होमपेज › Crime Diary › पाणीपुरी

पाणीपुरी

Published On: Jun 13 2018 1:32AM | Last Updated: Jun 12 2018 8:03PMपोलीस तपास करत असताना मयत महेशचा विवाह सहा महिन्यांपूर्वी झाल्याचे निष्पण्ण झाले. पण, महेशची बायको  पोलिसांना कोठेच  आढळून आली नाही. अधिक चौकशी करता, ती माहेरी गेली असल्याचे समजले. घटनेची माहिती तिला देऊन बोलावून घेण्यात आले. याचा मोठा परिणाम तिच्यावर झाला होता. अगदी ढेपाळून गेली होती शैला. सहा महिन्यांचा संसार काही क्षणांत नष्ट झाला होता.

मृग नक्षत्राने दमदार सुरुवात केल्याने मुंबईसह कोकणात पाऊस जोरात कोसळत होता. समुद्राला उधाण आलं होतं. खवळलेला समुद्र काठाशी रौद्र तांडव करत होता. अक्राळ विक्राळ समुद्राचं रूप पाहण्यासाठी काही चाकरमाने बाहेर पडले होते. निशांतही असाच बाहेर पडला होता. ‘आयला, या मुंबईच्या जीण्यापेक्षा, आपलं कोकण बरं’, असे त्याला वाटत होतं. विचारांच्या तंद्रीत तो समुद्राच्या काठावर पाहत होता. नकळत त्याच्या मनात येऊन गेले, या खवळलेल्या लाटांत मासे काय करत असतील? तो समुद्राच्या काठावरून अंगावर लाटा  झेलत चालत होता. असं निसर्गाचं आगळं वेगळं रूप तो प्रथमच पाहत होता. चालत बोटींच्या धक्क्याजवळ आला. सरकारने समुद्रात मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे मच्छीमार आपल्या घरात बसून होते.

होडींच्या धक्क्याजवळ तो पोहोचला. काठावर लाटा जोरात धडकत होत्या. अशाच एका लाटेने तो पुरा भिजून गेला. लाट ओसरली अन् त्याचं समोर लक्ष गेलं. एका तरव्याकडे कोणीतरी पालथा पडलेला दिसत होता. त्यानं जवळ जाऊन पाहिले. तो कुणा तरुणाचा मृतदेह होता. पाण्याच्या काठाला धडका झेलत पडला होता. निशांत पुढे आला. त्यानं पाहिलं तर चेहर्‍याचा चेंदामेंदा झाला होता. अंगावर लग्‍नाचा सफारी ड्रेस दिसत होता. तो थोडा घाबरला. त्याच्या मनात विचारांचे काहूर उठले. आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून त्याने पोलिसांना फोन केला. 

घटनेची खबर मिळताच फौजदार दामोदर सावंत तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून, पंचनामा केला. समुद्राच्या लाटांत पोलिसांनी काही सापडते का, ते शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या प्रवाहामुळे काहीच सापडले नाही. मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. जोरदार पाऊस सुरू असल्याने मयताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत होती. काठावरच असणार्‍या कोळीवाड्यातून पोलीस ओळखीसाठी फिरत होते. मात्र, पोलिसांना दिवसभर मृताची ओळख पटली नव्हती. दोन दिवसांनंतर पावसानं थोडीशी उसंत घेतली होती. पोलिसांनी संपूर्ण कोळीवाडे, मच्छिमारी वस्तीमध्ये शोधमोहीम राबविली. मात्र, काहीच हाती लागले नाही. कोळीवाडे सोडून आता शहरामध्ये पोलिसांनी ओळखपरेड राबविली. मात्र, तिथेही पोलिसांना काही मिळाले नाही. खबरेही कामाला लागले होते; मात्र ओळख पटत नव्हती. 

तिसरा दिवस उजाडला. पाऊस आता पूर्णपणे थांबला होता. त्यामुळे पोलिसांना तपास करणे सोपे झाले होते. ते गल्‍लोगल्‍ली फिरत होते. चार दिवासांनंतर संबंधित वर्णनाचा युवक एका खेडेगावातून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच सावंत बामणे गावात शिरले. सकाळी-सकाळीच  पोलिस गावात आल्याचे कळल्यावर गाव खडबडून जागे झाले. जो-तो चावडी गाठू लागला. चावडीसमोर तोबा गर्दी जमली. मयत व्यक्‍ती कोण, हाच प्रश्‍न प्रत्येकाच्या मनात होता. खबर्‍याच्या माहितीप्रमाणे पोलिस एका घरात शिरले. एक म्हातारा माणूस दार उघडून बाहेर आला व म्हणाला, ‘साहेब, बोला, काय चुकलं आमचं?’

