Wed, Feb 26, 2020 19:00होमपेज › Crime Diary › बँकेची पावती

बँकेची पावती

Last Updated: Jan 29 2020 2:03AM
डी. एच. पाटील म्हाकवे, कोल्हापूर

वारं छान सुटलं होतं. आकाशात ढगांची गर्दी दाटून येत होती. तहानेने व्याकूळ झालेल्या धरतीला पाऊस पाहिजे होता, मात्र पावसाने ओढ दिली. त्यामुळे जमीन चिंबून गेली होती. बैलाचा नांगर जमिनीत टेकतच नव्हता. दुपार झाली होती. दूरवर किरकिर किड्याचं ओरडणं ऐकू येत होतं. ब्राह्मणाच्या विहिरीनं पाण्याचा तळ गाठला होता. विहिरीतून पाण्याच्या चार बादल्या काढून तात्यानं बैलांना पाणी दाखवलं. घटाघटा पाणी पिऊन बैलं झाडाखाली विसावली. उकाडा जास्त जाणवू लागला. अंगातून घामाच्या धारा निघू लागल्या. तात्याचं लक्ष आभाळाकडं गेलं. मग तो खोपीकडं गेला. वळवाच्या काळ्या ढगांकडं पाहत तात्या ‘पड की बाबा, कुणाची परवानगी मागतोस?’ असं बोलला नि जोरात विजेनं कडकडाट केला.

विजेच्या कडकडाटानं खोपीतली बैलं भुजली. एक जोराने हंबरू लागला. तेवढ्यात जोराने वारं सुटलं. खोपीचा वरचा पाला उडून गेला. खोप वार्‍यानं हेंदकाळं खाऊ लागली. सैतानी वारा सुटला होता अन् आलेले काळे ढग पांगले. आज पुन्हा पावसाने दडी मारली. जोरदार वार्‍यामुळे झाडाचे अनेक आंबे झडून गेले. वारा आता हळूहळू शांत झाला तसं अंगातलं कुडतं सावरत तात्या वावरं आंबं गोळा करायला सुटला. वार्‍यानं बरंचसं नुकसान झालं होतं. ब्राह्मणाच्या झाडाचं आंबं तो गोळा करत होता. तेवढ्यात शेताच्या मधे भला मोठा धामण जातीचा सर्प उंदराच्या बिळात मुंडकं घालून काहीतरी शिकार शोधताना दिसला. 

तात्याला कुतूहल वाटलं. तो पुढे गेला परंतु तात्याची चाहूल लागताच धामण बिळात पळून गेली. तसा तो पुढं गेला. सापानं जिथं तोंड घातलं तिथं पाहिलं न् तात्याची घाबरगुंडी उडाली. तिथं त्याला माणसाच्या हाताचा सांगाडा दिसला. तो पळतच गावात आला. पाटलांना सांगून पोलिसांना खबर दिली.

पोलिस डोंगर भागात पोहोचले. ब्राह्मणाच्या शेतात मध्यभागी हाताचा सांगाडा होता. तिथे पोलिसांनी खुदाई केली. खुदाई करताच पोलिसांना माणसाचा आख्खं शरीर मिळालं. गावापासून हा भाग चार-पाच किलोमीटर अंतरावर होता. तिथं आणखी काही सापडते का, हे पोलिस पाहत होते. मृतदेहाजवळ पोलिसांना काही सापडले नाही. 

पोलिसांनी गावात जाऊन तपास सुरू केला. गावातील कोणी पुरुष अथवा महिला बेपत्ता आहे का, हे चौकशी करत होते; पण दिवसभर फिरूनही पोलिसांना हवी ती माहिती मिळाली नाही. दोन दिवस झाले तरीही हवा तो तपास लागत नव्हता. ओळख पटत नव्हती. तपास करत असताना लॅबचा अहवाल आला. त्यामध्ये ‘हा सांगाडा पुरुष जातीचा असून तीन महिन्यांपूर्वी गळा आवळून खून करण्यात आला आहे,’असा उल्लेख होता. पोलिसांनी तीन महिन्यात जे-जे बेपत्ता आहेत तिथं तपास केला; मात्र त्या व्यक्ती सापडल्या होत्या किंवा मयत होत्या. पोलिसांनी सर्वत्र वायरलेस मेसेज करून खबर घेतली; मात्र ओळख पटत नव्हती.

