होमपेज › Crime Diary › लालसा

लालसा

Published On: Jun 13 2018 1:32AM | Last Updated: Jun 12 2018 8:00PMपोटाला मिळवती आणि धडधाकट तीन मुले होती. तरीही सुमतीबाईंनी पतीच्या आकस्मिक निधनानंतर कमी श्रमातील चांगल्या पगाराची परदेशातील नोकरी मिळविण्याच्या इराद्याने आवश्यक असलेला पासपोर्ट काढण्यासाठी दोन ते तीन वेळा मुंबई वारीही केली. याच काळात पासपोर्ट काढण्याच्या निमित्ताने तिची सुखियाराम या परप्रांतीय व्यक्‍तीशी ओळख झाली. चाळीशी ओलांडूनही आपले रूप आणि सौंदर्य पतीच्या निधनानंतरही अबाधित ठेवलेल्या सुमिताबाईंशी त्याने सलगी वाढविली. 

तिच्या स्वभावाचा आणि परिस्थितीचा अंदाज घेतला. पण, सुमतीबाईंने सुखियारमशी केलेली जवळीक तिच्या मुलांना खटकली. सुखियारामचा सुमतीबाईंच्या मालमत्तेवर डोळा होता. त्याच्या वाटेत येणार्‍या तिचा मुलगा नितीनचा त्याने खून केला आणि आतापर्यंत मिळालेले पैसे घेऊन पोबारा केला. पण, आपले कसब दाखवत पोलिसांनी सुखियारामच्या मुसक्या आवळल्या आणि त्याची रवानगी कारागृहात केली. त्याची ही कहाणी.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या दुर्गम भागातील एका गावात घडलेली ही घटना. श्रीमती सुमतीबाईंची परिस्थिती तशी मध्यमवर्गीय. पोटी शरद, नितीन, सूरज ही तीन मुले. मुले लहान असतानाच पतीचे अचानक निधन झाले. पण, परिस्थितीला तोंड देत सुमतीबाईने तीन मुले शिकवून  मोठी केली. ती आपापल्या व्यवसायात जिद्द, चिकाटीच्या जोरावर स्थिरही झाली. त्यापैकी नितीन हा विवाहित होता. तो गावागावांत फिरून भांडी व विविध वस्तू विकून आपल्या संसाराचा गाडा चालवित होता. काही कारणास्तव खटके उडाल्याने पत्नी सुरेखा व मुलगा माहेरी निघून गेल्याने तो बाहेर एका भाड्याच्या खोलीत राहत होता. शरद व आई हे पेठनाका येथे राहत होते. दुसरा मुलगा सूरज हा एका सधन गावात व्यापार-व्यवसाय करत होता. मात्र, नितीन पत्नीच्या विरहाने आता पुरता व्यसनाधीन बनला होता. 

राहते घर, कसण्यापुरती जमीन, शहरालगत प्लॉट अशी सुबत्ता असतानाही सुमतीबाईंची पैशाची हाव सुटत नव्हती. सुमतीबाईंनी बाहेर पडून जास्तीत जास्त पैसे देणारी नोकरी मिळविण्यासाठी परदेशीही जाण्याची तयारी दर्शवली होती. पण, परदेशात नोकरी करायची म्हटले तर पासपोर्ट व इतर दाखले, कागदपत्रांची आवश्यकता असते, याची जाणीव झाल्यामुळे सुमतीबाईंनी दोन-तीनदा मुंबई वारी केली आणि याच काळात परप्रांतीय असलेल्या सुखियारामशी तिची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात व नंतर अनैतिक संबंधात झाले.  

पासपोर्ट काढण्याच्या निमित्ताने ओळख झालेल्या सुखियारामने तिच्या घरच्या परिस्थितीचा अंदाज घेतला. सुमतीबाईच्या प्रेमात घायाळ झालेल्या सुखियारामने आता मुंबईतील मुक्‍काम हलवून सुमतीबाईच्या गावी तळ ठोकला. गावातील लोकांनी कोणाचातरी पाहुणा असेल, असा अंदाज बांधून याकडे तसे दुर्लक्षच केले. तिच्यापुरता अंदाज घेतलेल्या सुखियारामने सुमतीबाईकडून प्रत्येक वेळेला काहीना काही कारणे सांगून पैसे उकळण्याचा सपाटा सुरू केला.  