‘आजोबा, तुमचा मुलगा कुठे आहे?’ ‘साहेब, चार दिवस झाले माझा पोरगा गायब आहे.’ पोलिसांनी लागलीच आपल्याकडील फोटो आजोबांना दाखविला. फोटोतील कपडे आणि व्यक्‍ती बघताच आजोबांना हुंदका फुटला. ‘हा माझा पोरगा. साहेब, हे असं कसं झाले हो?’ म्हणून रडू लागला. पोलिसांनी त्यांना बाजूला घेऊन तपास चालू केला. मयत महेशचे कोणाशीही वैरत्व नव्हते. भांडण अथवा पैशाचा व्यवहारही नव्हता. मात्र, अशा माणसाला कोणी मारले असावे, असा प्रश्‍न पोलिसांना पडला होता. 

पोलिस तपास करत असताना मयत महेशचा विवाह सहा महिन्यांपूर्वी झाला असल्याचे निष्पण्ण झाले. पण, महेशची बायको  पोलिसांना कोठेच  आढळून आली नाही. अधिक चौकशी करता ती माहेरी गेल्याचे समजले. घटनेची माहिती तिला देऊन बोलावून घेण्यात आले. याचा मोठा परिणाम तिच्यावर झाला होता. अगदी ढेपाळून गेली होती शैला. सहा महिन्यांचा संसार काही क्षणांत नष्ट झाला होता.  पोलिसांना प्रश्‍न पडला होता, महेश समुद्राच्या काठी गेलाच कसा? शिवाय, वैद्यकीय अहवालात त्याच्या पोटात दारूचे अंश आढळून आले होते. याचा अर्थ मरण्यापूर्वी तो दारू प्यालेला होता. त्यामुळे कोणासोबत तरी तो समुद्र काठावर गेला होता, हे निश्‍चित होते. पोलिसांनी त्याच्या मित्रांची धरपकड केली; मात्र दोन दिवस मार खाऊनही कोणी कबूल झाले नाही. पोलिस समुद्र काठावर महेशचा फोटो घेऊन फिरत असताना एका पाणीपुरी वाल्याने तो फोटो ओळखला. 

‘साहेब, यांच्याबरोबर एक बाई अन् एक गडीसुद्धा होता. पाणीपुरी खाऊन मग दोघांनी दारू घेतली. साहेब पाणीपुरी खाताना ती बाई दुसर्‍या तरुणाला सारखी खुणवाखुणवी करत होती.’ पोलिसांनी पाणीपुरीवाल्याला पोलिस ठाण्याला बोलावले. त्याचवेळी शैलाही पोलीस ठाण्यामध्ये आली होती. तिला पाहताक्षणी पाणीपुरीवाला पळतच साहेबांच्या जवळ आला व म्हणाला, ‘साहेब, हीच बाई होती ती. दुसर्‍या एकाला सारखी खुणावत होती.’ ओळख पटताच शैलाला अटक करण्यात आली. दोन-चार रपाटे पडताच तिने खून केल्याचे कबूल केले. 

‘साहेब, आम्हीच मारलं महेशला. माझे प्रेम होते लग्‍नापूर्वी शैलेंद्रवर’, असं म्हणून तिनं चेहरा निर्विकार केला. शैलेंद्रलाही अटक करण्यात आली. दोघांना चांगलाच ‘पाहुणचार’ देण्यात आला. ‘पाहुणचार’ मिळताच दोघे पोपटासारखे बोलू लागले. ‘साहेब, आम्ही दोघे लग्‍न करणार होतो. मात्र, आमचे लग्‍न झाले नाही. मी शैलाला विसरून गेलो होतो. मात्र, ती माहेरी आली की मला भेटल्याशिवाय जात नव्हती. त्यामुळे आम्ही पुन्हा लग्‍न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, महेशमुळे आम्हाला हे अशक्य होते . त्यामुळे त्याला संपविण्याचा निर्णय घेतला.’ ‘त्या दिवशी आम्ही तिघे फिरण्यासाठी समुद्र काठाला आलो होतो. मला पाणीपुरी खायची होती. तिघांनी पाणीपुरी खाल्‍ली, मग ते दोघेही दारू प्यायले. शैलेंद्रने फक्‍त दारू पिण्याचे नाटक केले. महेशला दारूच्या नशेतच गळा आवळून मारले अन् दिले प्रेत समुद्रात टाकून.’ शैलाने सांगितले.कोणताही पुरावा नसताना केवळ पाणीपुरीवाल्याच्या तत्परतेमुळे दोघेही सापडले. कायद्याने दोघांनाही शिक्षा झाली.                
   
-डी. एच. पाटील, म्हाकवे, कोल्हापूर