Sun, Jun 07, 2020 02:19होमपेज › Crime Diary › ...आणि भारतातील

...आणि भारतातील

Published On: May 15 2019 1:47AM | Last Updated: May 22 2019 1:41AM
मारुती वि. पाटील

जर्मनीतील ओल्डबर्ग शहरातील नील होगल या परिचारकाने तब्बल 300 रुग्णांची हत्या केल्याचा संशय आहे. सध्या होगल दोन रुग्णांच्या हत्येबद्दल जन्मठेपेची शिक्षा भोगत असून सध्या त्याच्यावर आणखी 100 रुग्णांच्या हत्येप्रकरणी खटला सुरू आहे. त्याचा निकाल येत्या जूनमध्ये अपेक्षित आहे. 42 वर्षीय होगल याला  अत्यंत खतरनाक सीरियल किलर मानले जाते. भारतातही काही सीरियल किलरचे खटले गाजले. त्यांना शिक्षाही झाली. त्यात बेहरामपासून ते नोएडाच्या सुरेंद्र कोलीपर्यंत अनेकांनी देशच नव्हे तर संपूर्ण जग हादरवून सोडले. त्यातले निवडक दहा जण पुढीलप्रमाणे आहेत.

ठग बेहराम - ठग बेहराम याने 1790 ते 1840 या कालावधित त्याच्या गँगच्या साथीने तब्बल 931 हत्या केल्या होत्या. पिवळ्या रुमालात नाणे बांधून तो लोकांचे गळे आवळत होता. जबलपूरपासून ग्वालेर-दिल्ली मार्गावर त्याने कित्येक हत्या केल्या आहेत. लोकांना अडवून तो पैसे मागत होता. ब्रिटिश अधिकारी विल्यम स्लिमॅन यांनी दहा वर्षांच्या मेहनतीनंतर बेहरामला पकडले. 1840 मध्ये त्याला फाशी झाली.

ऑटो शंकर - ऑटो शंकर हा ट्रान्सपोर्टरपासून देह व्यापाराच्या धंद्यात शिरला. चेन्नईमध्ये अल्पवयीन मुली आणि महिलांना तो आपल्या जाळ्यात ओढायचा. 1988 ते 1989 दरम्यान त्याने 16 मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या केली होती. त्याच्या गँगमध्ये इतर पाच लोकांचा सहभाग होता. तो जेलमधूनही फरार झाला होता. त्याला पुन्हा पकडण्यात आले. 1995 मध्ये त्याला फाशी झाली.

चार्ल्स शोभराज
बिकीनी किलर नावाने शोभराज ओळखला जात होता. भारतासह इतर देशांमध्येही त्याने 12 पेक्षा अधिक हत्या केल्या आहेत. अवैध धंदे वाढवण्यासाठी तो या हत्या करत होता. काठमांडूच्या तुरुंगात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. 1986 मध्ये तो तिहार जेलमध्ये होता.

सायनाइड मोहन
मोहन हा कर्नाटकच्या प्रायमरी स्कूलमध्ये विज्ञान विषयाचा शिक्षक होता. महिलांना फसवून त्यांना तो लग्नाचे आमिष दाखवत असे. लग्नाच्या पहिल्या दिवशी तो महिलांशी शारीरिक संबंध ठेवायचा. नंतर महिलांची हत्या करून त्यांच्या अंगावरील दागिने घेऊन तो फरार होत असे. त्याने एकूण 20 हत्या केल्या होत्या. 2013 मध्ये मोहनला फाशीची शिक्षा सुनावली

दरबारा सिंह
दरबारा सिंह आधी सैन्यात होता. रोजगाराच्या शोधात पंजाबला येणार्‍या लोकांना तो निशाणा बनवत होता. निष्पाप मुली आणि महिलांवर बलात्कार करून त्यांची गळा कापून तो हत्या करत होता. एकदा तुरुंगवास भोगूनही त्याने हे काम सोडले नव्हते. 17 हत्या केल्याची कबुली त्याने दिली होती. 2008 मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावली. ही शिक्षा पुढे जन्मठेपेत बदलली.

मल्लिका
मल्लिका ही बंगळुरूच्या श्रीमंत महिलांशी मैत्री करत होती. 1999 ते 2007 या काळात ती महिलांना एकांतात असलेल्या मंदिरात पूजेसाठी बोलावत होती. प्रसाद आणि पाण्यात सायनाइड देऊन ती त्यांची हत्या करत होती. 2012 मध्ये मल्लिकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तिने 6 महिलांची हत्या केली होती.

रमन राघव
रमन राघव याने 1966 ते 1968 या वर्षात मुंबईमध्ये 41 पेक्षा अधिक हत्या केल्या होत्या. 1969 मध्ये त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने राघवला फाशीची शिक्षा सुनावली होती. पण त्याची मानसिकता ठीक नसल्याने त्याला जन्मठेप ठोठावण्यात आली. तो बेघर होता, तरीही झोपडी आणि फुटपाथवर झोपणार्‍या लोकांची हत्या करायचा. 1995 मध्ये त्याचा मृत्यू झाला.

रवींद्र  
रवींद्र याने मुंइबईमध्ये 7 हत्या केल्या होत्या. या सातही प्रकरणात मृतदेहाजवळ बीअरची बाटली आढळली होती. हा खुनी बियरमॅन नावानेच ओळखला जात होता. ऑक्टोबर 2006 ते जानेवारी 2007 मध्ये त्याने हे खून केले होते. 2007 मध्ये तो पकडण्यात आला. हे सर्व खून मुंबईमध्ये चर्चगेट परिसरात झाले होते.

कम्पटीमार शंकरिया
कम्पटीमार हा जयपूरचा कुख्यात खुनी. 1977 ते 78 च्या दरम्यान त्याने सुमारे 70 खून केले होते. शंकरिया हा कानशिलात हातोड्याने वार करत होता. तो हत्या का करत होता, हे रहस्य अजूनही कायम आहे. तो म्हणत होता की, हत्या केल्यावर मला प्रचंड आनंद मिळतो. 1979 मध्ये त्याला फासावर लटकवण्यात आले.

सुरेंद्र कोली
कोली याने नोएडामध्ये त्याच्या मालकाच्या घरात 2005 ते 06 दरम्यान 19 हत्या केल्या होत्या. लहान मुलींना घरी बोलावून तो ठार मारत होता. मृतदेहावर बलात्कार करून त्याचे तुकडे तो खात होता. शरीराचे काही भाग आजूबाजूला नाल्यांमध्ये फेकत होता. 2009 मध्ये त्याला फाशी सुनावली.