काही लाख रुपये गोळा केल्यानंतर सुखियारामला सुमतीबाईने गावातील आपल्या मालकीची चार गुंठे जमीन विकल्याची खबर मिळाली. रक्‍कम काही लाखांच्या घरात असल्याने सुखियारामने एकेदिवशी सायंकाळच्या वेळेस सुमतीबाईला गाठले. ‘विकलेल्या जमिनीचे पैसे मुलाकडे कशाला देतेस, ते माझ्याकडे ठेव,’ अशी विनंती वजा दटावणी त्याने केली. ‘जर मला पैसे तू दिले नाहीस तर तुझ्यासह तुझ्या मुलांना मारून टाकीन’, अशी धमकी देऊन तो रागारागाने बाहेर पडला. सुमतीबाईने पैसे न दिल्याने सुखियारामला चांगलाच राग आला होता. त्याने दहशतीसाठी तीनपैकी एकाचा काटा काढायचा, असे ठरविले. त्याने तिघांवरही पाळत ठेवून, तिघांपैकी एक व्यसनाधीन असलेल्या नितीनकडे मोर्चा वळवला आणि त्याच्या हत्येचा कट रचला. त्याचा गळा दाबला. नशेत तर्र असलेल्या नितीनचा फारसा प्रतिकार न झाल्याने आपले काम फत्ते करून, त्याने तेथून पोबारा केला. 

दुसर्‍या दिवशी फाट्याजवळच्या एका भाड्याच्या खोलीत 30 वर्षे वयाच्या तरुणाचा मृतदेह आढळल्याची बातमी  हा हा म्हणता सर्वत्र पसरली. एका ग्रामस्थामार्फत दूरध्वनीवरून घडलेल्या प्रकाराची पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली. पो. नि. भगवान शिंदे घटनास्थळी आले. रितसर पंचनामा करून नितीनचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. घटनास्थळापासून काही अंतरावर काही चीजवस्तू सापडल्या. शिंदे साहेबांनी नजीकच्या गावात कोण बेपता आहे का, याची चौकशी केली. चौकशीत तो मृतदेह नितीनचा असल्याची माहिती पुढे आली. त्याच्या चेहर्‍यावर मारहाणीच्या व गळा आवळल्याच्या खुणा होत्या. 

दरम्यान, या घटनेस आता आठ दिवसांचा कालावधी लोटला. पोलिसही चक्रावले होते. नितीनचा खुनी कोण? त्याच्या हत्येचे कारण काय? त्याचे कोणाशी गावात वैर होते काय? या दृष्टीनेही तपास केल्यानंतर गावात आई सुमतीबाईच्या घरी ये-जा करणार्‍या परप्रांतीय सुखियारामचे नाव पुढे आले. तपासात तो काही दिवसांपासून गावातून गायब असल्याचे समजून आले.  सुखियारामबाबत सुमतीबाईंनी व मुलांनी केलेले वर्णन, त्याचे प्राप्त झालेले छायाचित्र, मोबाईलवरील लोकेशन, संवाद यावरून शिंदे यांनी सुखियारामचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळण्याच्या दृष्टीने परराज्यात तपास पथके पाठविण्याबरोबरच ठिकठिकाणच्या पोलीस ठाण्यांना सुखियारामचे छायाचित्र पाठवून सतर्कता बाळगली. 

तपास पथकास सुखियाराम नाव बदलून वावरत असल्याची खबर खबर्‍याकडूनच मिळाली. यापूर्वी त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, जबरी चोरी, फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस यंत्रणेस मिळाली. सुखियाराम ज्या ज्यावेळी सुमतीबाईकडे येजा करी, त्यावेळी मुलांनी त्यास विरोध केला होता. तर, सुमतीबाई त्याचा पैशाचा तगादा चुकविण्यासाठी ठिकाणे बदलत होती. यामुळे सुखियाराम चिडून होता. त्याने मग नितीनला संपविण्याचा कट रचला. 

एका भाड्याच्या खोलीत राहत असलेल्या नितीनचा कोणीही नसलेले पाहून रात्रीच्या वेळेस खातमा केला. तपास पथकामार्फत मुंबई, उत्तर प्रदेश, कर्नाटकात शोधाशोध केली होती. शेवटी सापळा रचून सुखियारामला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखविताच सुखियारामने खुनाची कबुली दिली. नितीनच्या खुनाच्या आरोपाखाली त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. यावेळी मोबाईल लोकेशन, संवादाच्या टीप्स, सुमतीबाई व मुलांकडून मिळालेली माहिती, शवविच्छेदनाचा अहवाल आदी बाबी सुखियारामला शिक्षा करण्यास पुरेशा ठरल्या.
                                              
- सचिन ढोले, सांगली