुरू केली.

रात्रभर चौकशी केल्यानंतर आप्पाने राणीचा मृतदेह कोठे आहे तेवढेच सांगितले. पोलिसांनी गावाबाहेर शेतात पुरलेला राणीचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास जिल्हा रुग्णालयात पाठवले. मात्र, आप्पाने राणीचा मृत्यू कसा झाला हे सांगितलेले नव्हते. शवविच्छेदन अहवालात राणीवर अत्याचार झाल्याचे आणि तिचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी आप्पाकडे सखोल चौकशी सुरू केली. त्यावेळी त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांना धक्‍का बसला. राणीवर आप्पाचा मोठा मुलगा बाळू याने अत्याचार करून खून केल्याचे उघडकीस आले. राणी घराबाहेर खेळत असताना बाळूने तिला घरात बोलवले. राणीवर अत्याचार करून त्याने तिचा गळा आवळून खून केला होता. राणीचा मृतदेह घरातच लपवला होता. मात्र, राणी बेपत्ता झाल्यानंतर तिचा शोध सुरू झाल्याने बाळू घाबरला. त्याने त्याचे वडील आप्पा, आई सखुबाई आणि लहान भावाला घडलेला प्रकार सांगितला. चौघांनी कट रचून राणीचा मृतदेह गावाबाहेरील शेतात पुरला आणि काही माहितीच नसल्याच्या अविभार्वात गावात वावरत होते. मात्र, पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने आप्पा आणि त्याच्या कुटुंबीयांना हेरले आणि राणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यांना पकडून दिले. न्यायालयानेही बाळूला राणीवर अत्याचार आणि खून केल्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावली. तर बाळूच्या भावासह आई-वडिलांना सक्‍तमजुरीची शिक्षा सुनावली.