पोलिसांनी घटनास्थळी पुन्हा तपास केला. ब्राह्मणाचं शेत पिंजून काढलं. पोलिसांनी तात्याच्या खोपीपर्यंत तपास केला. पोलिस तपास करत असताना ती धामण बांधाच्या कोपर्‍यात पुन्हा दिसली. तिथं ती पुन्हा काहीतरी शोधत होती; मात्र माणसांची चाहुल लागताच ती पळून गेली. पोलिस तिथं शोधू लागले त्यावेळी पोलिसांना बँकेची एक पावती सापडली. ती ऊसबिलाची होती. त्यावर असणार्‍या पत्त्यावर पोलिस पोहोचले. एका कामगारानं दरवाजा उघडला. त्यानं ‘मालक तीन महिनं झालं परदेशी गेला आहे,’ हे तुणतुणं लावलं. त्यानं मालकाच्या मुलाचा नंबर दिला. तो परदेशी होता. 

पोलिसांनी मुलाचा नंबर लावला. मात्र ‘आपले वडील तीन महिने झाले फोनच उचलत नसल्याने आपण इकडे हैराण असल्याचे’ सांगितले. पोलिसांनी बँकेच्या शाखेत चौकशी सुरू केली. तीन महिन्यांपूर्वी मारुती लिपारे नावाने ऊसबिलाची उचल केल्याचे दिसून आले. पोलिसांनी बँक उचल अन् मरणाची वेळ तपासली. त्यामध्ये एका तासाचे अंतर होते. याचाच अर्थ, एका तासातच मारुतीचा घात करण्यात आला होता. मारुतीचा मुलगा भारतात येताच रीतसर केस नोंद करून तपास सुरू केला.  

मारुतीचा मुलगा परदेशात होता. तो एकटाच राहत होता. पोलिसांनी घरगड्याची झडती घेतली. त्याला पाहुणचार दिला; मात्र यातून काहीच माहिती मिळाली नाही. पोलिसांनी आपला मोर्चा बँकेत वळविला. तिथे मारुतीबरोबर त्या दिवशी कोण सोबत होते, याची चौकशी केली. मात्र घटना घडून तीन महिने उलटले होते. त्यामुळे बँकेचे कामगारही काही सांगू शकत नव्हते.मात्र एक शिपाई त्या दिवशी मारुतीबरोबर एक हाफ शर्ट घातलेला एक तरुण आल्याचे बोलला. शिवाय त्यानंतर दोनवेळा बँकेत आला होता, हेही सांगितले.

पोलिसांनी तरुणाचे छायाचित्र बनविले. ते अनेक ठिकाणी दाखविण्यात आले. दुसर्‍या पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले. यामध्ये पोलिसांना यश आले. दुसर्‍या पोलिस ठाण्याच्या परिसरात या तरुणाला पकडण्यात आले. त्याचे नाव रामू होते. त्याला पोलिसांनी चांगलेच बदडले.
‘होय साहेब, मीच मारलं हरामखोराला. माझ्या आईच्या आयुष्याची वाट लावली त्यानं. संपवला एकदाचा.’
‘माझे वडील मी एक वर्षाचा असताना वारले. माझी आई या हरामखोर मारुतीच्या घरी धुणीभांडी करायची. पैशाच्या मोहाने आईला त्यानं नादाला लावलं. ‘लग्न करतो’ म्हणून संबंध ठेवले आणि काहीतरी कारणे सांगून तीन वेळा गर्भपातही केला. नंतर पुन्हा आईला दिवस गेले; मात्र याने आपले हात वर करत सरळ लग्नास नकार दिला. महिने वाढले. आईचे पोट दिसू लागले. लोक निंदा करू लागले. बिन नवर्‍याचे पोर कसे? म्हणून हिनवू लागले. यातच आई खचली अन् तिनं विहिरीत उडी घेऊन जीव दिला. 
माझी आई गेली त्याचवेळी मी ठरविले याला संपवायचे.’ 
‘त्या दिवशी बँकेतून तो बाहेर पडला. गोड बोलून मी याला भरपूर दारू पाजली. रात्र होताच गळा आवळून मारलं अन् ब्राह्मणाच्या शेतात टाकला रात्रीचा गाडून. तीन महिने झाले. कसलाही बोभाटा झाला नाही. मला वाटलं खून पचला.’
सध्या रामू जेलची हवा खात आहे.