होमपेज › Bhumiputra › दहा गुंठे मिरचीच्या आंतरपिकातून तीस हजारांचे उत्पन्‍न

दहा गुंठे मिरचीच्या आंतरपिकातून तीस हजारांचे उत्पन्‍न

Published On: Apr 26 2019 1:45AM | Last Updated: Mar 25 2019 7:47PM
बुवाचे वाठार येथील शेतकरी कुटुंबाने दहा गुंठे मिरचीच्या आंतरपिकातून तीस  हजार रुपयांचे उत्पन्‍न मिळवले आहे. उसाचा लागणीचा  खर्च भागून अवघ्या सहा महिन्यांत समाधानकारक रक्‍कम शिल्लक राहिल्याने महादेव सखाराम  चौगुले व कुटुंबीय समाधान व्यक्‍त करीत आहेत.

बुवाचे वाठार येथील महादेव सखाराम चौगुले यांना दीड एकर शेतजमीन आहे. ते उपलब्ध क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन  घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. बाजारभावाचा व हंगामाचा  अंदाज घेऊन विविध पीक लागवड करण्याकडे त्यांचा ओढा असतो. अपेक्षित उत्पन्‍न मिळावे व चरितार्थ चालविण्यासाठी मदत व्हावी, याद‍ृष्टीने महादेव चौगुले यांनी उसाच्या  लागणीत मिरचीचे आंतरपीक घेण्याचे नियोजन केले. त्यानुसार लागणीपूर्वी आपल्या दहा गुंठे क्षेत्रात ज्वाला मिरचीचे बियाणे टोकण केले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात उसाची लागण केली.  साधारण नोव्हेंबरपासून मिरचीचे तोडे करण्यास सुरुवात केली. दररोज बाजारात ओली मिरची बाजार भावानुसार पक्‍व होणारी मिरची विक्री करण्यास सुरुवात केली. तीन महिन्यांत दहा गुंठे क्षेत्रातून ओली पाचशे  किलो व वाळलेली दीडशे किलो मिरचीचे उत्पादन मिळाले.

ओल्या व सुकवलेल्या मिरचीचे एकूण तीस हजार रुपये उत्पन्‍न मिळाले. खर्च वजा जाता साधारणपणे पंचवीस हजार  रुपये  उत्पन्‍न सहजपणे चौगुले कुटुंबीयांनी मिळविले. तर सुकविलेल्या सर्व मिरच्या घरगुती पद्धतीने एकशे  वीस रुपये प्रति किलो दराने  विकल्या आहेत. उत्तम प्रतीच्या व विना भेसळीच्या मिरच्या  असल्यामुळे  चांगली मागणी मिळाली.

चौगुले कुटुंबाने मिरचीवर रोग नियंत्रण उत्पादनवाढीसाठी दोन फवारण्या घेतल्या. गरजेनुसार पाणीपुरवठा योजनेच्या सहकार्याने ऊस पिकासोबत  पाण्याच्या पाळ्या दिल्या. चौगुले यांना त्यांच्या शेतात कुटुंबीय कायमच मदत करतात. त्यामुळे खर्चात कपात होते. पर्यायाने उत्पन्‍नात वाढ मिळून जाते. यामध्ये त्यांच्या अर्धांगिनी शांताबाई मुलगा सचिन, संदीप व सून अश्‍विनी यांनी  कष्ट उपसून मदत केली आहे. तर शेतीतज्ज्ञ एकनाथ  खाडे  यांचे  मार्गदर्शन लाभले आहे.